

पिंपरी: साप्ताहिक सुटी रविवारचा मुहूर्त साधत राजकीय पक्षांसह बंडखोर व अपक्ष उमेदवारांनी आपआपला प्रभाग पिंजून काढला. पदयात्रा, रॅली, रोड शोद्वारे मतदारांना विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले. झिंदाबाद... झिंदाबाद आणि विजयभवचे नारे देत कार्यकर्ते व समर्थनांनी आपलाच उमेदवार जिंकणार, असा विश्वास व्क्क्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी 128 पैकी 126 जागांवर तब्बल 692 उमेदवार रिंगणात आहेत. दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. प्रचारास सोमवार (दि.12) आणि मंगळवार (दि. 13) असे दोन दिवस शिल्लक असल्याने, रविवार सुटीनिमित्त राजकीय पक्षांसह बंडखोर उमेदवारांनी रविवारी दिवसभर सर्व 32 प्रभागांत प्रचाराचा धुराळा उडवला. सकाळी दहाला सुरू झालेला प्रचार रात्री दहापर्यंत कायम होता. कार्यकर्त्यांच्या घोषणा तसेच, रिक्षांतील स्पीकरच्या आवाजाने परिसर दणाणला होता.
समर्थक नागरिक व कार्यकर्त्यांसह पदयात्रा, रॅली तसेच, रोड शो करण्यात आला. उमेदवारांसह त्यांचे नातेवाईकही प्रचारात सहभागी झाले होते. उमेदवारांसह कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहण्यासारखा होता. प्रचारात महिला व तरुणींही आघाडीवर होत्या. डोक्यावर टोप्या, खांद्यावर मफरल, छातीवर चिन्ह तर, काहीच्या हातात पक्षाचे ध्वज असा लवाजमा शहरातील सर्वच चौक, गल्ली बोळात दिसून येत होता. घरोघरी तसेच, विक्रेते, दुकानदार, पादचाऱ्यांना माहितीपत्रकांचे वाटप केले जात होते. न विसरता मतदान करण्याची विनंती केली जात होती. घोषणामुळे परिसरात दणाणून जात होता. महिलांकडून उमेदवारांचे औक्षण केले जात होते. कोठे कोठे फुलांचा वर्षाव केला जात होता. तर, प्रौढ व ज्येष्ठ दिसतात त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले जात होते. परिसरातील महत्वाचे, नामांकित व प्रसिद्ध व्यक्तींच्या घरी जात आवर्जून भेट घेतली जात होती. त्यांच्यासोबत छायाचित्र घेतली जात होती.
पदयात्रा, रॅलीच्या पुढे असलेल्या रिक्षातून उमेदवार व त्यांच्या चिन्हाचा पुकारा केला जात होता. तसेच, विविध गीते लावून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले जात होते. काही भागांत एईडी व्हॅनद्वारे मतदारांना कामाची माहिती देऊन मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळपासून सुरू झालेला प्रचार दुपारच्या विश्रांतीनंतर रात्रीपर्यंत सुरू होता. रात्री जेवण झाल्यानंतर सोमवार (दि.12) प्रचाराचे नियोजन करण्यात कार्यकर्ते व्यग्र होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून प्रचाराचा धुराळा
आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघे रविवारी पिंपरी-चिंचवड शहरात होते. कोणी रोड शो केला. तर, कोणी जाहीर सभा घेत विरोधकांचा खपसून समाचार घेतला. भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भोसरी परिसरात सायंकाळी रोड शो काढला. केंद्र व राज्यातील विकासाचे दाखले देत त्यांनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केले. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोशी, इंद्रायणीनगर, भोसरीतील चक्रपाणी वसाहत आणि दिघी रस्ता अशा चार ठिकाणी जाहीर सभा घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गेल्या 9 वर्षांतील गैरकारभाराव टीकास्त्र सोडले.
भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर निशाणा साधला. त्यांच्या हस्ते कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनामा-हमीपत्र प्रकाशित करण्यात आले. यावेळी रोहित पवार, खासदार अमोल कोल्हे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादांच्या रोड शो व जाहीर सभांमुळे शहर परिसर ढवळून निघाला.
अखेरच्या दोन दिवसांच्या प्रचाराच्या नियोजनाची तयारी
प्रचार मंगळवार (दि. 13) सायंकाळी 5.30 ला संपणार आहे. सोमवार व मंगळवार असे दोन दिवस कसा प्रचार करायचा, याचे नियोजन उमेदवारांसह प्रमुख कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. ज्या भागांत प्रचार झाला नाही, त्या भागांवर लक्ष केंद्र करण्यात आले आहे. घरोघरी जाऊन व्होटर स्लिपाचे वाटप करण्यास जोर देण्यात येत आहे. तसेच, प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून भेटवस्तू व साहित्यांचे तसेच, पैशांचे वाटप होते का, याकडेही बारिक लक्ष दिले जात आहे. त्यासाठी काही कार्यकर्त्यांची खास नेमणूक करण्यात आली आहे.