

पिंपळे गुरव : पिंपरी-चिंचवड शहराला देशातील सर्वात स्वच्छ शहर बनविण्याच्या घोषणा प्रशासनाकडून केल्या जात आहेत. मात्र, पिंपळे गुरवमधील मोरया पार्क परिसरातील वास्तव चित्र पूर्णतः विपरीत दिसत आहे. येथील एका मोकळ्या भूखंडावर अक्षरशः कचरा, राडारोड्याचे डम्पिंग ग््रााउंड बनले आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघडपणे खेळ सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे.
मोरया पार्क परिसरातील या जागेवर काही बेजबाबदार नागरिकांकडून सर्रास कचरा टाकला जात आहे. सडलेले अन्न, प्लॅस्टिक कचरा आणि बांधकामाचा राडारोडा मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कडेला टाकण्यात
येत आहे. परिणामी परिसरात कचऱ्याच्या असह्य दुर्गंधीमुळे स्थानिक रहिवाशांचे दैनंदिन जीवन त्रस्त झाले आहे. कचऱ्याच्या ढिगांमुळे डास, माशा आणि भटक्या प्राण्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी तीव नाराजी आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली केवळ दिखावा केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. संबंधित विभागाने तात्काळ परिसराची स्वच्छता करावी. कचरा टाकणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करावी. सूचना फलक लावून परिसरावर नियंत्रण ठेवावे. नियमित कचरा संकलन व औषध फवारणी सुरू करावी, अशी मागणी होत आहे.
पिंपळे गुरव येथील मोरया पार्क परिसरातील मोकळ्या भूखंडावर परिसरातील नागरिक कचरा टाकत आहेत. यामुळे मोकाट जनावरे, भटकी कुत्री अन्नाच्या शोधात येथे येतात. कचरा रस्त्यावर व परिसरात पसरवत आहेत. यामुळे परिसराचे विद्रुपीकरणात भर पडत असून भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीविताला धोका संभवू शकतो. मोकाट जनावरे प्लॅस्टिक, अन्न खात असल्याने त्यांचे देखील आरोग्य धोक्यात येऊ शकते. यामुळे पालिकेच्या संबंधित विभागाने येथे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
कचऱ्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. महापालिकेने तात्काळ कचरा उचलून त्या ठिकाणची साफसफाई करावी.
सुरेश सकट, सामाजिक कार्यकर्ते
परिसर स्वच्छ राहावा यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. कुठेही कचरा टाकू नये. तो फक्त घंटागाडीतच टाकावा. कचरा टाकताना नियम मोडताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. शहरातील आठही झोनमध्ये तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करून कचरा घंटागाडीतच टाकावा.
प्रदीप ठेंगल, उपायुक्त, आरोग्य विभाग, मनपा.