Pimpri Chinchwad Municipal Corporation Bribery: लाचखोरीच्या मुद्द्यावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेत रणकंदन; सत्ताधारी-विरोधकांचा आयुक्तांना घेराव!

मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे प्रकरणाचे सभागृहात पडसाद; आयुक्तांच्या अनुपस्थितीवर नगरसेवकांचा संताप, सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबरपर्यंत तहकूब
Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Municipal CorporationPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेची राज्यभरात बदनामी व नाचक्की झाली आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे नियंत्रण नसल्याने अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले आहेत. पैसे घेतल्याशिवाय कामच होत नसल्याचा अनुभव नगरसेवकांनाच येत आहे. हा प्रकार न थांबल्यास नागरिकांच्या रागाचा उद्रेक होईल. असा इशारा देत, सत्ताधारी व विरोधक अशा सर्व नगरसेवकांनी उभे राहत आयुक्तांसह प्रशासनाचा निषेध नोंदवला. त्यानंतर सर्वसाधारण तहकूब सभा 20 नोव्हेंबर दुपारी चारपर्यंत पुन्हा तहकूब करण्यात आली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimple Gurav Traffic Congestion: पिंपळे गुरवमधील ‘८ टू ८०’ उद्यानाला वाहतूक कोंडीचा विळखा; पीएमपीएमएल बससेवाही विस्कळीत!

महापालिकेच्या शुक्रवार (दि.30) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी उपमहापौर शर्मिला बाबर होत्या. नगरसेवक संदीप वाघेरे यांचे वडील बाळकृष्ण वाघेरे तसेच, राज्य व शहरातील निधन झालेल्या मान्यवर व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करून सभा २० मिनिटे तहकूब करण्यात आली. सभा कामकाज सुरू होताच शिवसेनेचे (एकनाथ शिंदे ) गटनेते विश्वजित बारणे यांनी महाापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या लाचखोरीचा पाढा वाचला. ते म्हणाले की, अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. अशा प्रकारे कोणी पैसे मागून अडवणूक करत असेल, तर ठेकेदारांनी शिवसेनेकडे तक्रार करावी. त्या अधिकार्‍यांना आम्ही वठणीवर आणू. हा प्रकार आयुक्तांनी तातडीने रोखला पाहिजे. अशा प्रकरणामुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Illegal Parking: चिंचवडमध्ये मेट्रो स्थानक परिसरात अनधिकृत पार्किंगचा विळखा; पादचाऱ्यांची कोंडी!

विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर म्हणाले की, लाचखोरीच्या घटनेमुळे महापालिका तसेच, नगरसेवक व पदाधिकारी बदनाम होत आहेत. प्रशासन काळात मुजोर झालेले अधिकारी नगरसेवकांचा मान राखत नाहीत. पत्र दिल्यानंतर साधे उत्तर दिले जात नाही. नगरसेवकांच्या रागाचा उद्रेक होऊ देऊ नका. नगरसेवकाने सांगूनही अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी बीट निरीक्षक रक्कम घेतली जाते. पाया खोदताना कारवाई न करता दुसर्‍या स्लॅप टाकल्यानंतर बीट निरीक्षक संबंधितांना ब्लॅकमेल करतात, असा आरोप त्यांनी केला. प्रमोद ओंभासे यांच्याप्रमाणे इतर अधिकार्‍यांनी मस्तीत राहू नये. कोणाचे हस्तक म्हणून काम करू नये. पापाचा घडा येथेच भरणार आहे, असा इशारा त्यांनी अधिकार्‍यांना दिला.

आरपीआयचे गटनेते कुणाल वाव्हळकर म्हणाले की, प्रमोद ओंभासे यांच्यावर पूर्वी कारवाई झाली होती. तरीही त्यांना मुख्य अभियंता म्हणून पदोन्नती दिली गेली. त्यांच्या जावयाने रावेत येथे नैसर्गिक नाला बुजवून गृहप्रकल्पाचे बांधकाम केले आहे. त्याबाबत नगरसेवक धर्मराज तंतरपाळे यांनी तक्रार केल्यानंतरही प्रशासनाने साधी दखल घेतली नाही. नियम फाट्यावर मारणार्‍या अशा मुजोर अधिकार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. राष्ट्रवादीचे अनंत कोर्‍हाळे म्हणाले की, पैसे घेऊन काम करणार्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. नियमानुसार कामे झाली पाहिजेत.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pavana Closed Pipeline Project: पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प घाईत राबवू नका; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारला इशारा!

नगरसेवकांचे बोलणे आयुक्तांना नाटक वाटते काय ?

अधिकार्‍यांच्या लाचखोरीबाबत नगरसेवक सभागृहात बोलत आहेत. मात्र, आयुक्त पाच मिनिटे सभागृहात आले आणि लगेच गेले. हे काय 128 नगरसेवकांचे नाटक सुरू आहे का, काही वेळ नाटक बघितले आणि गेले, असे आयुक्तांनी करू नये. आयुक्तांचा निषेध आहे. कालची लाचखोरीची घटना शहराला काळिमा फासणारी आहे. अधिकार्‍यांना नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीत काही रस नाही. त्यांच्या डोळ्यावर केवळ गांधी नोटांचा चष्मा असून, ते केवळ निविदेत व्यस्त असतात. बांधकाम परवानगी घेऊन अनधिकृत वाढीव बांधकाम केले जाते. अधिकारी आपल्या मर्जीनुसार नियम बदलतात. मात्र, अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. नागरी सुविधांचा ताण शहरावर वाढत आहे. बीआरटीतील थांबे भिकार्‍यांचे आश्रयस्थान झाले आहेत. सततच्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक वैतागले आहेत. केलेली तक्रार थेट बांधकाम व्यावसायिकांकडे पोहचवली जाते. हा प्रकार बंद करा, असा दम भाजपाचे शीतल शिंदे यांनी अधिकार्‍यांना भरला.

सर्व पक्षीय गटनेत्यांकडून आयुक्तांचा निषेध

सभा झाल्यानंतर सर्व पक्षीय गटनेत्यांनी पत्रकार परिषद घेत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा निषेध केला. नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही ते सभागृहात न आल्याने रोष व्यक्त करण्यात आला. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले की, आज विषयपत्रिकेवरील सर्व विषयांचा कामकाज केले जाणार होते. मात्र, आयुक्तांच्या आडमुठे धोरणामुळे सभा तहकूब करावी लागली. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यामुळे दोन महिने कामे रखडली. आता मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांच्यामुळे महिनाभर काम अडकून पडणार आहेत. महापालिकेचे असंख्य कामे प्रलंबित असून, अर्थसंकल्पाचे 80 टक्के तरतूद पडून आहे. तत्कालिन आयुक्त शेखर सिंह यांनी शहर अभियंता पदास समकक्ष असे मुख्य अभियंता ही दोन पदे निर्माण करून चूक केली, असा आरोप त्यांनी केला. या वेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे, नगरसेवक शीतल शिंदे, राहुल कलाटे आदी उपस्थित होते.

Pimpri Chinchwad Municipal Corporation
Pimpri Chinchwad Stray Dogs: पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या श्वानांची दहशत; मेट्रो स्थानके, उद्यानांत नागरिकांमध्ये भीती!

आयुक्त नगरसेवकांना ताटकळत ठेवतात

राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र ननावरे म्हणाले की, मी तीन टर्म नगरसेवक आहे. आयुक्तांना भेटीसाठी तास तासभर प्रतीक्षा करावी लागते. मात्र, खासगी लोकांना ते लगेच भेटतात. महापालिकेचे वायसीएम रुग्णालयांवर आयुक्तांचे नियंत्रण नाही. तेथील डॉक्टर रात्री पार्टी करतात. अधिष्ठातावर गुन्हा दाखल झाला आहे. मोकाट कुत्री नसबंदी शस्त्रक्रियेचा अहवाल उघड न करताच प्रकरण दाबण्यात आले आहे. महापालिकेत प्रत्येक टेबलवर पैसे द्यावे लागतात. त्याशिवाय फाईल पुढे जात नाही. सुरक्षा अधिकारी बोगस नावे देऊन बिल वसूल करतात. लिफ्ट नसल्याने क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील हे कार्यालयात येत नाहीत, असे आरोप त्यांनी केले.

सभागृहात आयुक्त आले अन् गेले

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याऐवजी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम हे सभागृहात डायसवर उपस्थित होते. आयुक्त पाच मिनिटे आले आणि लगोलग निघून गेले. अधिकार्‍यांच्या चुकीच्या कामाबाबत नगरसेवक आपली मते व्यक्त करत आहेत. ते ऐकून घेणे सोडून ते निघून गेल्याने सभागृहात नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी उभे राहून आयुक्तांना सभागृहात बोलवण्याचा आग्रह लावून धरला. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनीही आयुक्तांना बोलवा, असे उपमहापौर बाबर यांनी वारंवार विनंती केली. मात्र, ते आले नाही. उभे राहून आयुक्तांचा निषेध करण्याचे आवाहन करताच नगरसेवक उभे राहिले. शितोळे म्हणाले की, लाचखोर व मुजोर अधिकार्‍यांना पाठीशी घालू नका. लाचखोरीचा प्रकारामुळे लाच वाटत आहे. प्रतीक्षा करूनही आयुक्त न आल्याने त्यांचा आणि प्रशासनाचा निषेध करत सभा 20 नोव्हेंबर दुपारी चारपर्यंत तहकूब करण्याची सूचना त्यांनी मांडली. त्यावर उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सभा तहकूब केल्याचे जाहीर केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.