

लोणावळा: शनिवार व रविवारच्या सुट्यांना जोडून सोमवारची प्रजासत्ताक दिनाची सुटी आल्यामुळे या सलग तीन दिवस सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक पर्यटनस्थळी जाण्यास निघाले आहेत. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेळेवर सकाळपासूनच प्रचंड वाहतूककोंडी झाली होती.
खंडाळा घाट परिसरामध्ये प्रवासी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, पर्यटकांचा आजचा दिवस हा या वाहतूक कोंडीमध्येच गेला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर खासगी प्रवासी वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. नियमित संख्येपेक्षा काही पटीने वाहनांची संख्या वाढल्यामुळे ही वाहतूककोंडीत झाली होती.
वाहनचालकांना नाहक त्रास
वाहतूककोंडी सोडवण्यासाठी खंडाळा महामार्ग पोलिस व बोरघाट महामार्ग पोलिसांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर काही वेळांचा ब्लॉक घेत सर्व सहा लेन पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांसाठी खुल्या केल्या होत्या.
ठराविक कालावधीनंतर हा ब्लॉक घेतला जात होता. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरदेखील खंडाळा बोगदा खंडाळा गाव दरम्यान वाहतूककोंडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग सुट्यांमुळे लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, कोल्हापूर तसेच कराड मार्गे गोवा अशा विविध थंड हवेच्या ठिकाणी व पर्यटनस्थळी मोठ्या प्रमाणात पर्यटक निघाले आहेत.
अनेक वाहने पडली बंद
सकाळच्या सत्रामध्ये वाहनांची संख्या कमी असते, या उद्देशाने अनेक पर्यटक हे सकाळीच घराबाहेर पडले. मात्र, त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर घाट क्षेत्रामध्ये सकाळीच वाहतूककोंडी होण्यास सुरुवात झाली. अवजड वाहनेदेखील खंडाळा घाट चढत असताना त्यांचा वेग कमी होत असल्यामुळे बंद पडत होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अनेकवेळा घाट क्षेत्रामध्ये वाहने गरम होऊन बंद पडत होती. त्यामुळेदेखील या वाहतूक कोंडीमध्ये भर पडत होती. कारण कोणतेही असले तरी पर्यटकांचा आजचा शनिवारचा दिवस हा वाहतूक कोंडीचा ठरला. त्याचा मनस्ताप पर्यटकांनाच सहन करावा लागत होता.