

पिंपरी: आमच्या 25 वर्षांच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजबद्ध विकास करत बेस्ट सिटीचे बक्षीस मिळवून दिले. मात्र, गेल्या 9 वर्षांत शहरात अनेक यक्ष प्रश्न उभे आहेत. अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोट्यवधीच्या ठेवी मोडत, महापालिकेस कर्जाच्या खाईत ढकलेले आहे. शहरातील भष्टाचाराच्या ‘आका’ला संपवा. केंद्रात व राज्यात सत्तेत असताना आम्ही कधी माज केला नाही. शहरातील दहशत, दादागिरी, गुंडगिरी मोडून काढा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग््रेासचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि.6) केले.
राष्ट्रवादी काँग््रेासच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पिंपरी गाव, काळेवाडीतील तापकीरनगर आणि वाल्हेकरवाडी येथे अजित पवारांच्या तीन सभा झाल्या. सभेत त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भष्टाचार व गैरव्यवहारावर पुन्हा तोफ डागली.
अजित पवार म्हणाले की, केंद्रात व राज्यात आघाडीची सत्ता असताना आम्ही कधी माज केला नाही. मात्र, आता शहरात दहशत, दादागिरी, दमदाटीचे प्रकार वाढले आहेत. आमची सत्ता असताना मी महापालिकेत अनेकांना मोठमोठी पदे दिली. एकाला स्थायी समितीचे अध्यक्ष केले. नंतर तो पलटला. विलास लांडेंच्या विरोधात उभा राहत जिंकून आला. स्वत:ची घरे भरली. मोठी प्रापर्टी उभी केली. इतका पैसा आला कोठून. शहरात दादागिरी, गुंडगिरी, दहशत वाढली आहे.
महापालिका निविदेत रिंग, नातेवाईक ठेकेदारांना कामांचे वाटप केले जाते. चार हजार कोटींचे बिले देणे बाकी आहे. तब्बल चाळीस हजार कोटी रुपये खर्च केले असून, विकास कोठे दिसत नाही. वाहतूककोंडी वाढली. पार्किंग झोन नाहीत. सर्वत्र कचरा दिसत आहे. नदी अतिप्रदूषित झाल्या आहेत. नऊ वर्षांत आरक्षणे विकसित केली गेली नाहीत. डीपी आराखड्यात आळंदी तिर्थक्षेत्राशेजारी कत्तलखाना उभारण्याचे नियोजन आहे. भटक्या कुत्र्यांच्या नसबंदीत तसेच, स्मार्ट सिटीत त्यांनी भष्टाचार केला. वरच्या लोकांना महापालिकेत लक्ष घालण्यास वेळ नाही. खालचे कारभारी हे सर्व करत आहेत. महापालिका अक्षरश: लुटून खाल्ली. येथील आका आणि कारभाऱ्यांना संपवण्याची वेळ आली आहे. गोरगरिबांना बेघर करणारा डीपी होऊ देणार नाही. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. भावी पिढीचा विचार करा. शेवटची निवडणूक म्हणून विनंती करतील. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
भीती असलेल्या उमेदवारांना पोलिस संरक्षण देणार
शहरातील काही उमेदवार दहशत व दादागिरीने भयभीत झाले आहेत. त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. त्यावर अजित पवार म्हणाले की, ज्या उमेदवारांनी पोलिस संरक्षण मागितले आहे. ते त्यांना देण्यात येईल. त्यासाठी लेखी पत्र देण्याची गरज आहे. त्यानंतर पोलिस यंत्रणा तपासणी करून संबंधित उमेदवाराला पोलिस संरक्षण देतील.