

पिंपरी: औद्योगिकनगरी म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख आहे. मात्र, अनियंत्रित वाढीमुळे शहर वाहतूक कोंडीच्या जाळ्यात अडकले आहे. कायद्यानुसार एका परमिटवर एकच ऑटो रिक्षा नोंदणी होऊ शकते. मात्र, पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात ऑटो परमिटपेक्षा जास्त रिक्षांची नोंदणी झाली आहे. शहरात 47 हजार 500 ऑटो परमिट वितरीत करण्यात आले असून, 48 हजार 150 रिक्षांची नोंदणी करण्यात आली आहे.
शहराच्या लोकसंख्येबरोबर वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुविधेसाठी राज्य परिवहन विभागाकडून खासगी वाहतुकीसाठी रिक्षाला परमिट दिले जाते. मोटार व्हेईकल ॲक्टनुसार हे परवाने दिले जातात. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रिक्षा कमी असल्याचे लक्षात आल्यानतंर आरटीओने 2017 मध्ये नवीन रिक्षांना परवाने देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे मागेल त्याला परमिट देण्यात येत होते. अगदी राज्यासह परराज्यातील अर्जदारांनी परमिट देण्याचा धडका सुरू केला. त्यामुळे अनेकांना व्यवसाय मिळाला तर, अनेकांनी रिक्षा घेऊन परवाने घेतले. त्यामुळे रिक्षांमध्ये स्पर्धा निर्माण झाल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या 47 हजार 500 परवाने दिले आहेत. शहरात रिक्षाची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. शहरातील रिक्षांची वाढती संख्या लक्षात येताच, विविध रिक्षा संघटनांनी परिवहन विभागाकडे ऑटो रिक्षा परमिट बंद करण्याची मागणी केली, परंतु ऑटो परमिटपेक्षा ऑटो रिक्षाची संख्या जास्त असल्याचे आरटीओकडून दिलेल्या आकडेवारीवरुन निदर्शनास येत आहे. तसेच, या आधी एका परमिटवर अनेक रिक्षांची नोंदणी झाल्याची बाब समोर आली आहे. पिंपरी-चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने अशा रिक्षांवर कारवाई केली आहे.
परमिट जमा करा अन्यथा कारवाई
सरकारी, निमसरकारी, खासगी कंपनीत किंवा इतर कोणत्याही संस्थेत नोकरी करताय आणि तुमच्याकडे रिक्षा परवाना असेल तर तात्काळ रिक्षा परवाना स्वेच्छेने पिंपरी- चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करावा. अन्यथा मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
पदपथावर पार्किंग
रिक्षा थांब्याची कमतरता असल्याने चालक रस्त्याच्याकडेला, सिग्नलजवळ किंवा पदपथावर रिक्षा पार्किंग करतात. मेट्रो स्टेशनजवळही प्रवाशांना यांचा नाहक त्रास होत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 40 हजारांहून आधिक रिक्षाची संख्या आहे. त्यामुळे खासगी वाहनांना मार्ग काढणे कठीण झाले आहे.
या आधी एका परमिटवर अनेक रिक्षांची नोंदणी झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हा फरक जाणवत आहे. परमिटचे मंजुरी पत्र असल्याशिवाय ऑटो रिक्षाची नोंदणी होत नाही.
राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन आधिकारी
2017 साली महाराष्ट्रामध्ये मुक्त रिक्षा परवाना बंद झाला. त्या वेळी पुणे शहरात 40 हजार तर पिंपरी चिंचवड शहरात 5 हजार रिक्षा होत्या. 2017 ते 2026 या नऊ वर्षाच्या कालावधीत पुणे शहरात दीड लाख, पिंपरी-चिंचवडमध्ये 40 हजार रिक्षांची संख्या आहे. प्रवासी संख्या कमी आणि रिक्षाची संख्या वाढली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील चार वर्षापासून मुक्त रिक्षा परवाना बंद करा अशी मागणी केली. 9 मार्च रोजी या मागणीला यश आले, परंतु तो तात्पुरता बंद करा, असे राज्य सरकारने जाहीर केले. तो तात्पुरात बंद न करता कायमचा बंद करण्याची आवश्यकता आहे.
बाबा कांबळे, कष्टकऱ्यांचे नेते