

पिंपरी: नवरात्रोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शहरातील बाजारपेठेत खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पिंपरी कॅम्प, चिंचवड स्टेशनरोड, भोसरी आणि आकुर्डी येथील कापड दुकानांमध्ये घागरा-चोली आणि केडिया कलेक्शन उपलब्ध झाले असून, खरेदीसाठी तरुणाईमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.
मिरर वर्क, पॉमपॉम लेस आणि मल्टीकलर बॉर्डर
यंदाच्या कलेक्शनमध्ये पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा संगम पाहायला मिळत आहे. महिलांसाठी खास १२ मीटर घेर असलेला गरबा घागरा, गजी सिल्क, कॉटन आणि रेयॉन फॅब्रिकमध्ये उपलब्ध आहे. बांधणी प्रिंट, मिरर वर्क भरतकाम, पॉमपॉम लेस आणि मल्टिकलर बॉर्डर हे यंदाचे मुख्य आकर्षण आहे. रंगांमध्ये गुलाबी, फिरोजी निळा, हळदी पिवळा आणि बॉटल ग्रीन या रंगांना सर्वाधिक मागणी आहे. दुकानदारांच्या माहितीनुसार, घागरा-चोलीची किंमत १५०० रुपयांपासून ६००० रुपयांपर्यंत आहे. अनेक दुकानांमध्ये ५०० ते ८०० रुपयांमध्ये भाडेतत्त्वावरही ड्रेस उपलब्ध आहेत.
केडिया, धोती, चुरणो आणि पगडी
पुरुषांसाठी यंदा केडिया-कुर्त्यामध्ये नवीन व्हरायटी आली आहे. शंभर टक्के कॉटनमध्ये हाताने बनवलेले मिरर वर्क, गुजराती टाके आणि बांधणी डिझाईन असलेले केडिया तरुणांमध्ये लोकप्रिय होत आहेत. यासोबत धोती, चुरणो आणि पगडी असा पूर्ण सेट १२०० ते ३५०० रुपयांत मिळत आहे. रॉयल ब्लू, लाल आणि हिरव्या रंगाच्या केडियाला जास्त मागणी आहे.
बाजारपेठेत कच्छ, गुजरात, बंजारा, इक्कत यातील घागरा चोलीचा पर्याय उपलब्ध आहे. यामध्ये मिरर वर्क, मेटल वर्क, धागा वर्क, गोंडे असलेले, चिकनकारी, फुलकारी घागरा पाहायला मिळतात. इक्कत, बांधणी प्रिंटमधील सिंपल घागरे देखील उपलब्ध आहेत.
कच्छी वर्क किंवा मिरर वर्क जॅकेट
एखाद्या कलरफुल किंवा व्हाईट कुर्त्यावर कच्छी वर्क किंवा मिरर वर्क असलेलं हा जॅकेट देखील खूप खरेदी केले जातात. नवरात्रीच्या फॅशनमध्ये पुरुषांसाठी केडीयावर देखील हे जॅकेट खूपच स्टायलिश लूक देतात. रेम्बो कलरमधील अशा प्रकारचे आऊटफिट्स सगळ्यांवर मॅच होतात. हे जॅकेट जीन्स आणि कॉटन शॉर्ट कुर्ती किंवा शर्टवर घालता येते.
व्यापारी वर्गाने सांगितले की, गेल्या काही वर्षांपासून गरबा आणि दांडियाचे आयोजन मोठ्या प्रमाणात होत असल्याने कपड्यांच्या विक्रीत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. सोशल मीडियावर रील बनवण्याच्या ट्रेंडमुळे तरुण-तरुणी एकापेक्षा जास्त ड्रेस खरेदी करत आहेत. येत्या आठवड्यात बाजारात आणखी गर्दी वाढण्याची अपेक्षा आहे.