

महाळुंगे: तीर्थक्षेत्र देहू आणि आळंदी या दरम्यानच्या इंद्रायणी नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या भागातील चिखली, मोई, मोशी, कुरुळी, चिंबळी, केळगाव या दोन्ही काठांलगतच्या गावांना इंद्रायणी नदीने सजलाम-सुफलाम केले आहे. आज मात्र ही नदी रसायनमिश्रित सांडपाण्याने दूषित झाली आहे. नदीतील जीवसृष्टी, तसेच लगतची शेती धोक्यात आली आहे.
वाढत्या औद्योगिकीरणामुळे रासायनिक सांडपाणी थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी पूर्णपणे प्रदूषित झाली आहे. शहरातील सांडपाण्यामुळे नदीपात्रात जलपर्णीची वाढ होत आहे. या नदीच्या परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. या पाण्यामुळे जलचर प्राणी, परिसरातील नागरिकांसह शेतीचेही आरोग्य धोक्यात आले आहे.
रब्बी हंगामात नदीकाठच्या ग््राामीण भागातील शेतकऱ्यांनी कांदा, ऊस, ज्वारी, बटाटा, गहू, मका, पालेभाज्या आदी पिकांची लागवड केली आहे. या पिकांना नदीचे पाणी देताना शेतकऱ्यांच्या हाता-पायाला खाज सुटते. डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. इंद्रायणी नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी दरवर्षी प्रयत्न केले. मात्र, तोकड्या यंत्रणेने जलपर्णीची समस्या अनेक वर्षांपासून कायम आहे. आता इंद्रायणी नदीप्रदूषण आणि जलपर्णी मुक्त करण्यासाठी शासनाने प्रभावी योजना राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.