

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांना चांगलीच टक्कर दिली. पराभूत होऊनही राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा तब्बल 4 लाख 78 हजार 297 मते अधिकची घेतली आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराने अजित दादांना पसंती दिल्याचे स्पष्ट होत आहे.
निवडणुकीत फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीप्रमाणेच एकूण 128 जागा होत्या. चार सदस्यीय एकूण 32 प्रभाग होते. एका मतदारांने चार उमेदवारांना मते दिली. त्यामुळे शहरातील मतांची संख्या चौपट झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 39 हजार 13 हजार 474 मतदान झाले होते. तर, गेल्या निवडणुकीत एकूण 26 लाख 49 हजार 987 मतदान झाले होते. यंदा तब्बल 12 लाख 63 हजार 487 इतके मतदान वाढले.
भाजपने सर्वांधिक 84 जागा मिळवत सलग दुसऱ्यादा सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला 37 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीने एकूण 13 लाख 67 हजार 642 मते घेतली आहेत. मागील फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 8 लाख 89 हजार 345 मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादीच्या मतांमध्ये तब्बल 4 लाख 78 हजार 297 मतांनी वाढ झाली आहे. दिवगंत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शहरात प्रचाराचा धुराळा उडवला होता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी संपूर्ण शहर पिंजून काढले होते. परिणामी, मतदारांनी राष्ट्रवादीच्या झोळीत भरभरून मते टाकली. मात्र, पक्षाला सत्तेत येता आले नाही. अजितदादांसोबत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला 62 हजार 597 मते मिळाली. त्या पक्षाचा एकही उमेदवार निवडून आला नाही.
सात नगरसेवक वाढूनही भाजपच्या मतांत केवळ 5 लाख 81 हजाराने भर
भाजपने गेल्या निवडणुकीत 11 लाख 53 हजार 854 मते घेतली होती. यंदा त्यात 5 लाख 81 हजार 199 मतांची वाढ होऊन एकूण 17 लाख 35 हजार 53 मते कमळाला मिळाली आहेत. पक्षाचे 84 उमेदवार विजयी झाले आहेत. यंदा भाजपचे अधिकचे 7 उमेदवार विजयी झाले आहेत. एकसंघ असलेल्या शिवसेनेला मागील निवडणुकीत 5 लाख 16 हजार 860 मते मिळाली होती. यंदा पक्षाचे दोन तुकडे झाल्यानंतर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाला 2 लाख 51 हजार 804 मते मिळाली. या पक्षाचे 6 उमेदवार विजयी झाले आहेत. तर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशालीला 80 हजार 316 मते मिळाली. या पक्षाला नगरसेवक पदाचे खाते उघडता आले नाही.
मनसे, काँग्रेसच्या मतात घट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा 14 हजार 40 मते कमी पडली आहेत. मागील निवडणुकीत मनसेला 43 हजार 46 मते मिळाली होती. पक्षाचा एक नगरसेवक होता. मात्र, यंदा केवळ 29 हजार 6 मते रेल्वे इंजिनाला मिळाले आहेत. मनसेला खाते उघडता आले नाही. काँग्रेसच्या पंजाला मागील निवडणुकीत 97 हजार 71 मते पडली होती. तर, यंदाच्या निवडणुकीत त्यात घट होऊन केवळ 64 हजार 195 मते मिळाली आहेत. पक्षाचा यंदाही एकही नगरसेवक झाला नाही. बहुजन समाज पार्टीने गेल्या निवडणुकीत एकूण 20 हजार 995 मते घेतली होती. यंदा केवळ 8 हजार 929 मते त्यांना घेता आली.
अपक्षाचा भाव घसरला, मात्र नोटाची पसंती वाढली
यंदा अपक्षांच्या मतामध्ये 1 लाख 43 हजार 528 मतांनी घट झाली आहे. तसेच, अपक्ष नगरसेवकांची संख्या पाचवरून एकवर घसरली आहे. अपक्षांना यंदा एकूण 1 लाख 23 हजार 456 मते मिळाली. तर, गेल्या निवडणुकीत अपक्षांना तब्बल 2 लाख 66 हजार 984 मते मिळाली होती. नोटाच्या मतांमध्ये यंदा 28 हजार 598 मतांनी वाढ झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 1 लाख 16 हजार 465 मते नोटाला मिळाली. तर, मागील निवडणुकीत नोटाला 87 हजार 867 मते मिळाली होती.