

वाल्हे : पुणे - पंढरपूर पालखी महामार्गाचे विस्तारीकरण जवळपास पूर्ण झाले असून पिसुर्टी फाट्यापर्यंत वाहतूक वेगवान आहे. मात्र पिसुर्टी फाट्यानजीकच्या बाह्यवळणावरून निरा शहराकडे जाणारा जुना पालखीमार्ग अत्यंत अरुंद, खड्डेमय आहे. तसेच येथे एका बाजूस तीव उतार असल्याने धोकादायक ठरत आहे.
या मार्गावर आता ऊस वाहतूक धोकादायक पद्धतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे. यातील अनेक वाहने विनारिफ्लेक्टर, विनानंबरप्लेट किंवा सुरक्षात्मक साधनांशिवाय वाहतूक करतात.
पुरंदर तालुक्यातील वाल्हे, जेजुरी, निरा, पिसुर्टी, मांडकी, जेऊर, हरणी, दौंडज, सासवड, साकुर्डे व धालेवाडी आदी बागायती भागातून मोठ्या प्रमाणावर ऊस वाहतूक सुरू असल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे. या राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहतूक असतानाच ऊसाने भरगच्च भारलेले ट्रॅक्टर - डबल ट्रॉली रस्त्याच्या मधोमध चालवल्याने मागील वाहनचालकांना मोठी अडचण निर्माण होते. रात्रीच्या वेळी अनेक वाहनांवर रिफ्लेक्टरऐवजी कापड लावलेले दिसते.
जेजुरी, वीर, हरणी, वाल्हे, नारायणपूर, कापूरहोळ (बालाजी मंदिर) या देवस्थानांना जाणाऱ्या भाविकांनाही या मार्गावरील धोकादायक वाहतुकीचा सामना करावा लागतो. शिवरी परिसरात महामार्गाचे काम सुरू असल्याने मार्ग आणखी अरूंद झाला असून अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यातच नागमोडी व धिम्या गतीने जाणाऱ्या या ट्रॅक्टर-ट्रॉलीला ओव्हरटेक करताना सर्व वाहनचालकांना धोका पत्करावा लागत आहे.
सायंकाळी नोकरी, उद्योग व शाळा सुटण्याची वेळ असते. त्याच वेळी कारखान्यात ऊस पोहोचविण्याची घाई या वाहतूकदारांना असते. यामुळे क्षमतेपेक्षा जास्त भरलेली वाहने भरधाव वेगात धावताना दिसतात.
चालक सुरक्षेची कोणतीही काळजी घेत नसल्याने पालखी महामार्गावरील धोकादायक स्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे, याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.