Pimpri Chinchwad Modified Silencer: पिंपरी-चिंचवडमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरवर दणका; ४१५ सायलेन्सर, ५९१ नंबर प्लेटवर कारवाई

सलग कारवाईचा परिणाम; ४० दिवसांत आढळलेल्या सायलेन्सरमध्ये १५३ ने घट
Pimpri Chinchwad Modified Silencer
Pimpri Chinchwad Modified SilencerPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये मॉडिफाइड सायलेन्सरचा कर्णकर्कश आवाज, नियमबाह्य नंबर प्लेट आणि वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्मविरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली आहे. मागील मोठ्या कारवाईत ५६८ सायलेन्सर आणि २ हजार ५६६ नियमबाह्य नंबर प्लेटवर कारवाई केल्यानंतर बुधवारी ४१५ सायलेन्सर आणि ५९१ नंबर प्लेटवर कारवाई करण्यात आली आहे.

Pimpri Chinchwad Modified Silencer
Navratri Fashion Shopping: नवरात्रोत्सवासाठी पिंपरी-चिंचवडच्या बाजारपेठा सजल्या; घागरा-चोली, केडियाला तरुणाईची पसंती

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने शहरातील १३ वाहतूक विभागांकडुन संयुक्त कारवाई करून मॉडिफाइड सायलेन्सर, नियमबाह्य नंबर प्लेट आणि वाहनांच्या काचांवरील काळ्या फिल्मवर कारवाई करण्यात आली. जप्त केलेले सायलेन्सर नष्ट करण्यात येत असून, नियमबाह्य नंबर प्लेट आणि इतर उल्लंघनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

यावर्षी फेब्रुवारीत ३९९ सायलेन्सर, त्यानंतर ऑगस्टमध्ये ५६८ सायलेन्सर आणि बुधवारी ४१५ सायलेन्सरवर कारवाई झाली आहे. आतापर्यंत १ हजार ३८२ मॉडिफाइड सायलेन्सरवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील ५६८ सायलेन्सरच्या कारवाईनंतर अवघ्या ४० दिवसांत ४१५ सायलेन्सर आढळले. मात्र, मागील कारवाईच्या तुलनेत या वेळी १५३ सायलेन्सरने घट झाली आहे. त्यामुळे सलग कारवायांनंतर नियमबाह्य सायलेन्सरचे प्रमाण काही प्रमाणात कमी होत असल्याचे चित्र आकडेवारीतून दिसत आहे.

Pimpri Chinchwad Modified Silencer
Pavana Dam Floating Solar: पवना धरणावर फ्लोटिंग सोलर पॅनेल; महापालिकेचा वीजनिर्मितीचा मोठा प्लॅन

नंबर प्लेट, काळ्या काचांवरही दणका

सायलेन्सरसह नियमबाह्य नंबर प्लेट आणि काळ्या फिल्मविरोधातही मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. फॅन्सी किंवा अस्पष्ट नंबर प्लेटमुळे वाहनाची ओळख पटविण्यात अडचणी येतात. तसेच, काळ्या काचांमुळे वाहनाच्या आतील हालचाली दिसत नसल्याने सुरक्षेच्यादृष्टीनेही त्याकडे गांभीर्याने पाहिले जाते. सलग तीन मोठ्या मोहिमांमुळे नियमबाह्य सायलेन्सर, नंबर प्लेट आणि काळ्या काचांविरोधातील कारवाईला सातत्य आले आहे. मागील कारवाईच्या तुलनेत आताच्या मोहिमेत सायलेन्सरची संख्या १५३ ने कमी होणे हे कारवाईचा परिणाम दिसू लागल्याचे संकेत मानले जात आहेत. मात्र, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ११ हजार ३४८ सायलेन्सरची प्रकरणे नोंदली गेल्याने प्रश्न अद्याप मोठा आहे.

Pimpri Chinchwad Modified Silencer
Pimpri Chinchwad Weather: पिंपरी-चिंचवडमध्ये ऑक्टोबर हिटचा कहर; तापमान ३६ अंशांवर

सायलेन्सरचा बाजार थांबविण्याचे आव्हान

रस्त्यावर मॉडिफाइड सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत असली तरी हे सायलेन्सर बाजारात उपलब्ध कसे होतात, त्यांची विक्री कोण करतो आणि बाहेरून त्यांचा पुरवठा कुठून होतो, हा मूळ प्रश्न आहे. त्यामुळे वाहनचालकांवरील कारवाईसोबतच सायलेन्सर विक्रेते आणि पुरवठादारांवरही कारवाई होणे आवश्यक ठरणार आहे.

Pimpri Chinchwad Modified Silencer
Pimpri Chinchwad Municipal Corporation: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक, क्षेत्रीय समिती सदस्यांच्या निवडीला ‘ब्रेक’!

जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत करण्यात आलेली कारवाई

  • एकूण कारवाई ६,१६,२०८

  • एकूण दंड ६८ कोटी ९७ लाख ८४ हजार ४५०

  • जड-अवजड वाहन कारवाई ८८,१७३

  • वाहतूक अडथळा ८७,३४३

  • सिग्नल जंपिंग ७९,५२९

  • हेल्मेट कारवाई ६२,७०१

  • ट्रिपल सीट ६१,५०६

  • नंबर प्लेट ५८,०४८

  • विनासिटबेल्ट २१,११७

  • मोबाईलवर बोलणे १८,०५८

  • सायलेन्सर ११,३४८

मॉडिफाइड सायलेन्सर, नियमबाह्य नंबर प्लेट आणि काळ्या काचांविरोधातील कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. मागील कारवाईनंतर अवघ्या ४० दिवसांत पुन्हा मोठ्या प्रमाणात नियमभंग आढळून आला असला, तरी कारवाईच्या सातत्यामुळे त्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. नागरिकांनी वाहनांमध्ये नियमबाह्य बदल करू नयेत. मॉडिफाइड सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषण वाढून इतर नागरिकांना त्रास होतो. वारंवार नियमभंग करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे.

डॉ. निलेश देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news