

वल्लभनगर: मोशी येथील कचरा डेपोवरील दुर्घटनेनंतर पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील कचरा संकलन, कचऱ्याचे विलगीकरण आणि प्रक्रिया व्यवस्थापनाचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.
मोशी कचरा डेपो बंद असल्याने या विस्कळीत व्यवस्थेचा थेट फटका कासारवाडी येथील महापालिकेच्या घनकचरा हस्तांतरण केंद्राला बसत आहे. क्षमतेपेक्षा जास्त कचऱ्याची आवक वाढल्याने या केंद्राचा अक्षरशः 'श्वास कोंडला' आहे.
कासारवाडी येथील घनकचरा हस्तांतरण केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचे मोठमोठे ढीग साचले आहेत. परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
मोशी कचरा डेपोवरील दुर्घटनेनंतर शहराच्या कचरा व्यवस्थापनातील त्रुटी उघड झाल्या आहेत. कचरा संकलन, विलगीकरण, वाहतूक आणि प्रक्रिया यासाठी सक्षम पर्यायी व्यवस्था उभी करण्याची गरज असताना, सध्या कासारवाडी केंद्रावरच कचऱ्याचा भार वाढत आहे.
मोशी डेपो तातडीने सुरू करावा, कासारवाडी केंद्रातील साचलेला कचरा युद्धपातळीवर हटवावा आणि संपूर्ण कचरा व्यवस्थापन यंत्रणेचे नियोजन नव्याने करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या गंभीर समस्येबाबत ह क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य अधिकारी अंकुश झिटे तसेच महापालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांच्याशी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
घंटागाड्या कचऱ्याने गच्च; ओला-सुका कचरा एकत्र
शहरातील विविध भागांतून घरोघरी कचरा गोळा करणाऱ्या अनेक घंटागाड्या कचऱ्याने पूर्ण भरलेल्या अवस्थेत उभ्या होत्या. विशेष म्हणजे, या वाहनांमध्ये ओला आणि सुका कचरा सर्रासपणे एकत्र टाकला जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे कचरा विलगीकरणाच्या संकल्पनेलाच हरताळ फासला जात असल्याचे चित्र आहे.
कचरा पुढे वाहून नेणारे मोठे कंटेनर आणि कॉम्पॅक्टर गाड्याही जागेवरच थांबून होत्या. केंद्राच्या प्रवेशद्वाराजवळ कचऱ्याचा मोठा ढीग साचल्याने वाहनांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. एका कॉम्पॅक्टर मशीनवरही कचरा तसाच पडून असल्याचे दिसून आले.
कचरा प्रक्रिया व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह
कासारवाडी येथील घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्रही बंद अवस्थेत दिसून आले. त्यामुळे कचरा संकलनापासून विलगीकरण आणि पुढील प्रक्रियेपर्यंतची संपूर्ण साखळीच विस्कळीत झाल्याचे स्पष्ट होत आहे.
मोशी कचरा डेपो बंद असल्याने शहरातील कचरा इतर ठिकाणी वळविला जात आहे. मात्र, उपलब्ध कचरा संकलन व हस्तांतरण केंद्रांची क्षमता मर्यादित असल्याने कासारवाडी केंद्रावर अतिरिक्त भार पडत आहे. कचरा वेळेत पुढे वाहून न गेल्याने केंद्राच्या परिसरातच कचऱ्याचे ढीग वाढत आहेत.
नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक, वाहनचालक आणि कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात कचरा साचल्याने दुर्गंधी आणि अस्वच्छतेबरोबरच आरोग्याचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.
नियोजनाचा अभाव की तात्पुरती व्यवस्था?
मोशी येथील दुर्घटनेनंतर कचरा व्यवस्थापनाची पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली तरी, त्यासाठी आवश्यक असलेली क्षमता, वाहतूक आणि प्रक्रिया यंत्रणा अपुरी पडत असल्याचे सध्याच्या परिस्थितीतून दिसून येत आहे. परिणामी शहरातील कचरा व्यवस्थापनाची यंत्रणा एका डेपोवर अवलंबून असल्याचेही उघड झाले आहे.