Pimple Saudagar Easy Pedal: पिंपळे सौदागरचा ‘ईझी पेडल’ सायकल प्रकल्प सुसाट नाही; ३,५०० नोंदणी, रोज फक्त २० ते ३० वापरकर्ते

लाखो रुपये खर्चून उभारलेल्या प्रकल्पाला मर्यादित प्रतिसाद; अ‍ॅपची प्रक्रिया, जनजागृती आणि मार्गदर्शनाचा अभाव ठरतोय अडथळा
Easy Pedal Project
Easy Pedal ProjectPudhari
Published on
Updated on

पिंपरी: शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबर पर्यावरणपूरक प्रवासाला चालना देण्यासाठी पिंपळे सौदागर परिसरात पालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या ‘ईझी पेडल’ सायकल प्रकल्पाला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या प्रकल्पातील सायकली उपलब्ध असतानाही नागरिकांकडून त्याचा वापर मर्यादित प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रकल्पाच्या उद्देशाबरोबरच त्याच्या नियोजनावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Easy Pedal Project
Talwade Medical Shop License Fraud: बनावट सह्यांनी मेडिकल शॉपचा परवाना स्वतःच्या नावे; दोन डॉक्टरांवर गुन्हा

पिंपळे सौदागर परिसरात प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या ठिकाणी सायकल स्टेशन उभारून नागरिकांना सायकल भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सायकल घेण्यासाठी मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी, पेमेंट आणि अन्य प्रक्रिया करावी लागत असल्याने अनेक नागरिक या सुविधेपासून दूर राहत असल्याचे दिसून येते.

Easy Pedal Project
Pune Metro Ganeshotsav: गणेशोत्सवात मेट्रोला पुणेकरांची पसंती; पहिल्याच दिवशी २.६२ लाख प्रवाशांचा प्रवास

नोंदणी हजारोंमध्ये, वापर मात्र मोजकाच

प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे ३ हजार ५०० नोंदणी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रत्यक्षात दररोज सायकल वापरणाऱ्यांची संख्या २० ते ३० च्या आसपास असल्याचे समोर येते. त्यामुळे नोंदणीचा आकडा आणि प्रत्यक्ष वापर यामध्ये मोठी तफावत दिसून येत आहे. प्रकल्पात ५०हून अधिक सायकली, तसेच १० इलेक्ट्रिक सायकल/बाईक उपलब्ध आहेत. अ‍ॅपच्या माध्यमातून ऑनलाइन अनलॉकिंग, जीपीएस फेन्सिंग आणि रिअल टाइम ट्रॅकिंगसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि ती नागरिकांना सहज वापरता येणे, यामध्ये मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे.

Easy Pedal Project
Pimpri Chinchwad Ganesh Idol Photo Ban: गणेशमूर्तींचे विसर्जनानंतरचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केल्यास कारवाई; पिंपरी-चिंचवड पोलिसांचा आदेश

‘सायकल आहे; पण वापरायची कशी?’

सायकल स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सायकली नागरिकांच्या नजरेस पडतात. मात्र, त्या प्रत्यक्षात कशा वापरायच्या, अ‍ॅपवरून नोंदणी कशी करायची, सायकल अनलॉक कशी करायची आणि शुल्क कसे आकारले जाते, याबाबत पुरेशी माहिती अनेक नागरिकांना नसल्याचे दिसून येते. स्टेशनवर माहिती फलक, मार्गदर्शक सूचना आणि प्रत्यक्ष मदत उपलब्ध करून दिल्यास नागरिकांचा सहभाग वाढू शकतो. केवळ अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा देण्याऐवजी सुरुवातीच्या टप्प्यात नागरिकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

पावसामुळेही वापरावर परिणाम

पावसाळ्यात सायकल वापरावर परिणाम होणे स्वाभाविक असले तरी पावसाळा संपल्यानंतरही प्रकल्पाला अपेक्षित गती मिळाली नाही, तर त्याचा फेरविचार करण्याची वेळ येऊ शकते. शहरात सायकल संस्कृती विकसित करण्यासाठी केवळ सायकल स्टेशन उभारणे पुरेसे नसून त्याचा नियमित वापर वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती करणे आवश्यक आहे.

Easy Pedal Project
Pimpri Motorized Number Plate: बटण दाबलं की नंबर प्लेटच गायब! पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर ‘मोटराइज्ड’ प्लेटचे नवे आव्हान

उपाययोजना

  • सायकल स्टेशनवर माहिती देणारे फलक लावावेत

  • अ‍ॅप वापरण्याची प्रक्रिया नागरिकांना समजावून सांगणे गरजेचे

  • शाळा, महाविद्यालये व आयटी कंपन्यांमध्ये जनजागृती करणे

  • सायकल वापरासाठी प्रोत्साहनपर उपक्रम राबवणे

  • स्टेशनची नियमित देखभाल करणे गरजेचे

  • नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी अभिप्राय व्यवस्था सुरू करावी.

सायकल प्रकल्पाचा उद्देश केवळ सायकली उपलब्ध करून देणे नसून, नागरिकांना त्या सहज वापरता याव्यात हा आहे. सध्या चार डॉकिंग स्टेशन्स कार्यरत असून, आणखी दोन स्टेशन्सची कामे सुरू आहेत. पावसाळ्यानंतर सायकल वापर वाढेल, अशी अपेक्षा आहे. नागरिकांचा प्रतिसाद वाढविण्यासाठी प्रकल्पाची माहिती अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यावरही भर दिला जात आहे.

निखिल देशमुख, संचालक, ईझी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news