

पिंपरी: राज्यात श्रीमंत म्हणून नावलौकीक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना तब्बल ७० कोटी रुपयांचा दिवाळी बोनस देण्यात आला आहे. त्या माध्यमातून महापालिका प्रशासनाकडून होऊ दे खर्च.. हा नारा देण्यात आला असून, त्या आर्थिक पाठबळामुळे अधिकारी व कर्मचार्यांनी दिवाळी अधिक गोड झाली आहे.
महापालिकेत वर्ग एक ते वर्ग चारचे असे एकूण सात हजार ६०० अधिकारी व कर्मचारी आहेत. त्या सर्वांना दरवर्षी दिवाळी बोनस दिला जातो. दरवर्षी ८.३३ टक्के प्रथा बोनस व २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा सानुग्रह अनुदानात ५ हजारांची वाढ करून ती ३०हजार रुपये इतकी करण्यात आली आहे. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्यापासून थेट आयुक्त तसेच, अतिरिक्त आयुक्तांपर्यंत बोनस दिला जातो. त्यानुसार, एकूण ६८ कोटी ९१ लाख रुपयांचा बोनसचे वितरण करण्यात आले. त्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचार्यांची यंदाची दिवाळी अधिक गोड झाली आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकार्यांनी नाकारला बोनस
महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे यांनी महापालिकेचा दिवाळी बोनस नाकारला आहे. राज्यात कोणत्याही महापालिकेत रूजू असल्यास बोनस घेत नसल्याचे त्यांनी सांगितले. या पूर्वीचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजेश लांडे यांनीही महापालिकाचा दिवाळी बोनस घेतला नव्हता.
बोनसमुळे अधिकारी-कर्मचार्यांना आर्थिक पाठबळ
राज्यातील अनेक महापालिकेची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने त्यांना मासिक वेतन देणेही जिकिरीचे जात आहे. त्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेने बोनसची परंपरा कायम ठेवत अधिकारी व कर्मचार्यांना एकप्रकारे अर्थिक पाठबळ दिले आहे. त्यासंदर्भातील करार महापालिकेने 5 वर्षांसाठी वाढविला आहे. वेतनासह बोनस वेळेवर मिळाल्याने अधिकारी व कर्मचार्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. दिवाळी बोनस रकमेमुळे अधिकारी व कर्मचार्याचीं जबाबदारी आणखी वाढते. कामांचा दर्जा आणखी सुधारावा असे त्यातून अपेक्षित आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
..यांना मिळतो बोनस
महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ यांच्यात झालेल्या करारनामानुसार महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना दिवाळी बोनस दिला जातो. त्या संदर्भात दर पाच वर्षाने करारनामा करण्यात येतो. त्या करारनामानुसार महाापालिकेकडून बोनस दिला जातो, असे अधिकार्यांनी सांगितले. त्यानुसार महापालिका आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचार्यांना बोनसचा लाभ दिला जातो. महापालिकेत सहा महिन्यांपासून कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी, बालवाडी शिक्षिका, महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचारी, मानधनावरील अधिकारी, कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी, समूह संघटक, डे एनयूएलएम अधिकारी व कर्मचारी, तासिका तत्वावर नेमलेले कर्मचारी, निलंबित अधिकारी व कर्मचारी आणि सन २०२५-२६ वर्षात निवृत्त व मयत अधिकारी व कर्मचार्यांनाही बोनस दिला जातो.
तीन लाख रुपये बोनस
महापालिकेत सर्वांधिक ३ लाख रुपये दिवाळी बोनस हा वरिष्ठ अधिकार्यांना मिळतो. तर, चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांना किमान ६० हजार रुपये बोनस मिळतो. सर्वांधिक बोनस मिळत असल्याने सर्वच अधिकारी व कर्मचारी दिवाळी सणात आनंदी असतात.
पीएमपीएल कर्मचार्यांना महापालिकेकडून बोनस
पीएमपीएलच्या कर्मचार्यांनाही पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपल्या हिस्साच्या ४० टक्के प्रमाणात बोनस दिला आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, घंटागाडी कर्मचारी, सफाई कामगार यांना सानुग्रह अनुदान बक्षीस म्हणून दिले आहे. ती रक्कम ३० हजार रुपये इतकी आहे.