

पिंपरी: घरेलू कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने घरेलू कामगार मंडळाची स्थापना केली आहे; मात्र अपुऱ्या निधीमुळे मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विविध सवलती आणि आर्थिक मदतींचा लाभ पिंपरी-चिंचवड परिसरातील नोंदणीकृत पात्र घरेलू कामगारांना प्रत्यक्षात मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, हजारो घरेलू कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.
शहर परिसरात घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना अपघात, आजारपण, प्रसूती किंवा मृत्यू याप्रसंगी आर्थिक आधार मिळावा, तसेच, त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत मिळावी या उद्देशाने मंडळाची स्थापना करण्यात आली आहे; मात्र, प्रत्यक्षात निधीअभावी अनेक अर्ज प्रलंबित राहिले असून, मंजूर लाभांचाही निधी वेळेवर वितरित होत नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून करण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचे मासिक उत्पन्न अत्यल्प असल्याने आकस्मिक प्रसंगात शासनाच्या मदतीची नितांत गरज असते, परंतु मंडळाकडे आवश्यक निधी उपलब्ध नसल्याने त्यांना अपेक्षित आर्थिक मदत मिळू शकत नाही.
मंडळाकडून दिले जाणारे लाभमंडळाच्या नियमांनुसार नोंदणीकृत लाभार्थ्यांना विविध योजनांतर्गत सवलती देण्यात येतात. अनेक लाभार्थ्यांनी नोंदणी करूनही मदतीसाठी महिनोनमहिने प्रतीक्षा करावी लागत असल्याचे सांगितले.
काही प्रकरणांमध्ये कागदपत्रांची पूर्तता करूनही मंजुरी प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी शासनाकडे तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. घरेलू कामगार हे असंघटित क्षेत्रातील सर्वात असुरक्षित घटक आहेत. त्यांच्यासाठी तयार केलेल्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळाला नाही तर मंडळ स्थापन करण्यामागील उद्देशच अपूर्ण राहील, असे मत संघटनांकडून व्यक्त करण्यात आले.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी निधी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे सांगितले असून, लवकरच निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रलंबित प्रकरणे निकाली काढली जातील, असा दावा केला आहे. मात्र, तोपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील हजारो घरेलू कामगारांना शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करावी लागत आहे. घरेलू कामगारांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी स्थापन केलेले मंडळ सक्षम करण्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.
या मिळतात सवलती...
अपघात घडल्यास लाभार्थींना तत्काळ आर्थिक साहाय्य
लाभार्थीच्या मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत
लाभार्थी अथवा त्यांच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या आजारासाठी वैद्यकीय खर्चाची तरतूद
महिला लाभार्थींसाठी प्रसूती लाभ - दोन मुलांपर्यंत मर्यादित
लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसाला अंत्यविधीसाठी आर्थिक साहाय्य
मंडळाने वेळोवेळी निश्चित केलेले इतर विशेष लाभ
आम्ही गेल्या दोन मंडळांत नावनोंदणी केली. तरीही कुठल्याही योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही. प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर निधी नसल्याचे उत्तरे दिली जात आहे.
सुरेखा चव्हाण, घरेलू कामगार, रावेत