

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण, निगडी येथे राबविण्यात येत असलेल्या हरित सेतू या पर्यावरणपूरक उपक्रमाची संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदलविषयक आंतरराष्ट्रीय परिषदेत दखल घेण्यात आली आहे. शहराच्या पर्यावरण संवर्धनासाठी महापालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या हरित सेतू उपक्रमाची जागतिक स्तरावर दखल घेण्यात आली आहे. ती शहरासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
तुर्कीये येथील अंटाल्या शहरातील अंटाल्या एक्स्पो सेंटर येथे 9 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. परिषदेत 14 नोव्हेंबरला हरित सेतू प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. जागतिक स्तरावर हवामान बदलाचे वाढते आव्हान, पर्यावरणाचे संवर्धन व शाश्वत विकास या विषयांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर जगभरातील विविध देश, संस्था व स्थानिक स्वराज्य संस्था पर्यावरणपूरक विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. या आंतरराष्ट्रीय परिषदेतही अशा विविध उपक्रमांचे सादरीकरण व त्यावर चर्चा करण्यात येत आहे.
युरोपमध्ये सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांमध्येही हरित सेतू प्रकल्पाची चर्चा करण्यात आली. भारतामध्ये जगाला हेवा वाटावा असे अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले जात असून, पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात पिंपरी चिंचवड महापालिकेनेही पुढाकार घेतल्याचा उल्लेख करण्यात आला. त्यामुळे स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरणपूरक प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची संधी मिळाली आहे.
हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाताना स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. महापालिकेच्या हरित सेतू प्रकल्पाला मिळालेली आंतरराष्ट्रीय स्तरावरील दखल ही शहराच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली नवी ओळख आहे. शाश्वत व पर्यावरणपूरक शहराच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीसाठी ती प्रेरणादायी ठरणार आहे, असे महापालिकेच्या शहरी दळणवळण विभागाचे सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उपक्रमांमध्ये पिंपरी-चिंचवडचा सहभाग
पिंपरी-चिंचवड महापालिका नेहमीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत शहराच्या विकासासाठी प्रयत्नशील असते. शहरात गेल्या वर्षापासून सुरू झालेल्या पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजन व अंमलबजावणीमध्ये पिंपरी-चिंचवडचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. केंद्र शासनाच्या इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमामध्ये देशातील 100 शहरांमधून पिंपरी-चिंचवड शहराने पहिल्या पाच शहरांमध्ये स्थान मिळवले होते. या उपक्रमात शहराने वैयक्तिक स्तरावरही विक्रम नोंदवला आहे. स्मार्ट सिटी व केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये महापालिकेचे अधिकारी सहभागी झाले आहेत. यामध्ये सहशहर अभियंता बापूसाहेब गायकवाड, कार्यकारी अभियंता सुनील पवार तसेच, अमित दीक्षित, स्वप्नील शिर्के, अनंत चिटके, प्रसाद देशमुख आदी अधिकार्यांनी आपल्या उल्लेखनीय कामगिरीतून शहराच्या नावलौकिकात भर घातली आहे.
हरित सेतू प्रकल्पास व्यापक स्वरूप देणार
पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा प्रवास हा केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, पर्यावरणाचे संवर्धन व भावी पिढ्यांसाठी हरित, स्वच्छ व शाश्वत शहर निर्माण करण्याचाही आहे. स्थानिक पातळीवर राबविल्या जाणार्या पर्यावरणपूरक उपक्रमांना जागतिक स्तरावर प्रशंसा मिळणे, ही शहराच्या विकासासाठी प्रेरणादायी बाब आहे. पर्यावरण संवर्धनाच्या अशा उपक्रमांना महापालिकेच्या माध्यमातून अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार आहे, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
शहरासाठी अभिमानास्पद बाब
महापालिका शहराच्या विकासासोबतच पर्यावरणपूरक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. हरित सेतू प्रकल्पाची संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत दखल घेतली जाणे, ही संपूर्ण शहरासाठी अभिमानाची बाब आहे. स्थानिक पातळीवर राबविण्यात येणारे उपक्रम जागतिक स्तरावर पोहोचत असल्याने अशा प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी आम्हाला निश्चितच प्रेरणा मिळेल, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.