

लोणावळा : ख्रिसमस व न्यू इयरच्या सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने पर्यटनासाठी निघाल्यामुळे गुरुवारी (दि. 25) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. खंडाळा घाट परिसरामध्ये साधारणता आठ ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागून द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
शाळांना ख्रिसमसच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. ख्रिसमस व न्यू इयर या सुट्यांच्या आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक हे पर्यटन स्थळांवर जाण्यास निघाले आहेत. त्यामध्ये लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर, पन्हाळा तसेच पश्चिम महाराष्ट्र मार्गे गोवा व कोकण परिसरामध्ये अनेक पर्यटक खासगी वाहनांमधून जाऊ लागले आहेत. आज सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पर्यटकांच्या वाहनांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. खंडाळा घाट ते खालापूर टोलनाका दरम्यान ही वाहतूककोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
वास्तविक पाहता दर शनिवार रविवारी व सलग सुट्यांच्या कालावधीमध्ये खंडाळा घाट परिसरामध्ये वाहतूककोंडीही होत असते. पर्यटनस्थळी जाण्याचे नियोजन करून घराबाहेर पडलेल्या पर्यटकांना या वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागला. विशेषतः मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर तासंतास अडकून पडलेल्या पर्यटकांना याचा सर्वांधिक त्रास सहन करावा लागला. दुपारच्या वेळेमध्ये अनेक वाहने गरम होऊन बंद पडत होती. वाहनांमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांना पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची अडचण ही जाणवत होती.
घाट परिसरामधील ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी महामार्ग पोलिस त्यांच्या नित्य नियमाप्रमाणे प्रयत्न करत होते. मात्र, वाहनांच्या वाढलेल्या संख्या पुढे त्यांचे हे प्रयत्नदेखील अपुरे पडत होते. लोणावळा शहरामध्येदेखील आज दिवसभर वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. साधारणता पुढील आठवडाभर अशीच परिस्थिती मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व लोणावळा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर असणार आहे. पर्यटन स्थळांवरदेखील पर्यटकांची गर्दी होत आहे. सायंकाळच्या सुमारास सूर्योदय पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. लोणावळा शहर व परिसरातील बहुतांश हॉटेल तसेच खासगी बंगलोज व फार्म हाऊस यांच्या बुकिंग पूर्ण झाले असून, या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे केवळ द्रुतगती महामार्ग व राष्ट्रीय महामार्गच नाहीतर गावांमधील अंतर्गत रस्त्यांवरदेखील वाहनांची संख्या वाढली आहे.