

Driving license cancellation for BRT lane violation
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील बस रॅपिड ट्रान्झिट (बीआरटी) मार्गातील वाढती खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत होती; परंतु तरीदेखील घुसखोरीचे प्रमाण कमी न झाल्याने पालिका प्रशासनाकडून बीआरटी मार्गातील थांब्यांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.
या तिसऱ्या डोळ्यामार्फत घुसखोरी करणाऱ्यांचा वाहन परवाना रद्द करण्यात येणार आहे. ही कारवाई पालिकेचा बीआरटी विभाग तसेच वाहतूक पोलिस यांच्याकडून संयुक्तरित्या केली जाणार आहे. (Latest Pimpri chinchwad News)
पिंपरी-चिंचवड शहरवासियांना जलद, आणि सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांकडून खर्च करुन पीएमपीएल बससाठी स्वतंत्र बीआरटी मार्गिका उभारण्यात आली आहे. कामगार नगरीत 52 किलोमीटर अंतराची बीआरटी मार्गिका आहे. त्यामध्ये एकून पाच बीआरटी मार्ग असून 52 थांबे आहेत.
निगडी ते दापोडी, सांगवी फाटा ते किवळे, नाशिक फाटा ते वाकड, चिखली ते जगताप डेअरी स्पाइन रस्ता, आणि मॅगझीन चौक ते देहू- आंळदी फाटा या पाच मार्गांचा समावेश आहे. या मार्गातून खासगी वाहन चालक बिनधास्तपणे गाड्या नेतात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात.
अशा घुसखोरांवर वाहतूक पोलिसांच्या वतीने कारवाई करुन देखील कोणत्याही प्रकारची सुधारणा नसल्याचे चित्र शहारात दिसत होते. त्यामुळे आता ही घुसखोरी थांबविण्यासाठी बीआरटी बसथांब्यांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. याद्वारे बीआरटीतील घुसखोर वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाईल; तसेच आरटीओकडून वाहन परवाना रद्द केला जाणार आहे. ही कारवाई बीआरटी विभाग तसेच आरटीओ मार्फत केली जाणार आहे.
शहरातील बीआरटी मार्ग, सीसीटीव्ही संख्या
बीआरटी मार्ग -5
बीआरटी थांबे -52
एकूण सीसीटीव्ही-92
बीआरटी मार्गातून खासगी वाहनांनी ये-जा केल्यास संबंधित वाहन चालकांचा परवाना आरटीओकडून रद्द करण्यात येणार आहे; मात्र शहरातील बीआरटी मार्गातून रुग्णवाहिका, पोलिसांची वाहने; तसेच आग्निशमन वाहनांना प्रवेश आहे.
- बापू साहेब गायकवाड सहशहर अभियंता पिंपरी चिंचवड महापालिका