

पिंपळे गुरव: महापालिकेच्या 'स्मार्ट सिटी' योजनेअंतर्गत पिंपळे गुरव परिसराचा कायापालट करण्यात आला आहे. लाखो रुपये खर्च करून सुसज्ज असे सिमेंटचे रस्ते, पदपथ, सायकल ट्रॅक, ड्रेनेजलाईन, स्टॉर्म वॉटर लाईन, स्ट्रीट लाईट, उद्याने, अत्याधुनिक बसथांबे यासारख्या सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, एवढा विकास होऊनही परिसरातील भाजी मंडईचा रखडलेला प्रश्न अद्याप सुटू शकलेला नाही. पालिकेकडे आरक्षित जागा उपलब्ध असूनही स्वतंत्र भाजी मंडई उभारली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
अपघाताची भीती
पिंपळे गुरव येथील भगतसिंग चौक ते जवळकरनगर परिसरात सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना भाजी विक्रेते मोठ्या प्रमाणात हातगाड्या आणि टेम्पो लावून बसतात. यामुळे मुख्य रस्ता अत्यंत अरुंद झाला असून, दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. सुदर्शननगर, जवळकरनगर, वैदूवस्ती, कल्पतरू, कृष्ण मंदिर आणि भगतसिंग चौक परिसरातील नागरिक याच बाजारपेठेत खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे रस्ता अरुंद होत आहे. अनेकदा येथील रस्त्यावरून पायी चालणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीच्या गोंधळामुळे अनेक लहान मोठे अपघातही घडून आले आहेत.
वाहतूक कोंडीत भर
या परिसरात अधिकृत गाळे खरेदी करून लाखो रुपये गुंतवून व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना रस्त्यावरील अनधिकृत भाजी बाजारामुळे मोठा फटका बसत आहे. आम्ही कर भरून व्यवसाय करायचा आणि रस्त्यावरील कोंडीचा त्रास सहन करायचा का?, असा सवाल व्यापारी करीत आहेत. दुसरीकडे, पोटाची खळगी भरण्यासाठी रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांची अवस्थाही बिकट आहे. नागरिकांच्या तक्रारींनंतर महापालिकेचे अतिक्रमण विभाग येथे सातत्याने धडक कारवाई करीत असते. या कारवाईत भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या, भाजी आणि फळे जप्त केली जातात. यामुळे गरीब विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून, ते हवालदिल झाले आहेत.
भाजी विक्रेत्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष
पिंपळे गुरव परिसरात महापालिकेच्या मालकीच्या अनेक आरक्षित जागा आहेत. या जागांवर हक्काची भाजी मंडई उभारावी, अशी मागणी स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पालिकेकडे वारंवार केली आहे. यासाठी प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र, संबंधित अधिकारी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून, त्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
परिसरात स्वतंत्र भाजी मंडई उभारल्यास सर्व विक्रेते एकाच छताखाली येतील. यामुळे चौकाचौकांतील गर्दी कमी होऊन रस्ते मोकळे होतील. वाहतूककोंडी सुटेल आणि भाजी विक्रेत्यांनाही हक्काचे रोजगाराचे साधन मिळेल. त्यामुळे पालिका प्रशासन यावर कधी ठोस निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गौतम अमरसिंग आदियाल, सामाजिक कार्यकर्ते
महापालिका आयुक्तांकडे हॉकर झोनच्या माध्यमातून प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यासाठी पाठपुरावा सुरू आहे. प्रस्ताव मंजूर होताच एकाच ठिकाणी स्वतंत्र भाजी मंडई उभारणी करून व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
राजू कांबळे, कार्यालयीन अधीक्षक, अतिक्रमण ड प्रभाग