Engineering Student Patents: पेटंट ते प्रॉडक्ट! पिंपरी-चिंचवडमध्ये विद्यार्थ्यांच्या संशोधनाला उद्योगांची पसंती

पीसीसीओईची तीन वर्षांत १०१ पेटंट दाखल व प्रकाशित, ३७ पेटंट मंजूर; कल्पनांचे व्यावसायिकीकरण करून बाजारपेठ मिळविण्यावर भर
Engineering Student Patents
Engineering Student PatentsPudhari
Published on: 
Updated on: 

बजरंग मासाळ

पिंपरी: पिंपरी-चिंचवडची ओळख उद्योगनगरी म्हणून असली, तरी शहराच्या तांत्रिक शिक्षणविश्वात आता ‘कल्पना ते पेटंट आणि पेटंट ते बाजारपेठ’ असा महत्त्वाचा बदल घडताना दिसत आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे संशोधन केवळ प्रकल्प, प्रदर्शन किंवा शैक्षणिक नोंदीपुरते मर्यादित राहत नसून, उद्योगांकडून या संशोधनाची उपयुक्तता तपासली जात असून, त्याच्या व्यावसायिकीकरणासाठी पुढाकार घेतला जात आहे. संस्थेच्या पेटंट तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण झाल्याने विद्यार्थ्यांच्या संशोधनाला प्रत्यक्ष बाजारपेठ मिळण्याची शक्यता आता अधिक ठळक झाली आहे.

Engineering Student Patents
Ravet Waste to Energy Project: मोशीचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प बंद; रावेतमध्ये २७ मेगावॅटचा नवा प्रकल्प उभारण्याच्या हालचाली

पेटंट ते प्रोटोटाईप अन् प्रोटोटाईप ते व्यावसायिक उत्पादन

पेटंट मिळाल्यानंतर त्याचे व्यावसायिकीकरण करण्यासाठी उद्योगांशी तंत्रज्ञान हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू होत आहे. संशोधनाचा वापर प्रत्यक्ष उत्पादन किंवा सेवेत होऊ शकतो का, त्यासाठी उद्योग किती गुंतवणूक करू शकतो आणि तंत्रज्ञानाचा बाजारातील उपयोग किती आहे, याचा विचार केला जात आहे. त्यामुळे पेटंटपासून प्रोटोटाइप आणि प्रोटोटाइपपासून व्यावसायिक उत्पादन असा प्रवास आता सुरू झाला आहे.

वाहनापासून पर्यावरणापर्यंत संशोधन

विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून विकसित होणाऱ्या संशोधनाची दिशा बदलत आहे. वाहनांचा इंधनखर्च व उत्सर्जनाचा रिअल-टाइम मागोवा घेणारी प्रणाली, शेतीजन्य पदार्थांपासून पाण्यातील रंगद्रव्य कमी करण्याचे तंत्रज्ञान आणि एआय आधारित एलपीजी गुणवत्ता तपासणी उपकरण अशा विविध विषयांवर पेटंट नोंद झाली आहे. म्हणजेच संशोधन केवळ प्रयोगशाळेतील तांत्रिक प्रयोग न राहता शहरासमोरील आणि उद्योगांसमोरील प्रत्यक्ष समस्यांवर केंद्रित होत आहे.

Engineering Student Patents
Pimple Gurav Stray Dogs: पिंपळे गुरवमध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव; तुळजाभवानी मंदिराकडे जाणारा पदपथ धोकादायक

विद्यार्थ्यांच्या कल्पनेला आता आर्थिक मूल्य

विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कल्पनेला पेटंट मिळणे ही पहिली पायरी आहे. मात्र, त्याच तंत्रज्ञानासाठी उद्योग परवाना घेत असेल किंवा विक्रीतून संशोधन संस्थेला रॉयल्टी मिळत असेल, तर त्या कल्पनेला प्रत्यक्ष आर्थिक मूल्य प्राप्त होते. विद्यार्थ्यांसाठी ही बाब संशोधनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारी ठरू शकते.

