

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरातील पहिला बहुउद्देशीय स्पोट्र्स क्लब नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियमवर उभारण्यात येणार होता. यासाठी महापालिकेने मोठा गाजावाजा केला. मात्र, निर्णय प्रत्यक्षात कागदावरच राहिल्याचे स्पष्ट होत आहे. महापालिकेने जाहीर केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबाबत अद्याप कोणतीही हालचाल सुरू नसल्याने शहरातील खेळाडूंमध्ये नाराजीची लाट आहे. जाहिरातीतला प्रकल्प वास्तवात कधी उतरणार? असा प्रश्न खेळाडू उपस्थित करत आहेत.
घोषणा मोठी काम शून्य
डेक्कन जिमखाना धर्तीवर पिंपरी-चिंचवड स्पोट्र्स क्लब उभारण्याचा निर्णय शहराच्या क्रीडा विकासाला नवे वळण देणारा ठरणार होता. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने स्टेडियमचा विकास करून क्रीडा, संस्कृती व मनोरंजन क्षेत्रात नवे संधी मार्ग उघडण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, घोषणेला दीड वर्ष उलटूनही शासन पातळीवरील निर्णय अंमलबजावणीशिवाय ठप्प आहे. प्रकल्पासाठी कोणतीही निविदा, नकाशा तयारी किंवा प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही.
खेळाडूंच्या अपेक्षा आणि प्रशासकीय मौन
महापालिकेने हा प्रकल्प जाहीर केला तेव्हा शहरातील क्रीडा संघटना व खेळाडूंनी आशेचे वातावरण व्यक्त केले होते, परंतु प्रत्यक्ष कामकाज सुरू न झाल्याने आता प्रकल्पाबाबत अनिश्चितता वाढली आहे. शासनाकडून किंवा महापालिकेकडून ठोस भूमिका न घेतल्याने क्रीडाक्षेत्राचा विकास थांबलेला आहे. शहरात क्रिकेट, जिम्नॅस्टिक्स, स्विमिंग, टेनिस, रोल बॉल आदीं खेळांचा प्रचंड प्रमाणात वाढता सहभाग असून, मोठ्या क्रीडा केंद्राची आवश्यकता अनेक वर्षांपासून व्यक्त होत आहे. मात्र, ही गरज पूर्ण करणारा प्रकल्पच कागदावर असल्याने क्रीडा क्षेत्राचा विकास रखडत आहे.
अण्णासाहेब मगर स्टेडियमवरील स्पोट्र्स क्लब प्रकल्प हा पिंपरी-चिंचवडच्या क्रीडा इतिहासातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकला असता; पण महापालिका आणि शासनाने या प्रकल्पाला गती दिल्याशिवाय शहराला आधुनिक, बहुउद्देशीय आणि दर्जेदार स्पोट्र्स क्लबचे स्वप्न केवळ कागदावरच राहणार आहे.
शहरातील अनेक खेळाडू पुण्यात प्रशिक्षणासाठी धाव घेतात. शहरात दर्जेदार स्पोट्र्स क्लब असता तर दर्जेदार प्रशिक्षण, स्पर्धा व सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध झाल्या असत्या.
चिराग माने, रावेत, खेळाडू
प्रकल्पात अपेक्षित असलेली प्रमुख वैशिष्ट्ये
26 एकर जागेतील व्यापक विकास योजना. संपूर्ण स्टेडियम परिसराचे आधुनिकीकरण क्रीडा व मनोरंजनाचे एकत्रित केंद्र निर्माण करणे. तसेच, आधुनिक, आकर्षक व प्रतिष्ठित वास्तुकला तयार करणे
डेक्कन जिमखाना धर्तीवरील बहुउद्देशीय स्पोट्र्स क्लब तयार करणे
क्रीडा, सांस्कृतिक व व्यावसायिक सुविधा एका छताखाली तयार करणे. यात शॉपिंग मॉल्स, हॉटेल्स, क्लब हाऊस, क्रीडा अकादमीचा समावेश
स्टेडियममधील प्रस्तावित क्रीडा व आरोग्य सुविधा. बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, स्वीमिंगपूल, जॉगिंग ट्रॅक, व्यायामशाळा, आरोग्य क्लबसह संपूर्ण फिटनेस सुविधा
सामाजिक व व्यावसायिक कार्यक्रमांसाठी जागा. बँक्वेट हॉल, मीटिंग रूम्स, बिझनेस सेंटरकार्ड, रूम रेस्टॉरंट्स व कॅफे
निवास व राहण्याची व्यवस्था, खेळाडू व पाहुण्यांसाठी रेसिडेन्शियल रूम्स
शासनाकडे मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. अद्यापपर्यंत याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे.
पंकज पाटील, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका