

पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये एचसीएमटीआर (उच्च क्षमता द्रुतगती मार्ग); तसेच बीआरटीएस मार्गावर ईटीआरएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) म्हणजेच इलेक्ट्रिक मेट्रो बस धावणार आहे. त्या प्रकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदिल दाखविला आहे. त्यामुळे शहराला वेगवान सार्वजनिक वाहतूक उपलब्ध होणार आहे. काम पूर्ण झाल्यास तो देशातील पहिला प्रकल्प ठरू शकतो.
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती लोकसंख्या, वेगाने वाढणारे शहरीकरण व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील वाढता ताण लक्षात घेऊन भविष्यातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान व प्रवाशाभिमुख करण्याच्या दृष्टीने अंतर्गत रिंग रोड व वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि. २७) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली.
बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीम कुमार गुप्ता, अपर मुख्य सचिव के. एच. गोविंदराज, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीचे आयुक्त अभिजित चौधरी, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आदी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी ई-आरटीएस इलेक्ट्रिक मेट्रोच्या संकल्पनेची माहिती दिली. ही प्रणाली मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित व आरामदायी असून, रबर टायरवर धावणार्या पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांवर आधारित आहे. एका वाहनामध्ये सुमारे २४० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. पहिल्या टप्प्यातील १७ किलो मीटर अंतराचा मार्ग यशस्वी झाल्यानंतर अंतर्गत रिंग रोड व शहरातील सर्व बीआरटी मार्गांवर ई-आरटीएस प्रणालीचा टप्प्याटप्प्याने विस्तार करण्यात येणार आहे. शहरातील सर्व मेट्रो स्टेशन, रेल्वे स्टेशन, पीएमपीएल बस थांबे व इतर सार्वजनिक वाहतूक सेवेशी जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास, प्रदूषणात घट होण्यास, सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढण्यास तसेच, नागरिकांना अधिक सुरक्षित, जलद व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.
सादरीकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, पवार तसेच, वरिष्ठ अधिकार्यांनी या नवीन मार्गाचे स्वागत करून प्रकल्पास मान्यता दिली आहे. महापालिकेने ई-आरटीएस प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी. प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व कार्यवाही गतीने करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.
नाशिक फाटा ते चाकण निओ मेट्रो डीपीआर गुंडाळला
कासारवाडी येथील नाशिक फाटा ते चाकण या १६.११ किलोमीटर अंतराच्या मार्गावर हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड निओ मेट्रोचा मूळ डीपीआर आणि सुधारित डीपीआर महामेट्रोने तयार केला होता. तो १ हजार ५४८ कोटी १४ लाख रुपये खर्चाचा डीपीआर २३ डिसेंबर २०२२ ला पिंपरी-चिंचवड महापालिकेस सादर करण्यात आला. निओ मेट्रो लोखंडी रुळांऐवजी रबरी टायरवर धावते. त्याच्या एका डब्यात (कोच) १८० ते २५० प्रवासी प्रवास करू शकतात. एकाच वेळी तीन डब्यासह ती धावते. देशात कोठेचे निओ मेट्रो धावत नसल्याने तत्कालीन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पास हिरवा कंदील दिला नव्हता. त्यामुळे निओ चा डीपीआर गुंडाळण्यात आला. आता नव्या नाव्याने तो समोर आणण्यात आला आहे.
अंतर्गत रिंग रोड ३१.४० कि.मी.चा
शहराचा एचसीएमटीआर ३१.४० किलोमीटर अंतराचा आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शन नगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, वेंगसकर क्रिकेट अकादमी, संचेती स्कूल, क्रांतीवीर नगर, थेरगाव, बिर्ला रुग्णालय, वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्टेशन, निसर्ग दर्शन सोसायटी, निगडीतील भक्ती-शक्ती चौक, स्पाइन रस्ता, त्रिवेणीनगर, रुपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनी (मर्सिडीज बेंझ), इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर महाराज क्रीडा संकुल, इंद्रायणीनगर चौक, टेल्को रस्ता, लांडेवाडी असा मार्ग आहे.
गोडाऊन चौक ते वाकड चौक असा इलेक्ट्रिक मेट्रोचा मार्ग
पहिल्या टप्प्यात १७ किलो मीटर अंतराच्या बीआरटीएस मार्गावर प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. भोसरीतील गोडाऊन चौक, स्पाईन रस्ता, कुदळवाडी चौक, चिंचवड येथील ऑटो क्लस्टर, मदर टेरेसा उड्डाण पुल, काळेवाडी फाटा, जगताप डेअरी चौक येथून वाकड या बीआरटी मार्गावर ई-आरटीएस मेट्रो मार्गाचे नियोजन आहे. हा प्रकल्प महामेट्रोच्या सहकार्याने सुमारे एक ते दीड वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर कार्यान्वित करण्याचे नियोजन आहे.
वाढत्या पिंपरी-चिंचवडसाठी तातडीने अंतर्गत रिंग रोड विकसित करा : मुख्यमंत्री
पिंपरी चिंचवड शहराने पुण्याप्रमाणे एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट-अंतर्गत रिंग रोड) आणि ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) या सार्वजनिक वाहतूक प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती द्यावी. पिंपरी चिंचवड महापालिकेने या प्रकल्पासाठी आवश्यक प्रशासकीय, तांत्रिक व नियोजनासंदर्भातील सर्व कार्यवाही तातडीने सुरू करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत पूर्ण करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिल्या आहेत.
इलेक्टिक मेट्रोची तातडीने अंमलबाजवणी करणार
पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन एचसीएमटीआर आणि ई-आरटीएस या एकात्मिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मांडली. त्यांनी त्या प्रकल्पाचे स्वागत केले आहे. शहरातील मेट्रो, बीआरटी, पीएमपीएल बस आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांना प्रभावीपणे जोडणारी, पर्यावरणपूरक, उच्च क्षमतेची आणि प्रवाशाभिमुख अशी ही प्रणाली विकसित करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.