Pimpri Chinchwad Scrap Transport: पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर उघड्या वाहनांतून स्क्रॅप वाहतूक; दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला धोका

तारांचे तुकडे, धातुकण रस्त्यावर पडत असल्याने अपघाताची शक्यता; ताडपत्रीचा नियम कागदावरच राहिल्याचा नागरिकांचा आरोप
Scrap Transport
Scrap TransportPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवडची उद्योगनगरी हजारो कामगारांच्या कष्टावर आणि उद्योगांच्या चाकांवर धावते. मात्र, याच उद्योगनगरीतील रस्त्यांवरून नागरिकांच्या सुरक्षिततेला धाब्यावर बसवून स्क्रॅप मटेरियलची वाहतूक सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे दुचाकीचालकांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.

Scrap Transport
Matrugandh Foundation: आयटी क्षेत्रातील नोकरी सांभाळत मराठी संवर्धनाची चळवळ; ‘मातृगंध’ची १३५० हून अधिक वाचनसत्रे

उघड्या वाहनातून टाकाऊ माल वाहतूक करताना काळजी घेणे गरजेचे आहे. गाडीतून तारांचे वेस्टेज, बारीक धातूचे तुकडे आणि स्क्रॅप उघड्या ट्रक व लॉरीमधून ताडपत्री न लावता, बंदिस्त न करता बेधडकपणे नेले जात आहेत. वाहनाच्या वेगाने किंवा वाऱ्याच्या झोताने हा माल रस्त्यावर पडत आहे. बारीक तारांचे तुकडे, धातूचे कण आणि सूक्ष्म वेस्टेज रस्त्यावर पडत असल्याने दुचाकीस्वारांच्या टायरखाली ते येण्यापासून ते डोळ्यांत किंवा श्वासावाटे कण जाण्यापर्यंतचे धोके निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही अशा प्रकाराकडे प्रशासन व वाहतूक पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले असतानाही परिस्थितीत फारसा बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे नियम फक्त कागदावरच आहेत का आणि उद्योगनगरीतील नागरिकांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित होत आहे.

Scrap Transport
Pimpri Chinchwad Out of School Children: पिंपरी-चिंचवडमध्ये १२४ बालके आढळली शाळाबाह्य; ११७ बालकांना पुन्हा शाळेत दाखल

स्क्रॅपमधील मोठ्या वस्तूंपेक्षा बारीक तारांचे तुकडे आणि धातूचे कण अधिक धोकादायक ठरू शकतात. हे तुकडे रस्त्यावर पडून वाहनांच्या चाकाखाली येतात. काही वेळा चाकातून ते बाजूला उडू शकतात. दुचाकीस्वाराच्या डोळ्याला किंवा चेहऱ्याला असा तुकडा लागल्यास अपघाताची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रस्त्यावर पडलेले धातूचे तुकडे टायरमध्ये अडकण्याची किंवा पंचर होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

हजारो कामगारांना धोका

भोसरी एमआयडीसीसह शहरातील विविध औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने उद्योग आहेत. या भागात कामासाठी दूरवरून येणारे कर्मचारी दररोज दुचाकी, चारचाकी आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करतात. औद्योगिक भागातील अवजड वाहनांची वर्दळ, वाहतूक कोंडी आणि रस्त्यांची परिस्थिती यामध्ये अशा प्रकारची असुरक्षित स्क्रॅप वाहतूक आणखी जोखीम वाढवू शकते. भोसरी एमआयडीसी परिसरात औद्योगिक कचरा व रस्त्यांवरील कचऱ्याच्या समस्यांबाबत यापूर्वीही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Scrap Transport
Bavdhan Car Theft: शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी मित्राची १४ लाखांची कार चोरी; १२ तासांच्या पाठलागानंतर आरोपी जेरबंद

नियम काय सांगतात?

माल सुरक्षित झाकणे बंधनकारक : मालवाहू वाहनातून माल वाहताना तो रस्त्यावर पडणार नाही किंवा इतर वाहनांना धोका निर्माण होणार नाही, अशा पद्धतीने सुरक्षित करणे आवश्यक आहे. ताडपत्रीशिवाय अथवा असुरक्षित पद्धतीने माल वाहून नेल्यास नियमानुसार कारवाई होऊ शकते.

  • नंबरप्लेट स्पष्ट असणे आवश्यक : वाहनावर नंबरप्लेट असणे आणि ती स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे. नंबरप्लेट नसणे, योग्य पद्धतीने प्रदर्शित न करणे किंवा वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्टपणे दिसत नसणे हा नियमभंग ठरू शकतो.

  • एचएसआरपी अनिवार्य : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एचएसआरपी बसविण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात लागू करण्यात आली असून, १ डिसेंबर २०२५ पासून पात्र वाहनांवर एचएसआरपी नसल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

  • जबाबदारी कोणाची? : वाहनातून माल रस्त्यावर पडू नये, नागरिकांना धोका निर्माण होऊ नये आणि वाहनाची ओळख स्पष्ट राहावी, याची जबाबदारी वाहनमालक व चालकाची आहे.

'ताडपत्री' कागदावर नको, रस्त्यावर दिसली पाहिजे!

वाहनातून माल पडू नये, यासाठी ताडपत्री लावण्याचा नियम असताना प्रत्यक्ष रस्त्यावर मात्र उघड्या वाहनांतून स्क्रॅप वाहून नेले जात असेल, तर नियमांची अंमलबजावणी कुठे होते, हा प्रश्न आहे. दंड झाल्यानंतर पुन्हा तोच प्रकार सुरू राहणार असेल, तर कारवाईचा धाक तरी किती? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

Scrap Transport
Bavdhan Bike Theft: दुचाकी चोरून पार्ट वेगळे करून भंगारात विक्री; बावधन पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश

प्रशासनाकडून या उपाययोजणांची गरज

  • उद्योगनगरीतील प्रमुख रस्त्यांवर आरटीओ व वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांची तपासणी करावी

  • स्क्रॅप वेस्टेज वाहून नेणाऱ्या प्रत्येक वाहनात माल पूर्णपणे झाकलेला आहे का, याची तपासणी करावी

  • केवळ ताडपत्री लावली आहे की नाही, एवढे न पाहता माल वाहनातून बाहेर येणार नाही, याची खात्री करावी

  • औद्योगिक परिसरातील रस्त्यांवर नियमित पाहणी करून धातूचे तुकडे व वेस्टेज तातडीने हटवावे

  • वारंवार नियमभंग करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी

हवेबरोबर धातुकणांचा प्रवास

उघड्या वाहनातील हलके वेस्टेज वाऱ्यामुळे हवेत उडते. मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दिशेने हे कण गेल्यास डोळ्यांना त्रास होऊ शकतो. सूक्ष्म धुळीच्या संपर्कामुळे श्वसनमार्गावर परिणाम होण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे स्क्रॅप वाहतूक ही केवळ वाहतुकीचा विषय न राहता कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न बनला आहे.

स्क्रॅप सुरक्षित बांधून आणि ताडपत्री लावून नेणे आवश्यक आहे. वाहनचालकांकडून निष्काळजीपणा होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. डोळ्यांमध्ये बारिक कण जातात, जळजळ होते. कधी कधी मोठे तुकडे थेट चेहऱ्र्यावर आदळतात.

विराज सातपुते, वाहनचालक

उघड्या वाहनातून स्क्रॅप किंवा वेस्टेज मटेरियल वाहून नेणाऱ्या वाहनांची तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल. औद्योगिक परिसरातील वाहतुकीच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्यात येतील.

अमित डोळस, वरिष्ठ वाहतूक पोलिस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news