

लोणावळा: शहरामध्ये दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी मंडळाकडून सुरू आहे. सालाबाद प्रमाणे यावर्षीदेखील शहरामध्ये मानाच्या तीन हंड्या असणार आहेत. यामध्ये शहरामधील सर्वांत जुनी दहीहंडी यांचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याकारणाने त्यांच्याकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मावळ वार्ता फाउंडेशन, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्स अँड डेव्हलपर्स स्पेस लिंक केबल नेटवर्क, लोणावळा शहर पत्रकार संघ व शहरातील सर्व राजकीय पक्ष व संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने ही दहीहंडी भरवली जाते. या ठिकाणी दहीहंडीला सलामी देणाऱ्या स्थानिक व बाहेरील संघांना मानधन दिले जाते. तसेच, हंडी फोडण्याचा मान हा शहरातील स्थानिक पथकांना दिला जातो. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त व्यसनमुक्तीवर जनजागृती व तरुणांना निरोगी शरीराचे महत्व विशद करण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या ठिकाणी दिला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी ही दहीहंडी होणार आहे.
स्थानिकांना हंडी फोडण्याचा मान
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुंगार्ली शाखा यांच्या वतीने लोणावळा नगर परिषदेत समोर दहीहंडी आयोजित केली जाणार आहे. या ठिकाणीदेखील स्थानिक व बाहेरील संघांना सलामीचे मानधन व दहीहंडी फोडण्याचा मान हा स्थानिक संघांना देण्यात येणार आहे. जयचंद चौक या ठिकाणी संकल्प युवा प्रतिष्ठानच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात रोख बक्षिसे तसेच दहीहंडी पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी खास लकी ड्रॉ या ठिकाणी आयोजित केला असून, विजेत्यासाठी इलेक्ट्रिक बाइक हे बक्षीस ठेवण्यात आले आहे.
उर्से मावळात श्रीकृष्ण जन्माष्टमीची जय्यत तयारी
उर्से मावळ : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त उर्से मावळ परिसरातील मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. मंदिराला आकर्षक रोषणाई आणि फुलांनी सजविण्यात आले आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष सुरक्षा व्यवस्था आणि दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे. मंदिराच्या गर्भगृहापासून ते बाहेरील परिसरापर्यंत रंगीबेरंगी विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. तसेच, विशेष महापूजा आणि अभिषेकही करण्यात येणार आहे. मध्यरात्री १२ वाजता होणाऱ्या मुख्य जन्मोत्सवासाठी मंदिर सज्ज झाले आहे. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे भाविकांच्या सुविधेसाठी मंडप उभारले आहेत.
‘उत्सवात सुरक्षेला महत्त्व द्या’
मावळ परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी गावोगावची गोविंदा पथके सज्ज झाली आहेत; परंतु प्रत्यके दहीहंडी कार्यक्रमाचे ठिकाण सुरक्षित असतेच असे नाही. त्यामुळे उत्सवात गोविंदांच्या सुरक्षेला महत्त्व देण्याची मागणी केली जात आहे. दहीहंडीचा उत्सव शनिवारी असून, त्यादृष्टीने आयोजकांची जोरदार तयारी सुरू आहे. अनेक ठिकाणी गोविंदा उंच थरावर थर रचतात. दहीहंडी फोडण्यासाठी आणि सलामी देण्यासाठी बारामती, इंदापूर आदी ठिकाणावरुन गोविंदा पथके येतात. दरवर्षी दहीहंडी फोडताना अनेक गोविंदा उंचावरुन खाली जखमी होतात. दहीहंडी फोडताना गोविंदा उंचावरून खाली पडले तर त्याला झेलण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा आयोजकांनी तत्पर ठेवली पाहिजे. तसेच, गोविंदांना हेल्मेट यासारखी सुरक्षा साधणे उपलब्द करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विद्युत तारा जवळच असल्यामुळे वीज कर्मचारी पथके तेथे तैनात ठेवणे आवश्यक आहे. उत्सवाच्या ठिकाणी रुग्णवाहिका सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. तसेच, वाहतूक कोंडी हाेऊ नये, यासाठी दक्षता घेण्याची मागणी केली जात आहे.
शहरात वाहतुकीचे नियोजन
तीनही आयोजकांकडून शहरामध्ये दहीहंडी महोत्सवाची जोरदार तयारी सुरू असल्यामुळे संपूर्ण शहर हे गोविंदामय झाले आहे. शहरातील 16 स्थानिक संघ या दहीहंडी महोत्सवात सहभागी होतात. तसेच, मुंबई व उपनगरामधील जवळपास 50 संघ शहरामध्ये दरवर्षी सलामीसाठी येत असतात. शहर पोलिसांच्या वतीनेदेखील याकरिता वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे.