

पिंपळे निलख: भोसरी-पिंपळे सौदागर-हिंजवडी आयटी हबला जोडणारा शहरातील प्रमुख बीआरटी मार्ग समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. याबाबत प्रशासनाकडून केवळ दुरुस्तीचे आश्वासन दिले जात आहे; परंतु कार्यवाही होत नाही. रस्ता दुभाजक तुटल्याने तेथील राडारोडा न उचलल्याने वाहनांना अपघात घडत आहेत. एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतापजनक प्रश्न नागरिक करत आहेत.
या मार्गावरील पिके चौक, कोकणे चौक, शिवार गार्डन चौक, काटे पाटील चौक या चौकामध्ये बीआरटी मार्गावरील रस्ता दुभाजक अनेक ठिकाणी वाहनांच्या धडकेमुळे पूर्णपणे तुटलेले आहेत. विशेष म्हणजे, या तुटलेल्या दुभाजकाचे अवशेष तुटून काही महिने उलटले तरी अजूनही रस्त्यावरच पडून आहेत. काँक्रीटचे तुकडे, उघड्या लोखंडी सळ्या आणि ढिगाऱ्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तर ही परिस्थिती अधिकच गंभीर बनते, कारण अपुरी प्रकाशयोजना आणि अव्यवस्थित रस्त्यामुळे वाहनचालकांना अपघात घडत आहेत. दररोज हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे झाले आहे. अपघात होण्याची शक्यता सतत निर्माण होत असून, कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासन
या समस्यांकडे वृत्तपत्रातून वारंवार लक्ष वेधण्यात आले आहे. परंतु, संबंधित विभागाकडून केवळ आश्वासने देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. राडारोडा लवकरच हटविण्यात येईल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
प्रशासनात समन्वयाचा अभाव
भोसरी ते हिंजवडी बीआरटी मार्गाची जबाबदारी नेमकी कोणत्या विभागाकडे आहे, याबाबतही संभम निर्माण झाला आहे. बीआरटी विभाग आणि दळणवळण विभाग यांच्यात समन्वयाचा अभाव स्पष्टपणे जाणवत असून, त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे. दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवत असल्याने सर्वसामान्य नागरिक व वाहनचालक यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दररोज या रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड भीती वाटते. तुटलेला रस्ता दुभाजक आणि रस्त्यावर पडलेला राडारोडा यामुळे वाहन चालवणे कठीण झाले आहे. रात्री या मार्गावर पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने येथून प्रवास करताना भीती वाटते. प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करावी. तसेच रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा
गौरी जाधव, स्थानिक नागरिक
ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून, प्रशासनाने याकडे लक्ष दिले पाहिजे. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही कारवाई होत नसेल, तर विभागीय अधिकारी यांचे दुर्लक्ष होत आहे असे दिसून येत आहे. संबंधित विभागांनी जबाबदारी निश्चित करून तातडीने रस्त्यातील समस्या सोडवाव्यात.
अनिता काटे, नगरसेविका