

पिंपरी: इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार नवा अभ्यासक्रम लागू झाला असला, तरी यंदाचे मूल्यमापन जुन्याच पद्धतीने करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय (जीआर) अखेर जाहीर करण्यात आला असून, त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून मूल्यमापन कसे करायचे? याबाबत असलेला शिक्षकांचा संभ्रम मिटला आहे.
यंदा इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा नवीन अभ्यासक्रम यंदापासून लागू झाला आहे. पुस्तकेही शाळांमध्ये पोहचली आहेत, मात्र परीक्षा घेण्याची वेळ जवळ आली तरी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन नेमके कसे करायचे? याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याने शिक्षकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. जुनीच पद्धत वापरायची की नव्या सूचनांची वाट पाहायची? अशा द्विधा मन:स्थितीत शिक्षक अडकले होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार राज्याने अभ्यासक्रम बदलला आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२५-२६ मध्ये पहिलीची आणि यंदा २०२६-२७ मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलण्यात आला. या नव्या अभ्यासक्रमावर आधारित नवी पाठ्यपुस्तकेही अभ्यासक्रमात वापरण्यात येत आहेत. राज्यात यंदा २०२६-२७ या वर्षासाठी दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवी पाठ्यपुस्तके लागू झाली आहेत, मात्र सत्र परीक्षा तोंडावर आल्या तरी मूल्यमापनाच्या सूचना आल्या नव्हत्या. शिक्षक संघटनांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतल्यानंतर विभागाने तातडीने जीआर काढला आहे.
या नव्या धोरणाचा गाभा म्हणजे पाठांतराला कमी महत्त्व देणे. विद्यार्थ्याचे आकलन, कौशल्य, चिकित्सक विचार, सर्जनशीलता आणि प्रत्यक्ष जीवनाशी जोडलेले ज्ञान, यावर भर द्यायचा आहे. त्यानुसार, मूल्यमापन पद्धतीतही आमूलाग्र बदल अपेक्षित आहे, मात्र प्रत्यक्षात तसे झालेले नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षातील पहिल्या सत्र परीक्षा सुरू आहेत. सरतेशेवटी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून परीक्षांच्या तोंडावर जीआर काढण्यात आला आहे. त्यानुसार जुन्या मूल्यमापन पदध्तीनुसारच मूल्यमापन होणार आहे. विद्यार्थ्याचे कौशल्य, चिकित्सक विचार तपासायचा असेल तर मूल्यमापनही नवे हवे. शासनाने केवळ सोयीसाठी जुनी पद्धत लादली आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. दरम्यान, या जीआरमुळे सत्र परीक्षा वेळेवर घेण्याचा मार्ग मोकळा झाला असून, शाळांनी आता जुन्याच गुणपत्रकानुसार परीक्षा घ्याव्यात, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
शासन निर्णय
२०२६-२७ या शैक्षणिक वर्षात जरी अभ्यासक्रम नवा असला तरी मूल्यमापनाची पद्धत २० ऑगस्ट २०१० च्या जुन्याच शासन निर्णयानुसार म्हणजेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीने करावी.
कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांचे संकलित मूल्यमापन न करता केवळ आकारिक मूल्यमापन करावे.
इयत्ता सहावीसाठी नव्याने सुरू झालेल्या १०० गुणांच्या व्यावसायिक शिक्षण विषयाच्या मूल्यमापनात २५ गुण लेखी परीक्षा व ७५ गुण प्रकल्प उपक्रम व इतर पद्धती आधारे करावे.
शासनाने २६ ऑक्टोबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये २० ऑगस्ट २०१० च्या शासन निर्णयाप्रमाणे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन पद्धतीनेच मूल्यमापन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. म्हणजे, जुन्याच पद्धतीने मूल्यमापन करायचे आहे.
महेंद्र गणपुले, माजी उपाध्यक्ष, मुख्याध्यापक महामंडळ संघटना