

संतोष शिंदे
पिंपरी: गणेश विसर्जनानंतर पाण्यावर तरंगणाऱ्या, अर्धवट विसर्जित झालेल्या किंवा पाण्यातून बाहेर काढून संकलित केलेल्या गणेशमूर्तींचे फोटो आणि व्हिडीओ काढून ते समाजमाध्यमांवर प्रसारित करणे आता महागात पडू शकते. अशा दृश्यांमुळे धार्मिक भावना दुखावून सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्यावर प्रतिबंध घातला आहे. हा आदेश संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान लागू असून, उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ नुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून हा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. विसर्जनानंतर काही गणेशमूर्ती पाण्यावर तरंगताना किंवा अर्धवट अवस्थेत दिसतात. कृत्रिम तलावांची स्वच्छता करताना मूर्ती बाहेर काढून एका ठिकाणी संकलित कराव्या लागतात. त्यानंतर त्यांची वाहतूक आणि पुढील व्यवस्थापन केले जाते. या प्रक्रियेतील एखादे दृश्य संपूर्ण पार्श्वभूमीशिवाय समाजमाध्यमांवर गेल्यास त्याचा वेगळा अर्थ काढला जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक पाऊल उचलले आहे.
नेमके कशावर निर्बंध?
कृत्रिम तलाव, नैसर्गिक तलाव, नदी, खाडी, सार्वजनिक विहीर तसेच अन्य जलस्रोतांमध्ये विसर्जनानंतर तरंगणाऱ्या किंवा अर्धवट तरंगणाऱ्या गणेशमूर्तींचे छायाचित्रण करण्यास आदेशात मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर पाण्यातून बाहेर काढलेल्या व संकलित केलेल्या मूर्ती, कृत्रिम तलावांच्या स्वच्छतेची प्रक्रिया, एका ठिकाणी जमा केलेल्या मूर्ती तसेच त्यांच्या वाहतूक आणि व्यवस्थापनादरम्यानची धार्मिक भावना दुखावणारी किंवा सार्वजनिक शांततेवर परिणाम करणारी छायाचित्रे अथवा चित्रफिती प्रकाशित आणि प्रसारित करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. यामुळे केवळ समाजमाध्यमांवर 'व्हायरल' करणेच नव्हे, तर आदेशाच्या कक्षेत येणारी संवेदनशील दृश्ये काढणे आणि त्यांचा सार्वजनिक प्रसार करणे या दोन्ही बाबींवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
छायाचित्रातून वेगळा अर्थ
विसर्जनानंतर महापालिका किंवा अन्य यंत्रणांकडून केली जाणारी स्वच्छता आणि मूर्तींच्या व्यवस्थापनाची संपूर्ण प्रक्रिया एका छायाचित्रातून समोर येत नाही. एखाद्या ठिकाणी पुढील व्यवस्थापनासाठी संकलित करून ठेवलेल्या मूर्तींचा फोटो कोणताही संदर्भ न देता प्रसारित केल्यास त्या मूर्तींची अवहेलना करण्यात आल्याचा समज निर्माण होऊ शकतो. धार्मिक विषयाशी संबंधित अशा पोस्ट काही वेळात मोठ्या प्रमाणावर पसरल्यास नागरिकांमध्ये संताप निर्माण होणे, प्रशासनाबाबत गैरसमज पसरणे किंवा संबंधित ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिस्थिती चिघळल्यानंतर हस्तक्षेप करण्यापेक्षा संवेदनशील दृश्यांच्या बेजबाबदार प्रसाराला आधीच प्रतिबंध करण्याची भूमिका पोलिसांनी या वेळी घेतली आहे
सलग १३ दिवस आदेशाची अंमलबजावणी
पोलिस सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर यांनी ८ सप्टेंबर रोजी हा आदेश जारी केला. आदेश १४ सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत लागू असणार आहे. प्रत्येकाला स्वतंत्र नोटीस बजावणे शक्य नसल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ (२) अंतर्गत आदेश एकतर्फी जारी करण्यात आला आहे. नागरिकांना त्याची माहिती व्हावी यासाठी पोलिस ठाणे, सहायक पोलिस आयुक्त आणि परिमंडळीय पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
प्रभारींवर कारवाईची जबाबदारी
मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ नुसार कारवाई करण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यामुळे आदेशाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर राहणार आहे.
वसईतील फोटोने उसळला संताप
अशा दृश्यांच्या प्रसारानंतर निर्माण होणाऱ्या प्रतिक्रियेचे उदाहरण वसईत नुकतेच समोर आले. वसई किल्ला परिसरातील जेट्टीजवळ अनेक विसर्जित गणेशमूर्ती अस्ताव्यस्त अवस्थेत दिसल्याची छायाचित्रे समोर आल्यानंतर स्थानिकांमध्ये संताप व्यक्त झाला आणि कारवाईची मागणी करण्यात आली. दुसरीकडे, संबंधित मूर्ती तेथे टाकण्यात आलेल्या नसून त्या पाण्याबरोबर किनाऱ्यावर वाहून आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेतूनही संदर्भाशिवाय समोर येणारे दृश्य आणि प्रत्यक्ष परिस्थिती यामध्ये फरक असू शकतो, हे स्पष्ट झाले आहे. धार्मिक भावना जोडलेल्या विषयात अशा पोस्टचा परिणाम वेगाने होत असल्याचे मत पोलिसांचे आहे.
'पोस्ट' करण्याआधी आदेश लक्षात घ्या
विसर्जनानंतरची छायाचित्रे किंवा व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकताना नागरिकांनी आदेशाची नोंद घ्यावी. विसर्जन व्यवस्थापनातील त्रुटींबाबत नागरिकांनी तक्रार करू नये, असा या आदेशाचा उद्देश नाही. मात्र, आदेशात मनाई केलेल्या प्रकारची छायाचित्रे किंवा व्हिडीओ काढणे आणि प्रसारित करणे टाळावे. एखाद्या प्रकाराबाबत आक्षेप असल्यास तो सोशल मीडियावर व्हायरल करण्याऐवजी संबंधित यंत्रणा किंवा पोलिसांना माहिती द्यावी.
गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि सार्वजनिक सहभागाचा उत्सव आहे. विसर्जनानंतरच्या व्यवस्थापन प्रक्रियेतील काही छायाचित्रे किंवा व्हिडीओ संदर्भाशिवाय समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यास गैरसमज निर्माण होऊन धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. नागरिकांनी अशा संवेदनशील दृश्यांचे छायाचित्रण किंवा प्रसारण टाळावे आणि समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर करावा. कायदा व सुव्यवस्था आणि सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.