उद्योगाची गरज, विद्यार्थ्यांचा उपाय

पिंपरी-चिंचवडमधील मोठ्या औद्योगिक पट्ट्यामुळे शिक्षणसंस्था आणि उद्योग यांच्यातील दुवा अधिक मजबूत होण्याची गरज आहे. उद्योगांसमोरील समस्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आणि त्यावर संशोधन झाले, तर ‘समस्या–संशोधन–पेटंट–तंत्रज्ञान हस्तांतरण–व्यावसायिकीकरण’ अशी साखळी तयार होऊ शकते. यामुळे स्थानिक उद्योगांना स्थानिक पातळीवरच तांत्रिक उपाय उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Engineering Student Patents
NCMC Card Overcharging: एनसीएमसी कार्डच्या नावाखाली प्रवाशांची लूट; एसटी प्रशासनाची कारवाई, पण पर्यायी केंद्राची माहितीच नाही!

आता मोजमाप ‘पेटंट’चे नव्हे, ‘परिणामाचे'

शिक्षणसंस्थांकडे किती पेटंट आहेत, हा आकडा महत्त्वाचा असला तरी त्यापुढील प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. त्यापैकी किती पेटंट उद्योगात पोहोचली? किती तंत्रज्ञानाचे व्यावसायिकीकरण झाले? किती उत्पादनांची निर्मिती झाली? संशोधकांना त्यातून किती आर्थिक परतावा मिळाला? या प्रश्नांची उत्तरेच शहरातील संशोधनाची खरी ताकद ठरवणार आहेत.

१०१ पेटंट; ३७ पेटंट मंजूर

पिंपरी-चिंचवडमधील तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये संशोधनाचा वाढता आवाका दिसून येत आहे.पीसीसीओई (PCCOE) च्या गेल्या तीन वर्षात आतापर्यंत १०१ पेटंट दाखल व प्रकाशित, तर ३७ पेटंट मंजूर झाले आहेत. त्यामुळे पेटंट निर्मितीबरोबरच आता त्यांचे पुढे काय होते, याकडे लक्ष वेधले जात आहे.

पेटंटपासून ‘प्रॉडक्ट’पर्यंत

पिंपरी-चिंचवडमध्ये संशोधनाची दिशा आता हळूहळू बदलत आहे. विद्यार्थ्यांची कल्पना → पेटंट → उद्योगाची दखल → तंत्रज्ञान हस्तांतरण → व्यावसायिकीकरण हा प्रवास प्रत्यक्षात येऊ लागल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे शहरातील शिक्षणसंस्थांसाठी पुढील आव्हान केवळ अधिक पेटंट मिळविण्याचे नसून, त्या पेटंटचे उद्योगातील प्रत्यक्ष उत्पादनात रूपांतर करण्याचे आहे.

Engineering Student Patents
Jewellers Gold Seizure Video Recording: सराफांच्या दुकानांतून सोने जप्त करताना पोलिसांना व्हिडीओ चित्रीकरण बंधनकारक

विद्यार्थ्यांचे संशोधन केवळ शैक्षणिक प्रकल्प किंवा प्रदर्शनापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष उद्योगांच्या गरजा सोडविणारे असणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाकडून मागणी मिळत असेल, तर त्यातून संशोधनाची संस्कृती अधिक मजबूत होईल. विद्यार्थ्यांना पेटंटबरोबरच त्याचे पुढे व्यावसायिकीकरण कसे करता येईल, याचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे

प्रा. (डॉ.) नीलकंठ बी. चोपडे, प्राध्यापक व उपसंचालक, पीसीसीओई, निगडी

विद्यार्थ्यांच्या संशोधनाला पेटंट मिळणे ही केवळ पहिली पायरी आहे. त्या संशोधनाचा प्रत्यक्ष उद्योगात वापर होणे आणि त्याचे व्यावसायिकीकरण होणे हा त्यापुढील महत्त्वाचा टप्पा आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना उद्योगाकडून मागणी मिळू लागल्याने त्यांना संशोधन, नवकल्पना आणि तंत्रज्ञान निर्मितीकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची प्रेरणा मिळत आहे.

प्रा. (डॉ.) सोनाली डी. पाटील, प्राध्यापक व विभागप्रमुख, संगणक अभियांत्रिकी विभाग, पीसीसीओई, पुणे

सुरुवातीला हे संशोधन करताना त्याचा प्रत्यक्ष उद्योगात वापर होईल, याची कल्पना नव्हती. पेटंट मिळाल्यानंतर जेव्हा या तंत्रज्ञानाच्या व्यावसायिक वापरासाठी पुढची प्रक्रिया सुरू झाली, तेव्हा आपल्या केलेल्या कामाला प्रत्यक्ष मूल्य मिळत असल्याची जाणीव झाली.

प्रतीक जगदाळे, विद्यार्थी, पेटंट संशोधक, पीसीसीओई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news