Pimpri Chinchwad Road Accident: पिंपरी-चिंचवडमध्ये दुचाकी प्रवास ठरतोय जीवघेणा; अपघातातील ६१ टक्के मृत्यू दुचाकीस्वारांचे

दोन वर्षांत ५८० अपघाती मृत्यू; कारमधील मृत्यूचे प्रमाण केवळ ३ ते ४ टक्के, चाकण-महाळुंगे अपघातांचे हॉटस्पॉट
Accident
AccidentPudhari
Published on
Updated on

संतोष शिंदे

पिंपरी: उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज हजारो नागरिक, कर्मचारी प्रवास करतात; मात्र येथील अपघातांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दुचाकीपेक्षा कारमधील प्रवास तुलनेने अधिक सुरक्षित ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. सन २०२५ आणि जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी दुचाकीस्वारांचे प्रमाण ५९ ते ६१ टक्के इतके आहे. त्याउलट कारचालक अथवा चारचाकी वापरकर्त्यांचे मृत्यू केवळ ३ ते ४ टक्क्यांपर्यंत मर्यादित आहेत. त्यामुळे कारमधूनच प्रवास 'सेफ' असल्याचे अधोरेखित होत आहे.

Accident
Pimpri Chinchwad Smart City Failure: पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा ‘डिजिटल’ कारभार संकटात; ५ हजार सीसीटीव्ही बंद, ११२ कोटींची ई-ऑफिस प्रणाली ठप्प

५८० पैकी ३३५ जण दुचाकीस्वार

पोलिसांकडे असलेल्या नोंदीनुसार सन २०२५ मध्ये एकूण ३९९ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यापैकी २२६ दुचाकीस्वार (५९ टक्के) होते, तर कारमधील केवळ १३ जणांचा (३ टक्के) मृत्यू झाला. त्यामानाने यंदा जून २०२६ अखेर देखील असेच चित्र दिसून येत आहे. या कालावधीत १८१ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १०९ दुचाकीस्वार (६१ टक्के) तर केवळ ८ चारचाकी वापरकर्ते (४ टक्के) आहेत. दोन्ही वर्षांची एकत्रित आकडेवारी पाहिली असता एकूण ५८० मृत्यूंपैकी ३३५ जण दुचाकीस्वार, तर अवघे २१ जण कारमधील प्रवासी किंवा चालक आहेत. म्हणजेच दुचाकीस्वारांच्या मृत्यूंची संख्या कारमधील मृत्यूंपेक्षा जवळपास १६ पट अधिक आहे.

Accident
Pimpri Chinchwad Footpath Encroachment: पिंपरी-चिंचवडमधील ‘स्मार्ट’ पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात; नागरिकांचा सवाल- चालायचे कुठून?

दुचाकीची संख्या जास्त

पिंपरी-चिंचवडमध्ये आयटी कंपन्या, एमआयडीसी आणि विविध औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांचा दैनंदिन प्रवास प्रामुख्याने दुचाकीवरून होतो. वाहतूक कोंडीमुळे वेळ वाचविण्यासाठी अनेकजण दुचाकीला प्राधान्य देतात, तर तुलनेने कमी खर्च आणि आर्थिक परिस्थितीमुळेही मोठा वर्ग दुचाकीचाच वापर करतो. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर दुचाकींचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक आहे. परिणामी, अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्येही दुचाकीस्वारांची संख्या सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

Accident
Wadgaon Talegaon Traffic Jam: वडगाव–तळेगाव महामार्गावर वाहतूक कोंडीचा कहर; ५ किमी अंतरासाठी लागताहेत ४५ मिनिटे

...म्हणून कार सुरक्षित

कारमध्ये सीटबेल्ट, एअरबॅग, मजबूत बॉडी स्ट्रक्चर आणि अन्य सुरक्षा यंत्रणा असल्याने गंभीर अपघातातही जीव वाचण्याची शक्यता वाढते. त्याउलट दुचाकीस्वार थेट धडकेचा सामना करत असल्याने डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत होण्याचा धोका अधिक असतो. हेल्मेट न वापरणे, भरधाव, चुकीची ओव्हरटेक, सिग्नलचे उल्लंघन आणि जड वाहनांच्या जवळून दुचाकी पुढे नेणे, ही दुचाकीस्वारांसाठी जीवघेणी कारणे ठरत आहेत.

Accident
Pimpri Chinchwad Wrong Side Driving: पिंपरी-चिंचवडमध्ये ‘रॉंग साइड’ वाहनांचा कहर; ५० हजार चालकांवर कारवाई, ५.८६ कोटींचा दंड वसूल

चाकण-महाळुंगे अपघाताचा 'हॉटस्पॉट'

चाकण, महाळुंगे परिसरात रस्ते अपघातांचे प्रमाण शहरातील इतर भागांच्या तुलनेत अधिक असल्याचे पोलिसांच्या निरीक्षणातून समोर आले आहे. या परिसरात मोठ्या उद्योग कंपन्या, एमआयडीसी आणि लॉजिस्टिक हब असल्याने दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ असते. त्याचवेळी हजारो कर्मचारी दुचाकींवरून कामासाठी ये-जा करतात. अति वेग, अवजड वाहनांशी होणारे अपघात, चौकांतील वाढती वाहतूक, नियमांचे उल्लंघन आणि रात्रीच्या वेळी वेगाने वाहन चालविणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत.

रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचे मृत्यू अधिक आहेत. हेल्मेटचा योग्य वापर, वेगमर्यादेचे पालन, मद्यपान करून वाहन न चालविणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन केल्यास मोठ्या प्रमाणात जीवितहानी टाळता येऊ शकते. कारचालकांनीही सीटबेल्टचा वापर अनिवार्यपणे करावा. प्रत्येक प्रवास सुरक्षित करण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.

विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news