

पिंपळे निलख: पिंपळे सौदागर ते हिंजवडी दरम्यानच्या बीआरटी मार्गालगत सुदर्शन चौक ते गोविंद गार्डनपर्यंत पदपथ व सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. नागरिक आणि सायकलस्वारांच्या सुरक्षिततेसाठी या मार्गावर विद्युत दिवे बसविण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून हे दिवे बंद पडल्याने संध्याकाळी मार्गावर अंधार पसरतो. परिणामी, पादचारी, सायकलस्वार आणि सकाळी-जॉगिंग करणाऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. (Latest Pimpri chinchwad News)
अंधारामुळे अपघाताचा धोका वाढला असून, विशेषतः महिला व ज्येष्ठ नागरिकांना या भागात चालणे असुरक्षित वाटत असल्याची भावना व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका व विद्युत विभागाकडे तक्रारी करूनही काही ठोस उपाय झालेले नाही. दरम्यान, या तक्रारीवर प्रशासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दररोज सकाळ संध्याकाळ येथे गर्दी असते. पण दिवे बंद असल्याने अंधारात चालणे धोकादायक ठरते. काही वेळा अपघाताचे प्रसंग घडलेत. प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे.
सचिन कोळी, स्थानिक.
सदर बीआरटी मार्गावरील काही दिवे तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. संबंधित लाईनची तपासणी सुरू असून, दोन दिवसांत सर्व दिवे सुरू केले जातील. नागरिकांनी थोडा संयम बाळगावा.
लक्ष्मण इटकर, विद्युत विभाग, ड क्षेत्रीय कार्यालय.