

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2026-27 चा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर होणार आहे. प्रशासकीय राजवट जाऊन लोकप्रतिनिधीच्या काळातील म्हणजे या पंचवार्षिकेतील तो पहिला अर्थसंकल्प असणार आहे. या अर्थसंकल्पास शहरवासीयांना काय गिफ्ट मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फेबुवारी महिन्यात सादर करण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा सहा फेबुवारीला महापौरपदाची निवड होणार आहे. त्यानंतर महापालिकेचे कामकाज पदाधिकारी व नगरसेवकांमार्फत सुरू होणार आहे. साहजिकच सत्ताधारी भाजपाच्या ध्येय-धोरणानुसार अर्थसंकल्पावर छाप असणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्प मार्च महिन्यात नव्या पदाधिकाऱ्यांकडून सादर केला जाणार आहे. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी अर्थसंकल्पासंदर्भात विभागप्रमुखांची बैठक घेत सूचना दिल्या आहेत. लेखा व वित्त विभागाने सर्व विभागांकडून त्याची माहिती मागविण्यास सुरुवात केली आहे. आगामी वर्षातील उत्पन्न, खर्च, प्रलंबित कामे तसेच, नवीन विकासकामांचा समावेश असलेले प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आर्थिक नियोजनासाठी हा टप्पा महत्त्वाचा असून, प्रत्येक विभागाकडून मागील वर्षातील प्रत्यक्ष खर्च, अपेक्षित महसूल, करआकारणी, अनुदाने, भांडवली व महसुली खर्चाचा तपशील मागवण्यात आला आहे. सुरू असलेली विकासकामे, अपूर्ण प्रकल्प आणि मूलभूत सुविधांसाठी अवाश्यक निधीची मागणीही स्पष्टपणे नमूद करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना देण्यात आले आहेत. निवडणुकीनंतर हा अर्थसंकल्प सादर होणार असल्याने, प्रशासकीवर संतुलित आणि वास्तववादी अर्थसंकल्प मांडण्यावर भर दिला जाणार आहे. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक आणि पर्यावरण या विभागांना प्राधान्य देण्याची शक्यता आहे. लेखा व वित्त विभागाकडून प्राप्त माहितीच्या आधारे एकत्रित अर्थसंकल्प तयार करण्यात येणार आहे. मार्चमध्ये तो सादर केला जाईल. सर्व विभागांनी ठरवून दिलेल्या मुदतीत अचूक व सविस्तर माहिती सादर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मार्च महिन्यात अर्थसंकल्प सादर करण्याचे नियोजन लेखा व वित्त विभागाने केले आहे.
लोकप्रतिनधींच्या काळातील हा अर्थसंकल्प असल्याने त्यात शहरवासीयांना काय गिफ्ट मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. मालमत्ताकरात सूट मिळणार का, त्याचे दर कमी होणार का, रेड झोनमधील मालमत्तांना करात किती सूट मिळणार, पाणीपट्टीचे दर घटणार का, आदीबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
सर्व विभागांकडून माहिती मागविण्यास सुरुवात
महापालिकेच्या सन 2026-27 च्या अर्थसंकल्पाबाबत सध्या प्राथमिक बैठक पार पडली आहे. आयुक्तांनी सूचना करत आढावा घेतला आहे. त्यानुसार, सर्व विभागांकडून माहिती मागवण्याचे काम सुरू आहे. अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर करण्याचे नियोजन आहे, असे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सांगितले.