

पिंपरी: नवीन कार खरेदीचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणांनी चक्क महामार्गावर धोकादायक स्टंटबाजी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील वाकड परिसरातील कात्रज-देहूरोड बायपासवर हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. रिल्स आणि फोटोशूटसाठी महामार्गावरील वाहतूक रोखल्याचे व्हिडिओत दिसत असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
नवीन कार शोरूममधून घरी नेताना काही तरुणांनी महामार्गावरील अरुंद जागेतून भरधाव वेगात वाहन चालवून चित्रीकरण केले. फोटोशूटसाठी इतर वाहनांची वाहतूकही अडविण्यात आल्याचे दिसते. या प्रकारामुळे महामार्गावरील वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कारवर नियमानुसार नंबर प्लेटऐवजी फॅन्सी नंबरप्लेट लावण्यात आल्याचे दिसते. त्यावर केवळ '१२१२' हे आकडे ठळकपणे दिसत असून, संपूर्ण नोंदणी क्रमांक स्पष्ट होत नाही. व्हिडीओ नेमका कधी चित्रित करण्यात आला आणि संबंधित वाहन कोणाचे आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही.
यापूर्वीही चाकण आणि बावधन परिसरात महामार्गावर रिल्स बनविण्यासाठी वाहतूक अडविण्याचे प्रकार समोर आले होते. अशा स्टंटबाजीमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी संबंधित वाहनचालकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.