

पिंपळे गुरव: पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षणाच्या दर्जाबाबत मोठमोठे दावे करत असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र पिंपळे गुरव येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५४ मध्ये पहावयास मिळत आहे. महापालिका शाळेच्या आवारात असलेली विद्यार्थ्यांसाठीची खेळणीही तुटलेल्या अवस्थेत असून, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.
येथील प्रशालेमध्ये परिसरातील सर्वसामान्य कुटुंबांतील शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दररोज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी आणि दुपारी शाळा सुटल्यानंतर त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी पालक मोठ्या संख्येने शाळेच्या आवरात येतात. मात्र, त्यांच्यासाठी उभे राहण्यासाठी साधे शेडदेखील उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पालकांना अक्षरशः शाळा सुटेपर्यंत पावसात भिजत ताटकळत उभे रहावे लागत आहे.
पालकांमध्ये नाराजी
विशेष म्हणजे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान भावंडांना सोबत घेऊन येणाऱ्या पालकांची सर्वाधिक गैरसोय होत आहे. पाऊस सुरू झाल्यानंतर आसरा घेण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे अनेकांना झाडाखाली किंवा इमारतीच्या कडेला उभे राहण्याची वेळ येते. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत असून, पालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कोट्यवधी रुपयांची विकासकामे करणाऱ्या महापालिकेला विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी काही लाख रुपयांचे शेड उभारणे अशक्य आहे का ? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांच्या हिताचा व विरंगुळ्याचा विचार करताना महापालिका शाळेच्या आवारात असलेली विद्यार्थ्यांसाठीची खेळणीही तुटलेल्या अवस्थेत असून, त्याकडेही दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेने तातडीने शाळा क्रमांक ५४ च्या आवारात किंवा प्रवेशद्वाराजवळ कायमस्वरूपी प्रशस्त शेड उभारून पालकांना पाऊस व उन्हापासून संरक्षण मिळेल, अशी व्यवस्था करावी, अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.
पालकांच्या मागण्या
शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ कायमस्वरूपी शेड उभारावे
पालकांना बसण्यासाठी बाकांची व्यवस्था करावी
पावसाळ्यात सुरक्षित थांबण्यासाठी स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्र तयार करावे
विद्यार्थी व पालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक नागरी सुविधा तातडीने उपलब्ध कराव्यात