

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागविणारे मावळ तालुक्यातील पवना धरण १०० टक्के भरले आहे. तरीही, शहरात २० जूनपासून सुरू असलेली १५ टक्के पाणी कपात तात्काळ रद्द केली जाणार नाही, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत धरणात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्यास त्यावेळेस कपात रद्द करण्याचा विचार केला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिकेच्या सोमवार (दि. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणी कपात रद्द करण्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला होता. दुसर्या दिवशी मंगळवार (दि. २८) आयुक्तांसोबत बैठक घेऊन कपात रद्द केली जाईल, अशी घोषणा सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सभागृहात केली होती. त्यासंदर्भात आयुक्तांसोबत पदाधिकार्यांची बैठक झाली.
यावेळी सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर व विविध समितीचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते. पदाधिकार्यांनी शहरातील पाणी कपात तात्काळ रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे लावून धरली.
मात्र, आयुक्तांनी पाटबंधारे विभागाने आत्ताच पाणी कपात रद्द करण्यास नकार दिल्याचे स्पष्ट केले आहे. पवना धरणात ऑक्टोबर २०२६ पर्यंत १०० टक्के पाणी साठा उपलब्ध असल्यास कपात रद्द करण्याबाबत विचार केला जाईल. सध्याचा पाऊस किती काळ असेल, पावसाच्या संपूर्ण हंगामात पाऊस असेल का याचा अंदाज नाही.
त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक असल्याचे त्या पाटबंधारे विभागाचे मत आहे. पाटबंधारे विभागाने परवानगी दिल्यास महापालिका कपात रद्द करेल, असे पदाधिकार्यांना सांगण्यात आले आहे. त्यामुळे सध्या तरी पाणीकपात कायम राहणार आहे.