

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी शहरात आलेले राज्यातील वरिष्ठ नेते आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत; मात्र भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातील स्थानिक नेते मात्र चुप्पी साधून आहेत. स्थानिक मुद्यांवर आरोप-प्रत्यारोप होत असताना दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया अथवा आरोप-प्रत्यारोप केले नाहीत. अजित पवार यांनी केलेल्या आरोपावर आमदार महेश लांडगे यांनी केलेले प्रत्युत्तर वगळता दोन्ही पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अथवा नेत्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस जसाजसा जवळ येत आहे. तसे राज्यातील नेत्यांकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील निवडणुकीत भ्रष्टाचार तसेच, विकासाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या 9 वर्षांत पिंपरी-चिंचवड महापालिकेत झालेला भ्रष्टाचार तसेच विकासाच्या मुद्द्यांवरून भाजपाला घेरले आहे. त्यांच्या आरोपांची धार दिवसेंदिवस वाढत चालली आहे. राज्यात महायुतीत सत्तेत असूनही महापालिका निवडणुकीत अजित पवार हे टोकाचा विरोध करीत असल्याने भाजपा पक्षाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अजित पवारांच्या आरोपांना भाजपाचे नेते तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक वर्षे अजित पवारांची सत्ता होती. त्या काळातील भ्रष्टाचार आम्ही काढला तर, अजित पवारांना महागात पडेल. तसे करायला लावू नका, अशी थेट सूचक इशारा त्यांनी अजित पवारांना दिला आहे. त्यावरून आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आपली भूमिका मांडण्याचा सर्वांना संविधानाने अधिकार दिला आहे. सर्वांचे ऐकून मतदार आपले मत ठरवतील, असे उत्तर अजित पवारांनी दिले आहे. आघाडीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थेत आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढल्या आहेत. त्याप्रमाणेच ही निवडणूक असल्याचे त्यांनी भाजपाला आठवण करून दिली आहे.
राज्यातील नेत्यांकडून महापालिका निवडणुकीवरून अक्षरश: जुंपली आहे. रोज नवनवे मुद्दे काढून राज्यातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. त्यावरून निवडणुकीचा माहोल तापत आहे. प्रचारास केवळ सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आरोप-प्रत्यारोपाचा हा सिलसिला आणखी वाढणार आहे. मात्र, त्यावर शहरातील स्थानिक पदाधिकारी व नेते काहीच बोलत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पक्षाची भूमिका सातत्याने मांडणारे, प्रत्येक प्रश्नांवर निवेदन जाहीर करणारे पदाधिकारी कोठे गेले, असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
संबंध जपण्यासाठी स्थानिक पदाधिकारी सेफ झोनमध्ये?
राज्यातील नेते शहरात येऊन पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रश्नांवर एकमेकांशी अक्षरश: भांडत आहेत. त्यावरून टोकाचे वाद-प्रतिवाद सुरू आहे. मात्र, स्थानिक पदाधिकारी व नेते त्यावर चकार शब्द बोलण्यास तयार नाहीत. ते शांत बसून बघ्याची भूमिका घेत आहे. शहरातील वेगवेगळ्या पक्षांचे पदाधिकारी, नेते आणि त्यांचे नातेवाईक तसेच, मित्रमंडळींच्या नावावर महापालिकेतील बहुतांश ठेके आहेत.
अनेक खासगी गृहप्रकल्पांत तसेच, इतर व्यवसायात वेगवेगळ्या पक्षांतील पदाधिकाऱ्यांची व्यावसायिक भागीदारी आहे. अनेकांची पूर्वीपासूनच घट्ट मैत्री आहे. राज्याबाहेर तसेच, परदेशात ते दरवर्षी पर्यटनास आवर्जून जातात. तसेच, अनेक पदाधिकाऱ्यांचे भावकी-गावकीचे नाते आहे. मैत्रीपूर्ण व व्यावसायिक संबंध, नातेगोते सांभाळण्यासाठी तसेच, संबंध खराब होऊ नये, म्हणून ते एकमेकांवर आरोप करत नसल्याचे स्पष्ट होत आहे.
मॅच फिक्सिंगचाही परिणाम
पिंपरी, चिंचवड, आकुर्डी व भोसरी या प्रमुख गावांसह इतर गावे एकत्रित येऊन पिंपरी-चिंचवड महापालिका तयार झाली आहे. शहराची लोकसंख्या 30 लाखांच्या पुढे गेली आहे. नवनवीन टोलेजंग हाऊसिंग सोसायट्या उभ्या राहत आहेत. पिंपरी-चिंचवड उद्योनगरीची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. शहर वाढले तरी, येथील गावपण अद्याप टिकून आहे. गावकी-भावकी, नातेगोते व पै-पाहुणे हे आपले संबंध टिकवून आहेत. गावातील स्थानिक प्रमुख मंडळी गावातून कोणाला निवडून द्यायचे हे ठरवतात. त्यानुसार, त्यांना मतदान होते आणि ते विजयी होतात. विजय निश्चित असल्याने म्हणजे मॅच फिक्सिंग झाल्याने निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप करून आपले स्नेहसंबंध खराब करून घेण्यास कोणी धजावत नाही. पक्षापेक्षा एकमेकांचे संबंध अधिक बळकट राहण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे आत्तापर्यंतच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले आहे.