Maval Unseasonal Rain: मावळमध्ये अवकाळीचा भातपिकाला फटका; रब्बी हंगामासाठी मात्र पाऊस ठरणार दिलासादायक

कापणी करून शेतात ठेवलेले भात भिजले; दर्जा घसरण्याची आणि चारा टंचाईची भीती
Crop Loss
Crop LossPudhari
Published on: 
Updated on: 

वडगाव मावळ: मावळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे भात उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापणी करून शेतात वाळत ठेवलेले भात भिजल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, मात्र दुसरीकडे रब्बी हंगामासाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे अवकाळी पाऊस भात उत्पादकांसाठी संकट ठरत असला, तरी रब्बी हंगामासाठी वरदान ठरण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Crop Loss
Maharashtra School Evaluation Method: नवा अभ्यासक्रम, पण मूल्यमापन जुन्याच पद्धतीने; शिक्षकांचा संभ्रम दूर

मावळ तालुक्यातील पवन मावळ, नाणे मावळ तसेच अंदर मावळ या ग्रामीण भागात भातकापणीची कामे सुरू आहेत. अनेक शेतकऱ्यांनी भात कापून शेतात वाळत घातले आहे. कापलेले भात सुरक्षित ठिकाणी नेण्याची लगबग सुरू असतानाच अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. भात भिजल्याने त्याचा दर्जा घसरण्याची, दाण्याला कोंब फुटण्याची तसेच साठवणुकीत अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. परिणामी, उत्पादनासाठी केलेला खर्च आणि वर्षभराची मेहनत वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

कापणीच्या ऐन हंगामात पावसाचा फटका

यंदा भातपिकाच्या कापणीच्या काळातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. भात कापणी, मळणी आणि सुरक्षित साठवणुकीसाठी अतिरिक्त मजुरी व खर्च करावा लागत आहे. भिजलेले भात पुन्हा वाळवणे, त्याची गुणवत्ता टिकवणे आणि बाजारात योग्य भाव मिळवणे ही आव्हाने शेतकऱ्यांसमोर उभी राहिली आहेत. त्यामुळे कृषी विभागाने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार मदत द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Crop Loss
Pimpri Diwali Special Bus Service: दिवाळीसाठी पिंपरी आगारातून ४१० बसफेऱ्यांचे नियोजन; २११ अतिरिक्त फेऱ्या धावणार

रब्बी हंगामासाठी दिलासादायक चित्र

एकीकडे भातपिकाचे नुकसान होत असताना दुसरीकडे अवकाळी पावसामुळे जमिनीतील ओलावा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी तसेच अन्य पिकांच्या पेरणीसाठी काही भागांत अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाण्याची उपलब्धता वाढल्यास पिकांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. विशेषतः पावसाअभावी चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळू शकतो.

शेतकऱ्यांची दुहेरी कसरत

अवकाळी पावसामुळे एका बाजूला तयार भातपीक वाचविण्याची धडपड, तर दुसऱ्या बाजूला रब्बी हंगामाच्या नियोजनाची तयारी, अशी दुहेरी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासन आणि कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

Crop Loss
Pimpri Chinchwad Ward Offices: पिंपरी-चिंचवडमध्ये नव्या क्षेत्रीय कार्यालयांचा कारभार अडखळला; मनुष्यबळ, यंत्रसामग्रीचा अभाव

ओलाव्यामुळे भाताच्या दर्जावर परिणाम होण्याची भीती

पवन मावळ परिसरात अनेक शेतकऱ्यांनी भातकापणी सुरू केली आहे. कापणी करून शेतात ठेवलेले भात पावसामुळे भिजले असून, झोडणीसाठी एकत्र करून ठेवलेल्या पिकालाही फटका बसला आहे. भिजलेले भात पुन्हा वाळवणे, त्याची झोडणी करणे आणि सुरक्षित साठवणूक करणे यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. ओलाव्यामुळे भाताच्या दर्जावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

वर्षभराच्या मेहनतीवर पाणी

शेतीच्या मशागतीपासून ते भातकापणीपर्यंत शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे, मात्र आधी पावसाच्या अनियमिततेमुळे पिकाचे नुकसान आणि आता काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे खराब होण्याची भीती निर्माण झाली असून, अपेक्षित उत्पन्न मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.

भातपीक भिजल्यामुळे चारा टंचाईची भीती

तळेगाव दाभाडे परिसरात रविवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास सुमारे दीड ते दोन तास पडलेल्या पावसामुळे काढून ठेवलेल्या भातपिकाचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे भाताचे दाणे तांबडे आणि काळे पडण्याची शक्यता आहे. तसेच, पेंढा भिजल्यामुळे त्याची दुर्गंधी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे काही प्रमाणात चारा टंचाई होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पावसामुळे शेतात चिखल झाल्यामुळे भात काढणीस अडचणी येत आहेत. चिखलामुळे भात काढणीसाठी मशिनही जावू शकत नाही. जर भातपीक लवकर काढण्यात आले नाही, तर ते पिवळे पडण्याची शक्यता आहे.

Crop Loss
Pimpri Chinchwad Heavy Vehicle Traffic: पिंपरी-चिंचवडमध्ये जड वाहनांचा बिनधास्त वावर; वाहतूक निर्बंध कागदावरच?

हिंदमाता भुयारी मार्गात वाहतूक कोंडी

हा पाऊस गेल्या महिन्यात पडला असता तर फायद्याचा झाला असता, असे मत भात उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत. तळेगाव शहरातील सखल भागात आणि जेथे खड्डे बुजविण्यात आले नाहीत तेथे पाणी साचल्यामुळे चालकांची वाहन चालविताना तारांबळ उडत होती. हिंदमाता भुयारी मार्गात पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अवकाळी पावसाने भात उत्पादकांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची परिस्थिती निर्माण केली आहे, तर रब्बी हंगामासाठी जमिनीतील ओलावा आणि पाण्याची उपलब्धता वाढण्याच्यादृष्टीने हा पाऊस आशादायी ठरू शकतो.

एम. डी. साळे, कृषी अधिकारी, मावळ तालुका