

पिंपरी: महापालिकेत 1 एप्रिल 2025 पासून ई-ऑफिस प्रणालीद्वारे कामकाज सुरू आहे. संगणकाच्या डीएमएस (डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टीम) ही मुख्य सॉफ्टवेअर प्रणाली गेल्या दहा दिवसांपासून पूर्णपणे बंद पडली आहे.
त्यामुळे महापालिकेच्या दैनंदिन कामकाजासह प्रशासकीय व्यवहार आणि महसूल संकलन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांसह सामाजिक कार्यकर्ते, ठेकेदार व त्यांच्या प्रतिनिधींना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत. याप्रकरणी संंबंधित ठेकेदार कंपनीस नोटीस बजावण्यात आली आहे.
महापालिकेने त्या ई-ऑफिस प्रणालीवर तब्बबल 112 कोटी रुपये खर्च केले आहेत. सॉफ्टवेअर प्रणालीच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदार कंपनी तसेच, संबंधित आयटी विभागाकडून या तांत्रिक बिघाडाकडे गंभीर दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी प्रमाणपत्रे, मालमत्ताकर व पाणीपट्टी भरणे, विविध परवान्यांशी संबंधित सेवा आणि इतर अनेक ऑनलाइन सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत.
कामकाज विस्कळीत
तसेच, महापालिकेच्या अंतर्गत फाईल्सची देवाणघेवाण, ई-गव्हर्नन्स प्रणाली आणि दैनंदिन कार्यालयीन कामकाजावरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक विकासकामांचे निर्णय व अंमलबजावणी रखडली आहे. ऑनलाइन करसंकलन बंद असल्यामुळे महापालिकेच्या महसूलावरही मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिकेचे संपूर्ण कामकाज विस्कळीत झाले आहे. काम होत नसल्याने अधिकार्यांसह कर्मचार्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे केवळ संगणकांसमोर दिवसभर बसून राहण्याची वेळी कर्मचार्यांवर आली आहे. असे प्रकार वारंवार होत असून, संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
संबंधित ठेकेदार कंपनीस नोटीस
जोरदार पाऊस झाल्याने डीएमएस संगणक प्रणाली यंत्रणा बंद पडल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले होते. त्यात दुरुस्ती करून पूर्ववत करण्यात आले आहे. याप्रकरणी काम करणार्या ठेकेदार कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे, असे स्मार्ट सिटी कंपनीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी सांगितले.