

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर तसेच, उपमहापौरांची शुक्रवार (दि. 6) निवड झाली. या निवडीनंतर सुरू झालेल्या पंचवार्षिकेतील पालिकेच्या पहिल्या सभेला नगरसेवकांमध्ये दांडगा उत्साह दिसून आला. निवडणुकीच्या धामधुमीनंतर भेट झाल्याने अनेक नगरसेवकांनी एकमेकांना आलिंगन देत गप्पा मारल्या. पहिलीच महापालिका सभा, महापौर व उपमहापौर निवडीचा उत्साह, शुभेच्छा देण्यासाठी तोबा गर्दी असे सकारात्मक चित्र महापालिका भवनात शुक्रवारी दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे तो आनंदोत्सव एका मर्यादेतच होता.
, ,, , , , , , ,
बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे भोसरीतील नगरसेवक रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैशाली काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने निगडी-प्राधिकरणातील भाजपाच्या शर्मिला राजेंद्र बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली.
तब्बल चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट हटत लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार येणार असल्याने महापालिका भवनातील वातावरण शुक्रवारी उत्साही होते. महापालिका प्रवेशद्वारावर तसेच, यशवंतराव चव्हाण सभागृहाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. नवनिर्वाचित सर्व नगरसेवकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निवडणूक रणधुमाळीनंतर भेट होत असल्याने नगरसेवक एकमेकांची विचारपूस करत होते. महापालिकेच्या आवारात छायाचित्रे घेत होते. निवडीबद्दल एकमेकांचे अभिनंदनही करत होते.
दरम्यान, मुदतीमध्ये निवडणूक न झाल्याने 12 मार्च 2022 ला महापालिका बरखास्त होऊन, 13 मार्चपासून प्रशासकीय राजवट सुरू होती. महापालिकेचा संपूर्ण कारभार आयुक्तांमार्फत सुरू होता. ती राजवट महापौरांच्या निवडीपर्यंत सुरू होती. महापौर निवडीनंतर शुक्रवार (दि. 6) पासून प्रशासकीय राजवट संपुष्टात आली आहे. तब्बल चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधींच्या हाती कारभार आल्याने महापालिकेत खऱ्या अर्थाने लोकशाही राजवट सुरू झाल्याने नगरसेवकांसह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. महापौर व उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व अधिकार्यांनी गर्दी केली होती. यानिमित्ताने महापौर व उपमहापौर दालन फुलांनी सजविण्यात आले होते.
सभागृहात लष्कराच्या टोपीने वेधले लक्ष
पंचवार्षिकेतील पहिल्या सभेत केवळ दोन नगरसेवकांनी डोक्यावर टोपी घालती होती. भाजपाचे राजू मिसाळ यांनी डोक्यावर गांधी टोपी घातली होती. तर, निवृत्त सैनिक भाजपाचे कृष्णा सुरकुले यांनी लष्करी पेहराव केला होता. डोक्यावर निळ्या रंगाची टोपी घातली होती. तसेच, छातीवर लष्करी पदके लावली होती. त्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. ते दिघी-बोपखेल प्रभाग क्रमांक 4 मधून निवडून आले आहेत. त्यांनी भारतीय लष्करात ’वन झिरो वन इंजिनिअरींग रेजिमेंटमध्ये’ हवालदार म्हणून 17 वर्षे सेवा केली आहे. महापौर व उपमहापौर यांनी डोक्यावर रंगीबेरंबी व सोनेरी छटा असलेला फेटा घातला होता. मागील पंचवार्षिकेतील पहिल्या सभेत भाजपाचे नगरसेवक लक्ष्मण उंडे हे ही लष्करी वेषात सभागृहात आले होते. त्यांचे कोरोना काळात निधन झाले.
महापौर, उपमहापौरांतर्फे महापुरुषांना अभिवादन
महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे तसेच, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते व समर्थकांनी एकच गर्दी केली होती. महापौर लांडगे यांच्या दालनाबाहेर गर्दी झाली होती. त्यांंना शुभेच्छा देऊन छायाचित्र घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. शुभेच्छा स्वीकारल्यानंतर महापौर रवी लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांनी महापालिकेच्या आवारातील अण्णासाहेब मगर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पिंपरी चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच, शहरातील विविध ठिकाणच्या महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
नवीन नगरसेविकांकडून व्हिडिओ चित्रीकरण
नव्याने नगरसेवक झालेले व प्रथमच सभागृहात आलेल्या नगरसेवक व नगरसेविकाचा उत्साह दांडगा होता. महापालिका भवनाच्या आवारात तसेच, सभागृहात छायाचित्र, व्हिडिओ चित्रीकरण करण्यात अनेक नगरसेविका गुंग झाल्या होत्या. अनेकांनी सेल्फी घेतली. काहींनी महापालिकेच्या छायाचित्रकाराकडून स्वत:च्या मोबाईलवर छायाचित्र काढून घेतले.
दोन नगरसेवक गैरहजर
पहिल्या सर्वसाधारण सभेला दोन नगरसेवकांनी दांडी मारली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नगरसेविका माया बारणे आणि शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) नगरसेवक नीलेश बारणे हे दोघे गैरहजर होते. उर्वरित 126 नगरसेवक पहिल्या सभेला हजर होते. सभागृहात हजर झाल्यानंतर नगरसचिव विभागाच्या कर्मचार्यांकडून प्रत्येक नगरसेवकांची रजिस्टरवर सही घेतली जात होती.
नव्या महापालिका भवनाच्या आवारात अजितदादांचा पुतळा उभारणार
अजितदादा यांच्या निधनाच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. त्यांनी केलेला शहराचा 25 वर्षांचा विकास कोणी विसरणार नाही. नवीन नेतृत्व तसेच, नवीन पदाधिकारी शहराचा विकास करतील. शहर चांगल्या प्रकारे विकसित करू अशी संकल्पना आहे. नवीन प्रशासकीय इमारतीच्या आवारात अजितदादांचा पुतळा उभारण्यात येईल. तसेच, सभागृहात अजितदादांचे तैलचित्र लावले जाईल, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे म्हणाले. भाऊसाहेब भोईर यांनी दिलेल्या प्रस्तावाला त्यांनी अनुमोदन दिले.
गुलाल उधळण्यास, फटाके फोडण्यास फाटा
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. महापौर निवडीनंतर गुलाल, भंडारा न उधळता तसेच, फटाके न फोडण्याचे आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केले होते. त्यानुसार, महापालिका आवारात भंडारा उधळला गेला नाही. तसेच, फटाके फोडण्यात आले नाहीत. डीपी रॅकही लावण्यात आला नाही. त्यामुळे महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करून सभा 20 फेब्रुवारीपर्यंत तहकूब
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून महापौर रवी लांडगे यांनी सभा 20 फेब्रुवारी दुपारी एकपर्यंत तहकूब केली. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, अजितदादांचे अपघाती निधन शहरासाठी खूपच दु:खद घटना आहे. पिंपरी-चिंचवडच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. सभागृहात 80 टक्के नगरसेवक तर, शहरातील बाहेरील नेतेमंडळीही हे त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आहेत. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे महापालिकेत सत्ता आल्याने त्यांचे अभिनंदन. महापौर रवी लांडगे यांचे वडील व चुलत्यासोबत मी काम केले असून, आता रवी लांडगे यांच्यासोबत काम करणार आहे. भविष्यात त्यांच्या मुलासोबत काम करण्याची संधीही मिळेल, असे सांगताच सभागृहातील उपस्थितांनी त्यांच्या वाक्यास दाद दिली. चुकीच्या कामांना आम्ही विरोध करणार आहोत. भविष्यातील विचार करून शहर विकासासाठी भाजपाने ब्ल्यू प्रिन्ट काढावी. त्याला आम्ही सहकार्य करू. निवडणूक आयोगाने दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत खर्च करून नगरसेवक निवडून आल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन. अजितदादांनी शहराचा विकास केला आहे. त्यांच्या स्मृती कायम आठवणीत राहाव्या म्हणून महापालिकेच्या नवीन पालिका भवनात अजितदादांचा पुतळा उभारावा. तसेच, सभागृहात तैलचित्र लावले जावे, अशी मागणी केली.
बिनविरोध नगरसेवक अन् महापौरही
रवी लांडगे (41वर्षे ) हे भोसरीतील धावडेवस्ती प्रभाग क्रमांक सहामधून सलग दोन वेळा बिनविरोध निवडून आले आहेत. महापौरपदीही ते बिनविरोध निवडून आले आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बाल स्वयंसेवक आहेत. ते महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बाबासाहेब लांडगे यांचे पुत्र तर, भाजपाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक कै. अंकुशराव लांडगे यांचे ते पुतणे आहेत. प्रचंड विरोध असतानाही त्यांचे चुलते व वडीलांनी पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्ष शहरात रुजवला. अंकुशराव लांडगे यांची हत्या झाल्यानंतर अवघ्या 22 वर्षी रवी लांडगे यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली. सन 2017 ला चुलती आशाताई लांडगे या निवडून आल्या. भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्षपद त्यांनी सन 2015 ला सांभाळले. त्यानंतर फेब्रुवारी 2017 च्या निवडणुकीत ते बिनविरोध निवडून आले. महापालिकेचे नवीन भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा डाव त्यांनी हाणून पाडला होता. यंदाच्या निवडणुकीतही ते बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांची नगरसेवकपदाची ही दुसरी टर्म आहे. भोसरी परिसरात क्रीडा, सांस्कृतिक, धार्मिक, आरोग्य तसेच रोजगार शिबिराचे ते दरवर्षी आयोजन करतात. त्याचे डी फार्मसी शिक्षण झाले आहे. महापौर लांडगे यांच्या पत्नी डॉ. श्रद्धा लांडगे या माजी नगरसेविका आहेत.
निष्ठावंत शर्मिला बाबर यांच्या गळ्यात उपमहापौरपदाची माळ
उपमहापौर शर्मिला बाबर या भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आहेत. नगरसेवक पदाची त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्या निगडी, प्राधिकरण, आकुर्डी गावठाण प्रभाग क्रमांक 15 येथून सलग दोनदा भाजपाच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यांनी अ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपद भूषवले आहे. त्याचे पती हे राजेंद्र बाबर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते आहेत. प्राधिकरण, निगडी या उच्चशिक्षित परिसरातील नागरिकांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, स्वच्छता मोहिम, धार्मिक कार्यक्रम, व्याख्यान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, ज्येष्ठ नागरिकांसाठी शिबिर, वृक्षसंवर्धन, उद्यानांचा विकास आदी विविध उपक्रमांचे ते दरवर्षी आयोजन करतात.