

संतोष शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात खुनाच्या घटनांमध्ये सरत्या वर्षात संख्यात्मक घट झाली आहे; मात्र या घटनांमागील कारणे अधिक चिंताजनक बनत असल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, अनैतिक संबंध आणि प्रेमसंबंधातून घडणारे खून हे शहरातील खुनांचे प्रमुख कारण ठरत असून, कौटुंबिक नाती, प्रेमसंबंध आणि संशय यांचे रूपांतर थेट हिंसाचारात होत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
प्रेमसंबंध, अनैतिक संबंध कारणीभूत
सन 2025 मध्ये घडलेल्या खुनांची कारणमीमांसा करताना प्रेमसंबंध व अनैतिक संबंधातून 21 खुनाच्या घटना घडल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याखालोखाल दारूच्या नशेतून वादातून 18 खून, जुन्या भांडणाच्या रागातून 7, आर्थिक कारणांमुळे 6, कौटुंबिक वादातून 5, रेकॉर्डवरील आरोपींकडून 2, तर इतर कारणांतून 4 खुनाच्या घटना घडल्या आहेत. या आकडेवारीवरून प्रेमसंबंध आणि अनैतिक नाती हीच शहरातील खुनाच्या घटनांमागील सर्वात मोठी ठिणगी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
खुनाच्या घटनेतील घट दिलासादायक तरीही...
सन 2019 मध्ये शहरात 68 खुनाच्या घटना नोंदल्या गेल्या होत्या. 2020 मध्ये हा आकडा 71 वर पोहोचला, तर 2021 मध्ये तब्बल 85 खून झाल्याने शहर हादरले होते. 2022 मध्ये 80, 2023 मध्ये 69, तर 2024 मध्ये पुन्हा एकदा खुनाच्या घटनांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. मात्र, 2025 मध्ये 63 खुनाच्या घटना नोंदल्या गेल्या असून, 2024 च्या तुलनेत 22.85 टक्क्यांची घट नोंदवण्यात आली आहे. ही घट दिलासादायक असली, तरी खुनामागील कारणे अधिक धोकादायक ठरत असल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे.
क्षणिक रागातून टोकाचे पाऊल
खून प्रकरणातील अनेक आरोपी पहिल्यांदाच गुन्हेगारी कृत्यात सहभागी झालेले आहेत. कोणताही पूर्व गुन्हेगारी इतिहास नसताना, क्षणिक राग, अपमानाची भावना, संशय; तसेच कौटुंबिक किंवा अनैतिक नातेसंबंध उघड होण्याची भीती यामुळे त्यांनी अत्यंत टोकाचे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे. भावनांवर नियंत्रण न राहणे, तात्काळ परिणामांचा विचार न करणे आणि सामाजिक बदनामीची भीती या कारणांमुळे हे गुन्हे घडल्याचे तपासात उघड झाले आहे.
बहुतेक प्रकरणांत नातेसंबंधातील व्यक्तींचा हात
बहुतेक प्रकरणांमध्ये पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी किंवा अत्यंत जवळच्या नातेसंबंधातील व्यक्ती गुंतलेल्या आहेत. मोबाईलवरील संदेश, सोशल मीडियावरील संवाद, तसेच चारित्र्याविषयी निर्माण झालेला संशय, यामुळे नात्यांमध्ये तणाव निर्माण होतो आणि तो क्षणात हिंसाचारात रूपांतरित होत असल्याचे तपास अधिकारी सांगतात.
सोशल मीडियाचा अतिरेक
समाजशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांच्या मते, कुटुंबसंस्था कमकुवत होणे, व्यसनाधीनता, सोशल मीडियाचा अतिरेक आणि तणावपूर्ण जीवनशैली यामुळे अशा गुन्ह्यांना खतपाणी मिळत आहे. प्रेमसंबंध अपयशी ठरले किंवा अनैतिक नाते उघड होण्याची भीती वाटली, की अनेक जण रागावर नियंत्रण गमावून टोकाची पावले उचलत असल्याचेही ते सांगतात.
संवाद, समुपदेशनातून हिंसाचारास आळा
सन 2025 मध्ये खुनाच्या घटनांमध्ये संख्यात्मक घट झाली असली, तरी नात्यांमधून होणारा रक्तपात ही समाजासाठी धोक्याची घंटा आहे. कायद्याची भीती असूनही संशय, राग आणि अहंकारावर संयम सुटत चालल्याचे चित्र दिसत असून, संवाद, समुपदेशन आणि सामाजिक जागृतीद्वारेच या वाढत्या हिंसाचाराला आळा घालता येईल, असे जाणकारांचे मत आहे.
आजकाल शहरात घडणाऱ्या बहुतांश खुनाच्या घटना या पूर्वनियोजित नसून, अचानक उद्भवलेल्या प्रेमसंबंधातील वाद, संशय आणि अहंकारातून होत आहेत. संवादाचा अभाव आणि संयम सुटणे हे यामागील मुख्य कारण आहे. नागरिकांनी वाद वाढू न देता संवादातून मार्ग काढणे गरजेचे आहे.
शिवाजी पवार, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड