

पिंपरी: शहर स्मार्ट होत असल्याचे दावे एकीकडे केले जात असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणांवरील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. मेट्रो स्थानकांचे परिसर, पादचारी पूल, उद्याने आणि वर्दळीच्या ठिकाणी भटक्या श्वानांचे कळप ठाण मांडून बसल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, मेट्रोने प्रवास करण्यासाठी येणारे विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही या श्वानांच्या वावरामुळे भीतीच्या वातावरणातून मार्ग काढावा लागत आहे. काही ठिकाणी श्वानांच्या हल्ल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून ठोस आणि परिणामकारक उपाययोजना होताना दिसत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
उद्याने नागरिकांसाठी की श्वानांच्या मुक्कामासाठी?
उद्यानांमध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी आणले जाते, मात्र उद्यानांच्या प्रवेशद्वारांपासून दर्शनी भागापर्यंत श्वान बसलेले दिसतात. काही ठिकाणी श्वानांचे कळपच उद्यान परिसरात वावरताना दिसतात. त्यामुळे मुलांना मोकळेपणाने खेळू देतानाही पालकांना सतत लक्ष ठेवावे लागत आहे. विरंगुळ्याच्या ठिकाणीही भीतीचे सावट निर्माण झाले आहे.
श्वान हटविण्याचा प्रयत्नही ठरतो धोकादायक
काही श्वान नागरिकांच्या अंगावर धावून जाणे, भुंकणे किंवा पाठलाग करणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी आहेत. श्वानांना हटविण्याचा प्रयत्न केला तरी ते जागेवरून हटत नसल्याचे नागरिक सांगतात. अशा परिस्थितीत लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट प्रशासन पाहत आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नसबंदीचे दावे; प्रत्यक्ष नियंत्रण कुठे?
भटक्या श्वानांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नसबंदी आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाच्या उपाययोजना केल्या जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते, मात्र प्रत्यक्ष ठिकाणी श्वानांचे कळप दिसत असल्याने या मोहिमांचा परिणाम काय, याची पडताळणी होणे गरजेचे आहे. संवेदनशील ठिकाणांचे सर्वेक्षण, नियमित निरीक्षण आणि तक्रारींवर तातडीने कार्यवाही करणारे पथक नेमण्याची मागणी जोर धरत आहे.
मेट्रो जिन्यावर श्वानांचे ठाण
मेट्रो स्थानकांकडे जाणाऱ्या मार्गांवर तसेच मेट्रो पुलांच्या परिसरात श्वानांचा वावर वाढला आहे. पायी मेट्रो स्थानक गाठणाऱ्या प्रवाशांना अनेकदा श्वानांच्या कळपांमधून मार्ग काढावा लागतो. शालेय विद्यार्थी आणि महिला प्रवाशांसाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. प्रवासासाठी उभारलेल्या सुविधांच्या परिसरातच सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होणे ही गंभीर बाब आहे.
भोसरीत मोकाट कुत्र्याचा तरुणावर हल्ला
परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. बापुजी बुवा चौक परिसरात एका मोकाट कुत्र्याने कॉलेजमध्ये जाणाऱ्या युवकावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात तरुण जखमी झाला आहे. त्याला महापालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडले आहे.
हेमंत राठोड हा तरुण महाविद्यालयात जात असताना बापुजी बुवा चौक परिसरात कुत्र्याने हल्ला केला. ही घटना गुरुवारी (दि. २९) घडली. परिसरतील नागरिकांनी धाव घेत कुत्र्याच्या तावडीतून त्याची सुटका केली. त्यानंतर जखमी अवस्थेत त्याला पालिकेच्या रूग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले. परिसरातील गल्लीबोळात, बाजारपेठ, विविध रहदारीच्या मार्गावर मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर ठोस उपाय करण्याऐवजी प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एखाद्या नागरिकावर कुत्र्यांनी हल्ला केल्यानंतर किंवा गंभीर दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाने हालचाली करायच्या का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
आम्ही मुलांना उद्यानात खेळण्यासाठी घेऊन जातो. तसेच, मेट्रोने प्रवास करण्यासाठीही बाहेर पडतो, मात्र अनेक ठिकाणी श्वानांचे कळप बसलेले असतात. लहान मुलांना त्यांची भीती वाटते. श्वानांना हटविण्याचा प्रयत्न केला तरी ते हटत नाहीत. नागरिकांनी प्रत्येक वेळी स्वतःचा जीव सांभाळत सार्वजनिक ठिकाणी वावरायचे का? प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात.
मोहिनी साठे, स्थानिक
शहरातील सार्वजनिक ठिकाणे, उद्याने आणि मेट्रो परिसरात भटक्या श्वानांचा वाढता वावर लक्षात घेऊन महापालिकेकडून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्यात येत आहे. यापूर्वीही संबंधित भागांत श्वान पकडण्याची, त्यांची नसबंदी करण्याची आणि रेबीज प्रतिबंधक लसीकरणाची कार्यवाही करण्यात आली आहे, मात्र नागरिकांकडून नव्याने तक्रारी प्राप्त होत असल्याने अशा संवेदनशील ठिकाणांची पुन्हा पाहणी करण्यात येईल.
अरुण दगडे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी, महापालिका