

पिंपरी: गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असून, उत्सवाच्या खरेदीसाठी पिंपरी-चिंचवडकरांची मेट्रोला गर्दी होत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महामेट्रोने गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारता वाढविण्याचे नियोजन केले आहे. गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेत दर पाच मिनिटांनी मेट्रो सेवा सुरू करण्याचे नियोजन असल्याचे मेट्रो प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉपोरेशनकडून (महामेट्रो) वनाज-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड या दोन मार्गांवर मेट्रोसेवा दिली जाते. जून महिन्यात पिंपरी ते स्वारगेट व रामवाडी ते वनाज या दोन्ही मार्गांवर २० लाख प्रवाशांनी प्रवास केला. जुलै महिन्यात या दोन्ही मार्गांवर ४१ लाख १२ हजार ८४६ प्रवाशांची प्रवास केल्याची मेट्रोकडे नोंद आहे. यातून महामेट्रोला १० कोटी १४ लाख ४९ हजार ६६८ रुपयांचा महसूल मिळाला. ऑगस्ट महिन्यात या दोन्ही मार्गांवर ४७ लाख २१ हजार २०५ प्रवाशांची नोंद असून यातून महामेट्रोला ११ कोटी ३३ लाख ९८ हजार ५७९ रुपयांचा महसूल मिळाला आहे.
पुण्यात वनाझ-रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड स्वारगेट या दोन मार्गिकांवर मेट्रोसेवा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून मेट्रोची दैनंदिन प्रवासीसंख्या अडीच लाखांच्या जवळ पोहचली आहे. सध्या गणेश उत्सवानिमित्त प्रवाशांचे पुणे शहरात खरेदीसाठी ये-जा सुरू आहे. त्यामुळे महामेट्रोकडून गर्दीच्या ठिकाणी दर दहा मिनिटाला मेट्रोसेवा सुरू आहे. पण प्रवाशांची वाढलेली गर्दी पाहता मेट्रो सेवेचा कालावधी आणखी कमी करण्याचे नियोजन महामेट्रोकडून सुरू आहे.
त्यानुसार, महामेट्रोने गणेशोत्सवापासून गर्दीच्या वेळेस दर पाच मिनिटाला सेवा पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. तर विनागर्दीच्या वेळी दर १० मिनिटाला मेट्रोसेवा नेहमीप्रमाणे सुरू आहे. सध्या दोन्ही मार्गिकांवर मिळून दररोज सुमारे ५५४ फेऱ्यांद्रारे प्रवाशांना सेवा दिली जाते. वारंवारता पाच मिनिटांवर आणल्यानंतर फेऱ्यांची संख्या वाढणार असून, त्याचा थेट फायदा प्रवाशांना होणार आहे.
दोन्ही मार्गांवर महिन्याची सरासरी प्रवासी संख्या
जून महिन्यातील प्रवासी संख्या : २० लाख ५५८
महसूल : ३७ लाख ४० हजार ६८४
जुलै महिन्यातील प्रवासी संख्या : ४१ लाख १२ हजार ८४६
महसूल : १० कोटी १४ लाख ४९ हजार ६६८
ऑगस्ट महिन्यातील प्रवासी संख्या : ४७ लाख २१ हजार २०५
महसूल : ११ कोटी ३३ लाख ९८ हजार ५७९