Love Relationship Stress and Mental Health: पिंपरी-चिंचवडमध्ये प्रेमभंगाचा मानसिक आरोग्यावर परिणाम; दरमहा ७ ते ८ जणांच्या आत्महत्या

प्रेमसंबंधांतील तणाव, नकार आणि भावनिक संघर्ष चिंतेचा विषय; वेळीच समुपदेशन आणि कुटुंबीयांचा आधार महत्त्वाचा
Counseling
CounselingPudhari
Published on: 
Updated on: 

संतोष शिंदे

पिंपरी: आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्ने पाहिली जातात. मात्र, याच नात्यात दुरावा निर्माण झाल्यानंतर काहींच्या जगण्याची उमेद हरवत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे. प्रेमातील अपयश, जोडीदाराने दिलेला नकार आणि नातेसंबंधातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत दरमहा सरासरी सात ते आठ जण आत्महत्या करीत असल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. प्रेमसंबंधातील भावनिक संघर्षातून टोकाचे पाऊल उचलण्याच्या या घटना मानसिक आरोग्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण करीत आहेत.

Counseling
Pimpri Chinchwad Unauthorized Construction: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांना लगाम! परवानगीची कागदपत्रे नसल्यास सदनिकांची खरेदी-विक्री थांबणार

पोलिसांकडील प्रत्येक महिन्याच्या घटनांच्या नोंदींवरून हे प्रमाण समोर आले आहे. प्रेमप्रकरणाशी संबंधित आत्महत्यांची सरासरी दरमहा आठच्या जवळपास पोहोचत असल्याने नातेसंबंधातील ताणतणावाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेषतः प्रेमभंगानंतर येणारे नैराश्य, एकाकीपणा आणि भविष्याबाबतची अनिश्चितता यांचा मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे या आकडेवारीवरून अधोरेखित होत आहे.

Counseling
Harit Setu Project: पिंपरी-चिंचवडच्या ‘हरित सेतू’ची संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत दखल; जागतिक व्यासपीठावर शहराचा ठसा

एकेकाळी सर्वस्व वाटणारी व्यक्ती आयुष्यातून निघून गेल्यानंतर निर्माण होणारी पोकळी काहींना असह्य होत आहे. प्रेमसंबंधांमधील संशय, विवाहाला नकार, जोडीदाराशी निर्माण झालेले मतभेद किंवा कुटुंबीयांचा विरोध यामुळे भावनिक संघर्ष तीव्र होतो. अशा परिस्थितीत नाते संपुष्टात आल्याचा धक्का पचविणे काही व्यक्तींना कठीण जात आहे. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी विश्वासू व्यक्ती उपलब्ध नसल्यास मानसिक अस्वस्थता वाढून टोकाचे निर्णय घेतले जात आहेत.

प्रेमापलीकडेही संकटांचे सावट

आत्महत्यांच्या घटनांमागे प्रेमसंबंधांव्यतिरिक्त अन्य कारणांचीही पोलिसांकडे नोंद आहे. आजारपण, बेरोजगारी, मनोविकार, कर्जबाजारीपणा आणि नोकरी गमावल्याच्या पार्श्वभूमीवरही अनेकांनी जीवन संपविले आहे. विवाह जुळत नसल्याशी संबंधित प्रकरणांचाही यामध्ये समावेश आहे. त्यामुळे आत्महत्या प्रतिबंधासाठी मानसिक आरोग्याबरोबरच रोजगार, आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक प्रश्नांकडेही लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Counseling
Lonavala Shop Theft: लोणावळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ! एकाच रात्री पाच दुकाने फोडली; १६ हजारांची रोकड लंपास

त्या व्यक्तींना कुटुंबीय आणि मित्रांचा विश्वास मिळणे महत्त्वाचे

पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या वेगाने विस्तारत असलेले शहर आहे. शिक्षण, नोकरी आणि व्यवसायाच्या निमित्ताने येथे मोठ्या संख्येने तरुण-तरुणी वास्तव्यास आहेत. बदलती जीवनशैली, नात्यांबाबत वाढलेल्या अपेक्षा आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष या पार्श्वभूमीवर भावनिक संकटांना सामोरे जाण्यासाठी सक्षम आधारव्यवस्था असणे आवश्यक आहे. नात्यातील अपयशामुळे खचलेल्या व्यक्तींना वेळीच कुटुंबीय आणि मित्रांचा विश्वास मिळणे महत्त्वाचे असल्याचे जाणकारांचे मत आहे.

मनातील वादळ ओळखणार कोण?

प्रेमभंग किंवा वैयक्तिक आयुष्यातील संकटानंतर काही व्यक्तींच्या वागण्यात बदल दिसू लागतात. नेहमीपेक्षा शांत राहणे, आवडीच्या गोष्टींमधील रस कमी होणे, सतत निराशा व्यक्त करणे किंवा इतरांपासून दूर राहणे ही मानसिक संकटाची लक्षणे असू शकतात. अशा बदलांकडे दुर्लक्ष न करता संबंधित व्यक्तीचे म्हणणे समजून घेणे आवश्यक आहे. विशेषतः आत्महत्येचे विचार व्यक्त केल्यास तातडीने मानसोपचार तज्ज्ञांची मदत मिळवून देणे महत्त्वाचे आहे.

Counseling
Pimpri Chinchwad Dengue Cases: थंडी सुरू, तरी डासांचा डंख कायम! पिंपरी-चिंचवडमध्ये डेंग्यूचे ३३ रुग्ण पॉझिटिव्ह

प्रेमभंगानंतर काय ?

प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर दुःख, राग किंवा अस्वस्थता जाणवणे स्वाभाविक आहे. अशा वेळी भावनेच्या भरात निर्णय घेण्याऐवजी परिस्थिती स्वीकारण्यासाठी स्वतःला वेळ देणे गरजेचे आहे. नियमित दिनक्रम, पुरेशी झोप, आवडीचे छंद आणि सामाजिक सहभाग यामुळे भावनिक संतुलन राखण्यास मदत होऊ शकते. नात्यातील अपयश म्हणजे आयुष्यातील अपयश नव्हे, ही जाणीव ठेवणे आवश्यक आहे. मानसिक ताण दैनंदिन जीवनावर परिणाम करू लागल्यास समुपदेशनाचा आधार घ्यावा.

दीर्घकाळ उदास राहणे, इतरांशी संपर्क टाळणे किंवा आयुष्याबाबत नकारात्मक भावना व्यक्त करणे, ही मानसिक अस्वस्थतेची गंभीर लक्षणे असू शकतात. अशा बदलांकडे कुटुंबीयांनी गांभीर्याने पाहावे. संबंधित व्यक्तीला भावनिक आधार देण्याबरोबरच वेळीच मानसोपचार आणि समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास मानसिक संकटातून सावरण्यास मदत होऊ शकते.

डॉ. मनजीत संत्रे, मानसोपचार तज्ज्ञ, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.