

मिलिंद कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दररोज 1 हजार 500 टन कचरा जमा होतो. मात्र, सध्या सुमारे 2 हजार 100 टन कचरा गोळा केला जात आहे. वजन आणि फेरीनुसार महापालिकेकडून ठेकेदारांना बिले दिली जातात. कचरा डेपो बंद असल्याने साचलेला कचरा अजूनही उचलण्याचे काम केले जात असल्याने कचर्याचे वजन वाढल्याचा दावा अधिकार्यांकडून करण्यात येत आहे. तर, वजन वाढवण्यासाठी शहराच्या सीमेवरील भागांतील कचरा गोळा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.
शहराची लोकसंख्या 30 लाखांपुढे गेली असून, शहरात दररोज 1 हजार 500 टन ओला व सुका असा कचरा जमा केला जातो. घनकचरा व्यवस्थापनांतर्गत घरोघरचा कचरा गोळा करणे, मोशी कचरा डेपोपर्यंत त्याची वाहतूक करणे या कामासाठी बीव्हीजी इंडिया लिमिटेड आणि अॅन्टोनी लारा ठेकेदार कंपन्यांना काम दिले आहे. मात्र, सध्या शहरातील काही भागात कचरा संकलनाचे कामकाज विस्कळीत झाले आहे. कचरा संकलन करून मोशी येथे कचरा डंम्प केला जातो. डेपोत कचर्यावर कॅपिंग, लॅण्ड फिलिंग अर्थात शास्त्रीय भूभरण, यांत्रिकी खत प्रक्रिया, गांडूळ खत प्रकल्प, वेस्ट टू एनर्जी, सीएनजी निर्मिती अशा माध्यमातून कचर्यावर प्रक्रिया केली जात आहे. आठ जुलैच्या दुर्घटनेपासून वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद आहे.
तसेच, बायोमायनिंग केले जात आहे. असे असूनही, डेपोतील कचरा कमी होण्याऐवजी वाढतच आहे. मोशी डेपोत 8 जुलैला झालेल्या दुर्घटनेत 9 कर्मचार्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शहरात कचरा समस्या निर्माण झाली आहे. शहरात अनेक ठिकाणी कचर्याचे ढीग तयार झाले आहे. सध्या शहरात जमा झालेले ढीग डेपोत नेऊन टाकला जात आहे. त्यामुळे कचर्याचे वजन वाढल्याचे दावा आरोग्य विभागाने केला आहे.
कचर्याच्या वजनात तफावत
शहरात दररोज 1 हजार 500 टन कचरा जमा होतो, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात 1 हजार 800 टन कचरा गोळा होतो, असा दावा पर्यावरण सद्यस्थिती अहवालात करण्यात आला आहे. तर आता प्रत्यक्षात 2 हजार 100 टन कचरा जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. कचर्याच्या वजनाच्या आकडा प्रत्येक विभागाकडून वेगवेगळा आहे. तसेच, ठेकेदारांनी त्यांच्या भागात कचरा संकलनाचा उपठेका दिला आहे. यामुळे उपठेकेदारांना जगविण्यासाठी शहराबाहेरील कचरा जमा करून वजन वाढले जात आहे, असा आरोप केला जात आहे.
अनफिट वाहनाबाबत महापालिकेकडून कारवाई नाही
घरोघरचा कचरा जमा गोळा करून घंटागाडीद्वारे संकलन केंद्रांवर आणला जातो. शहरात 28 कचरा संकलन केंद्र आहेत. तेथून तो कचरा कॅप्सूल वाहनांतून मोशी डेपोत नेऊन टाकला जातो. एकूण 520 वाहनांद्वारे कचर्याची वाहतूक केली जाते. मात्र, यातील काही वाहनांचे आयुर्मान संपले असतानाही वापर होत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. विविध नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कचरा संकलन व वाहतूक करणार्या एकूण 34 वाहनांच्या मालकांना एकूण दीड लाख दंड करण्यात आला आहे. अशा वाहनांवर तसेच, ठेकेदारांवरही महापालिकेकडूनही कारवाई केली जाईल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
जमा होणारा कचरा
सध्या शहरातून सर्वाधिक प्रमाणात प्लास्टिकचा कचरा जमा होत आहे. त्यात प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, वस्तूंचे प्रमाण अधिक असते. जैविक कचरा, गोणी पिशव्या, सॅनिटरी नॅपकिन्स, नारळाच्या शेंड्या, लाकूड, पाला पाचोळा, कागद, चमडे, कापड, इलेक्ट्रिक कचरा, सिरेमिक, धातू, घरगुती घातक कचरा, काच, स्पंज, थर्माकाल आदी कचरा जमा होतो. मेडिकल वेस्ट कचरा गोळा करण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र यंत्रणा नेमली आहे.
