

लोणावळा: लग्न म्हटलं की लगबग, उत्साह आणि पारंपरिक सोहळ्यांची रेलचेल आलीच. सहसा हॉटेल किंवा घरगुती वातावरणात होणारे केळवण शुक्रवारी लोणावळ्यातील काही तरुणांनी चक्क धावत्या लोकलमध्ये साजरे केले. लोणावळा-पुणे लोकलमध्ये पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या केळवणाची सध्या सर्वत्र चर्चा होत असून, प्रवाशांसाठी हा एक सुखद धक्का ठरला.
लोणावळा रेल्वे स्थानकावरून सकाळी 7.25 वाजता सुटणाऱ्या लोकलमध्ये हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. गोरख नाणेकर याच्या विवाहाच्यानिमित्ताने त्याच्या मित्रमंडळींनी हे खास सरप्राईज प्लॅन केले होते. लग्नापूर्वीचे केळवण अधिक संस्मरणीय व्हावे, या उद्देशाने डब्यातच पारंपरिक पद्धतीने हा सोहळा साजरा करण्यात आला.
मित्रमंडळींनी एकत्र जमत डब्यातच केळवणाचा मान राखला. या वेळी साधेपणा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गप्पा-टप्पा, थट्टा-मस्करी आणि घरून आणलेल्या जेवणाचा आस्वाद घेत सर्वांनी गोरखला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. जिथे मित्र, तिथेच सण ही भावना या वेळी खऱ्या अर्थाने दिसून आली.
प्रवाशांनी केले उपक्रमाचे कौतूक
ट्रेनमधील हा आनंदोत्सव पाहून सहप्रवाशांचेही लक्ष वेधले गेले. रोजच्या धावपळीच्या प्रवासात अशा प्रकारचे आनंदाचे क्षण पाहून अनेक प्रवाशांनी या उपक्रमाचे कौतूक केले. परंपरा जपतानाच ती नव्या पद्धतीने आणि मित्रत्वाच्या नात्याने साजरी करण्याचा हा प्रयत्न खरोखरच अभिनव आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.
साध्या क्षणांना आपल्या कल्पकतेने विशेष बनवणारा हा उपक्रम सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत आहे. मैत्रीच्या या अनोख्या ट्रेन केळवणाने प्रवासाचा थकवा दूर करत सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटवले.