

नवी सांगवी : दोन वेळ पोटाला अन्न मिळंना... लेकरं बाळं उपाशी राहायची वेळ आली... त्यात कामधंदा रोज मिळंना... काम मिळालं, तर कुठंबी जावं लागतंय... डोक्यावर घमेलं, एका हातात फावडं आणि दुसऱ्या हातात दोन वेळचा जेवणाचा डबा. ज्या दिशेनं कामासाठी ठेकेदार नेण्यासाठी येतील, त्या दिशेने पळत सुटणे आणि गाडीवर बसून कामाला जाणे. ज्याला काम नाही मिळत, तो घुटमळत तिथंच उभा राहतो, असे दृश्य जुनी सांगवी येथील संविधान चौकातील मजूर अड्ड्यावर पाहायला मिळत आहे.
येथील मजूर अड्ड्यावर इमारतींचे बांधकाम करण्यासाठी अथवा बांधकाम साहित्याचे ने-आण करण्यासाठी, सोसायटीची व घरांची विविध प्रकारची अवजड कामे, प्लम्बिंगची कामे, मालाची ने-आण करणे, बगीच्यामध्ये माळीकाम, पायाभूत सुविधांची कामे, दुकान किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी सहजपणे याठिकाणी मजूर अथवा कामगार मिळत असतात.
या मजूर अड्डयांवर मजुरांना कामानुसार पैसे मिळतात. साधारणतः पाचशे रुपये दिवसभरातील कामाची रोजंदारी मिळते. बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीला आठशे रुपये रोजंदारी मिळते. हे मजूर कमी पैशांत काम करत असल्याने राज्यातील मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. रोज कामासाठी मजुरांना सात वाजताच घर सोडावे लागते. लवकर अड्ड्यावर आले तर काम लवकर मिळते. कामासाठी आल्यानंतर हाताला काम मिळेल की नाही याची शाश्वती नाही. तरीही कशाचीही तमा न बाळगता मुला-बाळांना घरी सोडून हे मजूर कामाच्या शोधत येतात. कित्येक वेळा काम मिळाले नाही, तर रिकाम्या हाताने परतावे लागते. मिळेल ते काम करावे लागते. बांधकामावर विटा, वाळू, सिमेंट वाहण्याचे काम मिळते. कधी घरातील साफसफाई,
तर कधी चेंबर साफ करण्याचेदेखील काम मिळते. कधी कधी सोसायटीमधील साफसफाईची कामे मिळतात, असे येथील मजुरांनी याप्रसंगी सांगितले. अनेकांचे उंबरे झिजवून झाले. मात्र काम काही मिळेना, अशी व्यथा महाराष्ट्रातील विविध भागातून येथे कामाला आलेल्या मजुरांची झाली आहे. मराठवाडा, विदर्भ आदी भागातील नागरिकांना गावाकडे काम नसल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी लोंढे शहरात येत आहेत.
उन्हा पावसाची तमा न बाळगता मिळेल ते काम करायचे आणि पोटाची भूक भागवायची. कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा ही सांगवीच्या मजूर अड्ड्यावरील कामगारांची दिनचर्या. भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी हाताला काहीतरी काम मिळेल या आशेने हे कामगार थांबलेले असतात. ना कधी सन्मान वाट्याला आला, ना कधी पुरस्काराची अपेक्षा..! गड्या ’आपलं काम भलं.. अन् आपण..” असं जगणं वेठबिगारीचे काम करणाऱ्या कामगारांच्या वाट्याला आलेलं असतं. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कुटुंबाला दोन वेळचे जेवण कसे मिळेल याची भांत कायम आहे.
या मजुरांमध्ये अनेक अल्पवयीन मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण यांचा समावेश आहे. काही ज्येष्ठ नागरिक व महिलांना काम होत नसतानाही पोटासाठी उतारवयात काम करण्याची वेळ आली आहे. मजूर अड्ड्यावर जाताच काम मिळेल, या अपेक्षेने दररोज येथे गर्दी होत असते. गावात नाही तर शहरात तरी काम मिळेल, या आशेने शहरात गावाकडून नागरिक कामाच्या शोधात येत आहेत. मजूर अड्ड्यावर दुचाकीवर एक व्यक्ती आली, की कामासंदर्भात त्या व्यक्तीच्या अवतीभोवती अनेक मजूर काम मिळविण्यासाठी गर्दी करीत असतात.
जुनी सांगवी येथील संविधान चौकातील मजूर अड्ड्यावर पोटासाठी सकाळपासूनच कामगारांची गर्दी असते. कामाची मागणी कमी असल्याने त्यांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.