साचलेला कचरा नेला जात असल्याने वजन वाढले आहे
शहरात सध्या दोन हजार टन असा वाढीव कचरा दिसत असला तरी मध्यंतरी मोशी कचरा डेपो बंद होता. त्यामुळे वेगवेगळ्या भागात साचलेला कचरा आता मोशी डेपोवर नेला जात असल्याने वाढ दिसत आहे. शहरात साचलेला सर्व कचर्याची विल्हेवाट लागल्यानंतर दररोजचे कचर्याचे वजन पूर्वीप्रमाणे असेल. शहर हद्दीबाहेरील कचरा आपण गोळा करत नाही. शहरात कचरा आणून टाकणार्यांवर कारवाई करण्यात आली आहे. काही प्रमाणात कचरा संकलन विस्कळीत झाले आहे. ते आठवडाभरात सुरळीत होईल. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई केली जाणार आहे. अनफिट वाहनाबाबत ठेकेदार कंपन्यांशी पत्रव्यवहार केला आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
कचर्याची जबाबदारी दोन विभागाकडे; समन्वयाचा अभाव
शहरातील कचरा गोळा करण्याचे काम आरोग्य विभागाकडून केले जाते. घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे. दुकानदार, विक्रेते, व्यावसायिक आस्थापनांचा कचरा जमा करन त्यांची मोशी कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणे. रस्ते साफसफाई करणे, सार्वजनिक व सामुदायिक शौचालय व मुतार्यांची सफाई करणे. ओला व सुका कचरा विलगीकरण करणे, नालेसफाई करणे. स्वच्छतेबाबत शहरात जनजागृती मोहीम राबवणे आदी कामकाज आरोग्य विभागाकडे आहे. तर, जमा झालेल्या कचर्यावर प्रक्रिया करण्याचे काम पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून केले जात आहे. कचर्यापासून वीज तयार करणे. हॉटेल वेस्टपासून बायोसीएनजी तयार करणे, कचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी बायोमायनिंग करणे, घरगुती ओल्या कचर्यापासून कंपोस्ट खत निर्माण करणे, प्लास्टिक कचर्याचे पुनर्वापर करणे व इंधन तयार करणे, नदीपात्रातील जलपर्णी काढणे. रस्ते, उड्डाण पूल व दुभाजक, कठडे धुणे. कचरा स्थानांतरण केंद्र उभारणे. तसेच, मैलासांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) संचालन करणे आणि नदी सुधार प्रकल्प आदी कामे पर्यावरण विभागाकडे आहे.
कचर्याचे गणित जुळेना
पर्यावरण सद्यस्थिती अहवालानुसार वाढीव 1 लाख 5 हजार 772 टन कचर्यांचे गणित जुळेना पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडून दरषर्वी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल तयार केला जातो. सन 2026-26 वर्षातील अहवालात शहरात दररोज जमा होणार्या कचर्याच्या वजनात तफावत दिसत आहे. आरोग्य विभागाकडून कचर्याचे वजन कमी दाखवले जाते. तर, पर्यावरण विभागाकडून अधिक वजन दाखवले जाते. आरोग्य विभागानुसार दररोज 1 हजार 57.58 टन कचरा जमा होतो. त्यानुसार, वर्षभरात एकूण 5 लाख 50 हजार 268. 46 टन कचरा मोशी डेपोत डम्प करण्यात आला. पर्यावरण विभागानुसार दररोज 1 हजार 797.37 टन कचरा जमा होत असून, वर्षभरात एकूण 6 लाख 56 हजार 40.72 टन कचरा जमा झाल्याचे आकडेवारीत नमूद केले आहे. त्या आकडेवारीत तब्बल 1 लाख 5 हजार 772.26 टन वजनांची तफावत दिसत आहे. या प्रकारावरून शंका उपस्थित होत आहे.