

पिंपरी: फुगेवाडीतील विषारी दारूकांडाने पिंपरी-चिंचवड शहराला मोठा हादरा दिला असून, मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. रविवारी (दि. 31) मृत्यूचे सत्र काहीसे थांबल्याचे चित्र दिसत असले तरी विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले दहा जण अद्याप धोक्याबाहेर आलेले नाहीत. त्यामुळे वैद्यकीय यंत्रणा, प्रशासन आणि रुग्णांच्या कुटुंबियांची चिंता कायम आहे.
महिला तीन दिवसांत मृतांचा आकडा सातत्याने वाढत राहिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाल्यानंतर बळींची संख्या 15 वर पोहोचली. त्यानंतर वैद्यकीय पथकांचे लक्ष पूर्णपणे उपचार सुरू असलेल्या रुग्णांकडे केंद्रित झाले आहे. विषारी दारूचा शरीरातील विविध अवयवांवर परिणाम झाल्याने काही रुग्णांवर अतिदक्षता विभागात विशेष उपचार सुरू आहेत.
वायसीएम रुग्णलयातील रुग्ण
यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या पाच रुग्ण उपचार घेत आहेत. श्रीमंत कोळी (वय 60), प्रकाश राठोड (वय 65), जितू शदतपुरी (वय 31), सोनू तायडे (वय 30) आणि प्रफुल्ल अरिकस्वामी (वय 27) यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या प्रकृतीवर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सातत्याने लक्ष ठेवून आहे.
औंध, ससून रुग्णलयातील रुग्ण
औंध येथील जिल्हा रुग्णालयात चंदन कुमार (वय 26), खाजप्पा शिंगे (वय 35) आणि पवन चव्हाण (वय 35) यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या प्रकृतीत स्थिरता असल्याचे सांगण्यात येत असले तरी डॉक्टरांकडून सतत निरीक्षण ठेवण्यात येत आहे. सुभाष डिग्गीकर (वय 66) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, अस्लम खान (वय 40) यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांच्या प्रकृतीबाबत नियमित आढावा घेतला जात आहे.
रविवारी नवीन रुग्ण नाही
रविवारी दिवसभरात शहरातील कोणत्याही सरकारी अथवा खासगी रुग्णालयात या प्रकरणाशी संबंधित नवीन रुग्ण दाखल झाल्याची नोंद झालेली नाही. त्यामुळे विषारी दारूचे आणखी बळी समोर येण्याची शक्यता कमी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तरीदेखील प्रशासनाने सर्व रुग्णालयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नातेवाइकांमध्ये चिंता
फुगेवाडी आणि दापोडी परिसरात या दुर्घटनेची तीव्रता अजूनही जाणवत आहे. मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनेक घरांतील कर्त्या व्यक्ती गमावल्याने आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. रुग्णालयांबाहेर नातेवाईकांची प्रतीक्षा आणि चिंतेचे वातावरण कायम असून, प्रत्येक वैद्यकीय अपडेटकडे कुटुंबियांचे लक्ष लागले आहे.