

पिंपळे गुरव: पिंपळे गुरव येथील मिलिटरीच्या मैदानामध्ये सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणात आग लागली. आगीची तीवता लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने तातडीने बाहेरील मदत मागवली असून, खडकी कॅन्टोन्मेंट रहाटणी तसेच पिंपरी-भोसरी येथून अग्निशामक दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.
प्राथमिक माहितीनुसार, कोरडे गवत पेटल्याने ही आग जवळील टायर साठवणुकीच्या ठिकाणी पसरल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टायर साठवलेले असल्याने आग वेगाने वाढत जाऊन भीषण स्वरूप धारण केले. संबंधित क्षेत्र फायरिंग रेंजच्या हद्दीत येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
या आगीमुळे परिसरातील सूक्ष्मजीव, साप, ससे, पक्षी तसेच इतर वन्यजीवन धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. निसर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, टायर जळाल्यामुळे प्रचंड प्रमाणात धूर पसरला आहे. त्यामुळे परिसरातील प्रदूषण वाढू होऊन नागरिकांना श्वसनाचा त्रास जाणवत आहे.
आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, अग्निशामक दलाच्या जवानांसह अतिरिक्त मनुष्यबळ व पाण्याच्या टँकरची मदत घेतली जात आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत असून, परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आग लागण्याचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, लष्करी अधिकारी व अग्निशामक दलाकडून घटनेचा तपास सुरू आहे. आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतर नुकसानीचा तसेच कारणांचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.