

पिंपरी: केंद्राच्या वेगवेगळ्या योजना शहरपातळीवर राबविण्यासाठी तसेच शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांचे राहणीमान व त्यांचे दरडोई उत्पन्न किती असेल, याचा एक सर्वसमावेशक सर्व्हे हाती घेतला आहे. केंद्राच्या सांख्यिकी विभागाच्या देशभरात वेगवेगळ्या धर्तीवर सर्व्हे सुरू असून, वेगवेगळ्या प्रकारच्या 80 हून अधिक सर्व्हेमध्ये राज्यातील उपक्रम, योजना, पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत झाली आहे. त्यातच आता पुढचा टप्पा म्हणून नागरिकांच्या दरडोई उत्पन्नाचा अर्थात मिळकतीचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचा खर्च आणि त्याचे प्रमाण या अनुषंगाने गृहितक निश्चित केले जाणार आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने देशभरातील नमुना सर्वेक्षणांद्वारे विविध सामाजिक, आर्थिक बाजूंवर प्रकाश टाकतात. या माध्यमातून एका उत्तम आणि आवश्यक डेटा विकसित होत असून, केंद्र व राज्य सरकारला त्याद्वारे विकास नियोजन आणि धोरणे तयार करणे सोपे जात आहे. साधारण एक वर्षाच्या कालावधीत हा सर्व्हे पूर्ण केला जातो. समक्ष गावपातळीवर तसेच वेगवेगळ्या तांत्रिक माहितीच्या आधारे नागरिकांपर्यंत हे पोहोचत आहे. विशेष म्हणजे शहराबरोबरच ग्रामीण भागालाही तेवढेच महत्त्व देण्यात आले आहे.
देशभरातील या पहिल्या सर्वेक्षणात राज्यातील 5 हजार 760 घरांना भेटी देण्यात येणार आहे. पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी आणि सातारा या चार जिल्ह्यांत हे काम पुढील वर्षभर चालणार आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर आणि सोलापूर या दोन उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीनेही हे सर्वेक्षण पूर्ण होईल. दिल्ली कार्यालयाच्या वतीने देण्यात येणाऱ्या यादीतून ही घरे निवडली आहेत. त्यात ग्रामीण भागात 10 घरांतून एक सॅम्पल, तर शहरी भागात 20 घरांतून एक सॅम्पल घेण्यात येणार आहे. सांख्यिकी विभागाचे संयुक्त संचालक रुही कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सांख्यिकी अधिकारी मनोजकुमार हे सर्व्हेचे काम पाहात आहेत.
असे होणार सर्वेक्षण
कार्यालयाचे अधिकारी हे प्रत्यक्ष फिल्डवर असतात. ते ई-सिग्मा टॅबलेटच्या माध्यमातून माहिती संकलित करतात. हे अधिकारी वैज्ञानिक व अचूक पद्धतीने निवडलेल्या गावांमध्ये अथवा शहरातील ब्लॉक्समध्ये भेटी देतात. साधारण 200 ते 250 असे ब्लॉक्स असतात. त्यानुसार घरांची यादी तयार केली जाते आणि नमुना निवडीनुसार निवडक घरांतील सदस्यांची माहिती घेतली जाते. एका घरासाठी ही प्रक्रिया साधारण एक ते दीड तास चालते. ही संकलित माहिती मंत्रालयाच्या अहवालांमध्ये अतिशय गोपनीय ठेवली जाते.
दोन सर्वेक्षणांचे 70 टक्के काम पूर्ण
कार्यालयाच्या वतीने सध्या घरगुती पर्यटन खर्च सर्वेक्षण आणि घरगुती प्रवास सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. त्यात अनुक्रमे 6 हजार 160 आणि 3 हजार 120 घरांना भेटी दिल्या आहेत. त्याचे काम 70 टक्के पूर्ण झाले आहे. हा सर्व्हे जूनपर्यंत चालेल. त्यानुसार विद्यार्थ्यांपासून ते घरातील व्यक्ती कोणत्या साधनातून प्रवास करते हा निष्कर्ष काढून ते ट्रान्स्पोर्ट मोड वाढविण्याचा दृष्टिकोन ठेवण्यात आला आहे.
डेटाची उपयुक्तता
शहरी, ग्रामीण भागातून या संकलित केलेल्या डेटाची माहिती देशाच्या विकासात महत्त्वाची असते. ही माहिती संबंधित गावासाठी, जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यास मदत करते. पर्यटन, प्रवासी यांसारख्या आत्तापर्यंतच्या सर्वेक्षणात या बाबी पुढे आल्या आहेत. त्यातच आखणी, संशोधन, धोरण निर्मिती व अंमलबजावणीसाठी हे सॅम्पल अर्थात डेटा त्याआधारे काम करते.
काय पाहणार?
शहरी, ग्रामीण भागातील नागरिकांचे मिळकत स्रोत काय?
सध्याच्या चढउतारात मिळकत वाढते का किंवा कसे?
कोणत्या वर्गातील मिळकत वाढणार अथवा घटेल?
मिळकतीची वर्गवारी, गणना कोणत्या प्रकारे होते?
वेगवेगळ्या माध्यमातून येणाऱ्या मिळकतीचे परिणाम.