

पिंपरी: फुगेवाडीतील विषारी दारूकांडानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सलग तिसऱ्या दिवशीही अवैध दारू व्यवसायाविरोधातील धाडसत्र सुरू ठेवले. शनिवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील विविध भागांतील 36 ठिकाणी छापे टाकून कारवाई करण्यात आली. गेल्या तीन दिवसांत हातभट्टी दारू, अवैध मद्यविक्री आणि ताडी व्यवसायाशी संबंधित जवळपास 100 अड्ड्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
फुगेवाडी परिसरातील विषारी दारूकांडात 15 जणांचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन अवैध दारू व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे निर्देश दिले. या वेळी शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत पूर्वी देण्यात आलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी प्रभारी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बैठकीत प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारूअड्डे, हातभट्टी व्यवसाय, ताडी विक्री केंद्रे आणि संशयित ठिकाणांची माहिती संकलित करून तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सर्व झोनमधील पोलिस अधिकारी, गुन्हे शाखेची पथके आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे धाडसत्र सुरू केले आहे.
शनिवारी करण्यात आलेल्या कारवाईत झोपडपट्टी भाग, नदीकाठ परिसर, औद्योगिक वसाहतीलगतच्या वस्त्या तसेच अवैध दारू विक्रीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. अनेक ठिकाणी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य, कच्चा माल आणि दारूचा साठा नष्ट करण्यात आला. काही ठिकाणी संशयित अड्डे बंद पाडण्यात आले. तर, काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे समजते.
दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागानेही स्वतंत्र मोहीम हाती घेतली असून, शहरातील आणि लगतच्या परिसरातील संशयित ठिकाणांची तपासणी सुरू आहे. अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या साखळीतील प्रमुख व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यंत्रणांकडून केला जात आहे.
फुगेवाडी दारूकांडानंतर सुरू झालेल्या या व्यापक कारवाईमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक ठिकाणी अड्डे बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, तीन दिवसांच्या धाडसत्रानंतरही शहरातील अवैध दारू नेटवर्क पूर्णपणे नष्ट झाले आहे का?, याबाबत प्रश्न कायम असून, या मोहिमेची सातत्याने अंमलबजावणी होते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
दारूकांडानंतर पोलिसांवर वाढला दबाव
फुगेवाडीतील विषारी दारूकांडात 15 जणांचा मृत्यू झाल्यानंतर शहरातील अवैध दारू व्यवसायाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या काही अड्ड्यांबाबत स्थानिकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलग तीन दिवस धाडसत्र राबवून जवळपास 100 ठिकाणी कारवाई केली असून, यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे सांगितले जात आहेत.
सर्व पोलिस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील हातभट्टी दारू, अवैध मद्यविक्री आणि तत्सम बेकायदेशीर धंद्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या जीविताशी संबंधित अशा बेकायदेशीर कृत्यांना पाठीशी घातले जाणार नाही.
रोहिदास पवार, पोलिस उपायुक्त (गुन्हे), पिंपरी चिंचवड