

पिंपरी: आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद मदत पोहोचविण्यात महाराष्ट्र पोलिस देशात, तर पिंपरी-चिंचवड पोलिस राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे जलद प्रतिसादाच्या बाबतीत पिंपरी-चिंचवड पोलिस देशात अव्वल असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सन २०२२ मध्ये डायल ११२ चा प्रतिसाद कालावधी ९ मिनिटे ४४ सेकंद होता.
तो आता अवघ्या ३ मिनिटे १० सेकंदांवर आणण्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांना यश आल्याने त्यांनी विशेष कौतुक केले. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांच्या शुभारंभानिमित्त मंगळवार (दि. ३) आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या वेळी त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद मदत पोहोचविण्यात पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले.
मुख्यमंत्री म्हणाले की, पूर्वी पुणे शहर आणि ग्रामीण पोलिसांवर संपूर्ण जिल्ह्याच्या सुरक्षेची जबाबदारी होती. वाढत्या शहरीकरणामुळे स्वतंत्र पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पोलिस दलाच्या मनुष्यबळासह पायाभूत सुविधांमध्ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना तातडीने मदत मिळण्यासाठी पोलिसांनी प्रतिसादाची वेळ कमी करण्यावर भर दिला. या कामगिरीमुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी आयुक्तालयाच्या विस्ताराची माहिती दिली. वाढत्या लोकसंख्येबरोबर गुन्हेगारीचे स्वरूप बदलत असल्याने पोलिस यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आले आहे. सध्या दोन अपर पोलिस आयुक्त कार्यरत असून, पोलिस उपायुक्तांची संख्या तीनवरून नऊ, सहायक पोलिस आयुक्तांची आठवरून अठरा, तर पोलिस ठाण्यांची संख्या सतरावरून पंचवीस झाली आहे. यामध्ये स्वतंत्र सायबर पोलिस ठाण्याचाही समावेश आहे. औद्योगिक क्षेत्राच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र परिमंडळ निर्माण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दोषसिद्धीचे प्रमाण १३ वरून ७० टक्क्यांवर!
पूर्वी शंभर गुन्हेगारांपैकी केवळ तेरा जणांना शिक्षा होत होती. मात्र, आता हे प्रमाण सत्तरपर्यंत पोहोचले आहे. आगामी काळात ते ८० ते ९० टक्क्यांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पोलिसांच्या तपासाची गुणवत्ता सुधारल्याने दोषसिद्धीचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अजितदादांच्या आठवणीने सुनेत्रा पवार भावुक
पिंपरी-चिंचवडचा उल्लेख झाला की, अजितदादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. हे त्यांचे लाडके शहर होते. शहराशी त्यांचे अतूट नाते होते. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार भावुक झाल्या.
'पिंपरी-चिंचवड तिथे नाही गडबड !'
'पुणे तिथे काय उणे', असे म्हटले जाते. मात्र, आता 'पिंपरी-चिंचवड तिथे नाही गडबड', असे म्हणावे लागेल, अशी मिश्कील टिप्पणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पूर्वी पिंपरी-चिंचवडमधील नागरिक पुण्यात राहत असल्याचे सांगत असत. आता मात्र ते अभिमानाने पिंपरी-चिंचवडचे नाव घेतात.