

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरभरात नगरसेवक, पदाधिकारी तसेच, आमदार व खासदार यांचे नामफलक लावण्यात आले आहेत. त्यात भेदभाव केला जात असल्याचे चित्र आहे. प्रत्येक फलकाचा आकार वेगवेगळा असून, रंगसंगती भिन्न आहे. काही नगरसेवकांचे असंख्य फलक आहेत. तर, काहींचे फलकच लावले गेले नाहीत. क्षेत्रीय कार्यालयांच्या या मनमानीस चाप लावण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यातून महापालिकेच्या लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.
एका रंगसंगतीमध्ये आणि एकसमान आकाराचे सन्मानीयांचे नामफलक लावण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी संबंधित दहा क्षेत्रीय कार्यालयांकडून केली जाते. मात्र, त्या धोरणानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात नसल्याचे दिसून येत आहे. नामफलक हे एकसमान आकारात नसून, रंगसंगती ही वेगवेगळी आहे. कोठे गडद निळा व पांढरा, कोठे फिक्कट निळा व पांढरा, कोठे हिरवा व पांढरा, कोठे केसरी व पांढरा रंगात फलक लावण्यात आले आहेत. तर, काही नगरसेवक व पदाधिकार्यांचे संपर्क कार्यालय तसेच, जनसंपर्क कार्यालयाच्या भोवती असंख्य नामफलक लावण्याचे पाहावयास मिळत आहे. क्षेत्रीय कार्यालयांकडून महापालिका धोरणाला केराची टोपली दाखवली जात आहे. क्षेत्रीय अधिकार्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. या नियमबाह्य व हलगर्जी कारभारास चाप लावाण्याची गरज निर्माण झाली आहे.
कॉलनी, सोसायटी, वसाहतीचे नामफलकाचे वेगवेगळे रंग
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने आपल्या हद्दीत वेगवेगळ्या प्रकाराचे नामफलक लावले जातात. कॉलनी, हाऊसिंग सोसायटी, वसाहत, रुग्णालय, प्रार्थनास्थळ, उद्यान, मंडई, बाजारपेठ, बस थांबा, वाहनतळ, स्मशानभूमी अशा प्रकाराचे नामफलक लावले जातात. त्या फलकाची रंगरंगती वेगवेगळी आहे. पूर्वी पांढरा फलकावर हिरवा रंगातील अक्षराचे नामफलक होते. स्मार्ट सिटी कंपनीकडून फिक्कट निळा व पांढरा रंगात फलक लावले. आता गडद निळा आणि पांढरा रंगसंगतीत फलक लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी ते पांढरा-हिरवा रंगात फलक आहेत. त्यामुळे शहरात प्रत्येक भागांसाठी वेगळा रंग असे चित्र दिसून येत आहे.
संस्था, संघटना, मंडळांच्या फलकांची गर्दी
शहरभरात संस्था, संघटना, मंडळ, युनियन आदींचे नामफलक पदपथ, मोकळी जागा व रस्त्यांच्या कडेला लावण्यात आले आहेत. त्यासंदर्भात महापालिकेचे कोणतेही धोरण नाही. दिवसेंदिवस या फलकांची गर्दी वाढतच आहे. महापालिकेने कारवाई केल्यानंतर पुन्हा नामफलक लावले जातात. त्या फलकामुळे पादचार्यांसह वाहनचालकांना त्रास होतो. पदपथांवरील अशा फलकांमुळे नागरिकांना चालताना गैरसोय होते.
विरोधी नगरसेवकांचे फलक लावण्याकडे दुर्लक्ष
शहरात सत्ताधारी भाजपच्या नगरसेवक व पदाधिकार्यांचे जनसंपर्क कार्यालय आणि निवासस्थानाकडे जाणार्या रस्त्यांवर नामफलक लावण्यात आले आहेत. एकाच भागांत पाच ते सहा फलक दृष्टीस पडत आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नगरसेवकांचे निवासस्थान व जनसंपर्क कार्यालयाजवळ असे फलकच लावण्यात आलेले नाही. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधक असा भेदभाव क्षेत्रीय समितीकडून केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका दिप्ती कांबळे यांनी केला आहे.
महापालिका भवनातही नामफलकाची विसंगती
खुद महापालिका भवनात नामफलकांत विसंगती दिसून येत आहे. पदाधिकारी आणि अधिकार्यांच्या नामफलक वेगवेगळा आकारात आणि रंगात लावण्यात आले आहेत. हिरवा आणि पांढरा, निळा व पांढरा, सोनेरी व काळा अशा वेगवेगळा रंगात नामफलक दिसून येतात. तसेच, काही अधिकारी व कर्मचार्यांच्या नामफलकात आई व वडिलाचे नाव नमूद करण्यात आलेले नाही. काही अधिकार्यांचे नामफलक दोन दोनदा लावण्यात आले आहेत. काहीचे नामफलक चिकटपट्टीने लावले गेले आहेत. बीआरटी विभाग बंद होऊन अनेक वर्षे झाले तरी, तो नामफलक अजून कायम आहे.
नामफलक धोरणाचा विसर
नगरसेवकांचे एकसमान रंगसंगतीतील फलक, आकाराचे नामफलक असावेत, असे धोरण महापालिका आयुक्तांनी निश्चित केले होते. नगरसेवकांच्या कार्यालय व घराजवळील नामफलक एका आकाराचे तसेच, एका रंगसंगतीमध्ये लावण्याचा नियम करण्यात आला आहे. नामफलकात एकसमानता आणण्यासाठी त्यांचा आकार, रंगसंगती व नमुना निश्चित केला आहे. त्यावर महापालिकेचे अधिकृत बोधचिन्हही असते. अनधिकृत किंवा वेगवेगळ्या आकाराचे व रंगांचे फलक लावले जाऊ नयेत. महापालिकेच्या अधिकृत पदाची ओळख स्पष्ट व्हावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार फलकाचा आकार आणि त्याचा रंग ठरवून देण्यात आला आहे, जेणेकरून संपूर्ण शहरात नगरसेवकांच्या नामफलकांमध्ये एकसारखेपणा दिसेल. नगरसेवकांच्या नावाचा किंवा पदाचा गैरवापर टळावा आणि नागरिकांनाही लोकप्रतिनिधींची योग्य माहिती मिळावी हा यामागील मुख्य हेतू आहे. मात्र, त्या धोरणाचा क्षेत्रीय अधिकार्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे.
आईचे नावच गायब
लोकप्रतिनिधींसह अधिकारी व कर्मचार्यांच्या नामफलकावरील नावात आईचे नाव असावे, असा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मात्र, बहुतांश पदाधिकारी व नगरसेवकांच्या नामफलकांवर आईच्या नावास डच्चू दिल्याचे दिसत आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार नामफलकावर वडिलांसह आईच्या नावाचा ठळक उल्लेख असावा, असा निर्णय घेण्यात आला आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येत आहे.